गोरेगावमध्येही सौरऊर्जा प्रकल्‍प

गोरेगावमध्येही सौरऊर्जा प्रकल्‍प

गोरेगावमध्येही सौरऊर्जा प्रकल्‍प
मुंबई : महापालिकेने पर्यावरण संवर्धन व ऊर्जाबचतीच्या उद्देशाने सर्व कार्यालयांवर सौरऊर्जा प्रकल्‍प कार्यान्वित करण्यास सुरुवात केली आहे. चेंबूर विभाग कार्यालयापाठोपाठ आता गोरेगाव (पश्चिम) येथील पी दक्षिण विभाग कार्यालयाच्‍या गच्चीवर सौरऊर्जा यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेद्वारे उपलब्ध होणाऱ्या विद्युत ऊर्जेचा वापर विभाग कार्यालयासाठी करण्यात येणार असून यामुळे दरमहा सुमारे २७ हजार रुपयांची वीजखर्चाची बचत होणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्त राजेश अक्रे यांनी दिली आहे. पी दक्षिण विभाग कार्यालयाच्या गच्चीवर रविवार (ता. ३०) पासून सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून त्या माध्यमातून दरमहा ३ हजार युनिट्सची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्‍पाची क्षमता २५ किलो वॉट वीजनिर्मितीची आहे. यामुळे २७ हजार रुपयांच्या बचतीसह पर्यावरणपूरकताही जपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रकल्पाचे आयुर्मान २५ वर्षे असून प्रकल्प खर्च अवघ्या पाच वर्षांत वसूल होणार आहे. पी दक्षिण विभाग इमारतीत २५ किलो वॉट ऑन-ग्रीड सोलर रूफटॉप प्लांटचा पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कार्यान्वित करणे विशेष (इनोव्हेटिव्ह) प्रकल्प निधीअंतर्गत अक्षय ऊर्जानिर्मिती प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
---
धारावीत १० लाखांचा एमडी साठा जप्‍त
धारावी : धारावी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नाईक नगर येथे रविवारी (ता. ३०) अंदाजे १० लाख ५६ हजार रुपये किमतीचा ५४.५६ ग्रॅम वजनाचा मेफॅड्रॉन (एमडी) साठा जप्‍त करण्यात पोलिसांना यश आले. गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष सातकडून अमली पदार्थ विक्रीविरोधात कारवाई करत असताना धारावीतील रॉयल टाईल्स दुकान समोरुन एकजण संशयास्‍पदरित्या पळून जात होता. या वेळी त्‍याला पकडून तपास केल्‍यावर त्याच्याकडे मेफॅड्रॉन (एमडी) हा अमली पदार्थ आढळून आला. निजामुद्दीन मुमताज अली असे या आरोपीचे नाव असून त्‍याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कांदळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रपाळी पर्वेक्षक सहाय्यक पोलिस निरीक्षक वामन ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com