Astronomy App
Astronomy Appesakal

Astronomy App: अवकाश निरीक्षणाच्या गूढतेचा विस्मयकारी खेळ तुमच्या मोबाईलवर

उन्हाळा आला की, अनेकविध शिबिरांची शाळा सुरू होते. बालमित्रांना शाळेला सुट्टी मिळालेली असते; पण पालकवर्ग ‘आपल्या पाल्याला सगळं आलं पाहिजे’ या अट्टाहासाने त्यांना एकाचवेळी अनेक शिबिरात कोंबतात. त्यापेक्षा आपल्या पाल्याचा कल लक्षात घेऊन किंवा काही वेगळेपणा राखून आणि नवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन घरच्या घरी काही उत्तम असं शिकता आले तर? विज्ञान हे नेहमी हसतखेळत शिकले तर ते कधीही विसरता येत नाही. कारण, स्वतः जर एखादा प्रयोग करून पाहिला तर त्यातून प्राप्त झालेले ज्ञान त्रिकालाबाधित स्मरणात राहते. पाऊस सुरू होण्याआधीच्या दिवसांत आकाश निरभ्र असल्याने अवकाशाचे निरीक्षण हा खेळवजा प्रयोग करून पाहण्यास नक्कीच गंमत येईल. त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने ज्ञान आणि मनोरंजन दोन्हीही होईल. यासाठी मग काय करावे बरे?

आपल्याकडे असलेल्या स्मार्टफोनवर तारामंडळ दर्शवणारी अनेक मुक्तस्त्रोत सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत आणि ती पूर्णतः निःशुल्क देखील आहेत. यातील बरीच सॉफ्टवेअर्स ऑनलाईन मोडमध्ये वापरता येतात. या द्वारे अवकाशातील तारे आणि तारकासमूह यांचे आपल्याला त्रिमितीय रचनेतून निरीक्षण करता येते. जर ही सॉफ्टवेअर्स आपल्याला ऑफलाईन वापरायची असतील तर यांच्या गॅलरीत साठवण करून ठेवलेल्या प्रतिमा अभ्यासता येतात आणि त्यातून अवकाशासंबंधी माहिती जाणून घेता येते. पृथ्वीला केंद्रबिंदू मानून प्रत्येक तारा किंवा ग्रह किती अंतरावर आहे, त्याची दिशा, सूर्यमालेत त्याच्या फिरण्याचा वेग, त्याचा पृष्ठभाग, क्षेत्रफळ इत्यादी सर्व माहिती आपल्याला उपलब्ध होते. आपण ज्याला आकाश म्हणतो ते क्षितिजाच्या कडांनी गोलाकार झाले आहे, असा भास होतो; मात्र आकाशाला क्षेत्रफळाची कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे त्याला अवकाश म्हटले जाते.


अवकाशात अनेक आकाशगंगा असतात. एका आकाशगंगेत अनेक तारे, ग्रह, छोट्या-छोट्या तारकांचे समूह आणि अमर्याद धुळीकण असतात. आपण जो सूर्य पाहतो आणि त्याच्या सभोवती जे तारे आणि ग्रह आहेत त्या आकाशगंगेला ‘दुधाळ’ (मिल्की वे गॅलक्सी) म्हणतात. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो तरीही ते सूर्यप्रकाश प्रतिबिंबित करू शकतात. त्यामुळे आपण उघड्या डोळ्यांनी शुक्र, बुध, मंगळ, गुरू आणि शनी हे ग्रह पाहू शकतो. ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो; मात्र ते पृथ्वीपासून खूप दूर अंतरावर असतात. एडविन हबल या अमेरिकन खगोल शास्त्रज्ञाने सांगितल्याप्रमाणे विश्व हे सतत प्रसारण पावत असते. या तत्त्वानुसार, तारे पृथ्वीपासून दूर जात असताना आपल्याला लाल ठिपका पाहायला मिळतो त्याला रेडशिफ्ट म्हटले जाते. या ताऱ्यांचा प्रकाश अवकाशाच्या वातावरणात सहजतेने विखुरतो त्यामुळे तारे आपल्याला चमकताना किंवा लुकलुकताना दिसतात. ग्रीक शब्द ''प्लॅनेटा'' म्हणजे भटके. म्हणून जर आपण किमान दोन दिवस आकाशाचे निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येते की, ग्रहांची हालचाल जलद होत असताना दूर अंतरावरील तारे त्याच स्थितीमध्ये स्थिर आहेत, असे वाटते. यातील दुसरा महत्वाचा घटक म्हणजे उपग्रह. उपग्रह म्हणजेच सॅटेलाईटस् हे मानवनिर्मित असतात आणि ते एकाच जागी स्थिर असल्याचा भास होतो. कारण, या उपग्रहाचा वेग पृथ्वीच्या गोलाकार फिरण्याच्या वेगाएवढाच म्हणजे २४ तास असतो.

आपल्या फोनमध्ये स्टेलॅरिअम (Stellarium) हे अॅप डाउनलोड करून घ्या. हे एक मोफत माहिती देणारे खगोलशास्त्रीय सॉफ्टवेअर आहे. अशाच प्रकारचे गुगल स्काय मॅप (Google Sky Map) हे देखील सॉफ्टवेअर आहे; मात्र ही दोन्ही सॉफ्टवेअर्स इंग्रजी भाषेत आपल्याला माहिती पुरवतात. जर मराठी भाषेतून अवकाश जाणून घ्यायचे असेल तर इंडियन स्काय मॅप (Indian sky Map) हे सॉफ्टवेअर डाउनलोड करून भाषा निवडा. रात्रीचे आकाश निरीक्षण करणे उत्तम पर्याय आहे. त्यासाठी संध्याकाळी काळोख पडू लागल्यावर (साधारणत: ७ वा. नंतर) मोकळे मैदान किंवा जागा पाहून किंवा टेरेसची निवड करून सॉफ्टवेअरचा पॉपअप् ओपन करून मोबाइलची कॅमेरा विंडो आकाशाच्या दिशेने धरायची. जीपीएस सिस्टीम सुरू करायची.
आता आपल्याला अवकाशातील ''जिवंत क्षणचित्रे'' (लाईव्ह प्रोजेक्शन) आपल्या मोबाईलच्या स्क्रिनवर दिसेल. आपण झूम करून किंवा विशिष्ट बिंदूला टॅप करून त्याबद्दलची अधिकची माहिती मिळवू शकतो. हवे असल्यास ती प्रतिमा संग्रहित करून तिची छापिल प्रतदेखील तयार करू शकतो. तुमच्याकडे जर खगोलीय दुर्बिण असेल तर त्याच दिशेने भिंगांची जुळणी केल्यास तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी देखील हा नजराणा पाहू शकता. साधारणत: नोव्हेंबर ते जानेवारी हे महिने अवकाश निरीक्षणासाठी उत्तम समजले जातात. या वेळी पावसाचे जलबिंदू वातावरणातून कमी झालेले असतात आणि आकाश निरभ्र असते. फेब्रुवारीपासून सर्व तारकासमूह हे पश्चिमेकडे सरकायला सुरवात होते. त्यामुळे पूर्व ते पश्चिम दिशेची अदृश्य रेषा तयार केल्यास राशी, नक्षत्रे, ग्रह, तारे आणि चंद्र व इतर उपग्रह यांची निरीक्षणे करून ती नोंदवहीत टिपून ठेवल्यास नुसतीच माहित संकलित होणार नाही तर त्यातून अवकाशातील अद्भुतरम्य गूढतेचा विस्मयकारी खेळदेखील प्रत्ययास येईल.

पुणे येथे विद्यापिठाच्या संलग्न आवारात असलेली ''आयुका'' ही डॉ. जयंत नारळीकर संस्थापित संशोधन संस्था खगोलशास्त्राचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि संशोधन यासाठी अग्रेसर आहे. कधी तिथे गेलात तर ''गॅलिलिओ'' या खगोलशास्त्रातील बापमाणसाला जरूर भेटा; पुतळा रूपात उभा आहे तो तिथे..!

(लेखक महाविद्यालयाचे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com