उन्हवरे व वावघर येथील रिक्त पोलिस पाटील पद भरण्याची मागणी

उन्हवरे व वावघर येथील रिक्त पोलिस पाटील पद भरण्याची मागणी

९ (पान ६ साठी)

उन्हवरे, वावघरमधील पोलिसपाटीलपद रिक्त

गावतळे, ता. २९ ः गावात शांतता नांदावी व स्थानिक पातळीवरील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिसांचे कान व डोळे म्हणून प्रत्येक गावात शासनाकडून पोलिस पाटलांची नियुक्ती करण्यात येते; मात्र दापोली तालुक्यातील उन्हवरे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील उन्हवरे व वावघर या गावातील पोलिस पाटील पद हे गेली अनेक वर्षे रिक्त आहे. हे पद भरावे म्हणून संबंधित खात्याकडे याबाबत पत्रव्यवहारही करण्यात आला आहे; मात्र अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवरील कायदा सुव्यवस्था अबाधित कशी राहणार, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
उन्हवरे येथे सुप्रसिद्ध गरम पाण्याचे कुंड असल्याने पर्यटन म्हणून हे गाव महाराष्ट्राच्या नकाशावर आहे. त्यामुळे या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. उन्हवरे गावामध्ये सध्या भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. ग्रामपंचायतीने उन्हवरे बाजारपेठ येथे बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरेही या चोरट्यांनी पळवले आहेत. त्यामुळे जनमानसात भीतीचे वातावरण पसरले आहे. उन्हवरे येथील पोलिस पाटील पद हे राजीनामा दिल्याने तर वावघर येथील पोलिस पाटील पद हे निवृत्त झाल्याने रिक्त झाले आहे. फरारे येथील पोलिस पाटील यांच्याकडे या दोन्ही गावांचा चार्ज देण्यात आला असला तरी तिन्ही गावांचा कारभार सांभाळताना त्यांचीही धावपळ होताना दिसत आहे. उन्हवरे येथील पोलिस दूरक्षेत्र आता नावापुरते उरले आहे, अशी चर्चा होत आहे. उन्हवरे व वावघर या दोन्ही गावांची रिक्त पोलिस पाटील पदे त्वरित भरावीत अशी मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com