
आंबोली अवजड वाहतुकीतून वगळा
आंबोली अवजड वाहतुकीतून वगळा
पोलिस निरीक्षक; सावंतवाडीत संबंधित विभागांना सूचना
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः आंबोली घाट धोकादायक बनल्याने महसूल, पोलिस आणि वन विभागाने चिरे, खडी, वाळू, लाकूड आदी अवजड वाहतुकीचे परवाने देताना हा मार्ग वगळण्याचे आदेश सावंतवाडी पोलिस निरीक्षकांकडून संबंधित खात्यांना देण्यात आले आहेत. यासंदर्भातील पत्र सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांना सावंतवाडीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक तौसिफ सय्यद यांनी दिले.
कमानी पूल कमकुवत झाल्याने अवजड वाहनांना बंद करण्यात आलेली आंबोली घाटातील वाहतूक पोलिस खाते संगनमत करून तडजोड करत रात्रीच्या वेळी सोडत असल्याची तक्रार बरेगार यांनी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्याकडे केली होती. त्याची प्रत जिल्हा पोलिस अधीक्षकांनाही दिली होती. या तक्रारीची दखल घेत चौकशीसाठी पोलिस खात्याकडे पाठविल्याबाबतचे पत्र बरेगार यांना दिले आहे. त्यात वाहतुकीच्या अनुषंगाने यापूर्वीच आंबोली दूरक्षेत्र येथे पोलिस अंमलदार यांनी पकडलेल्या चिरे वाहतूक करणाऱ्या १९ वाहनांवर कारवाई केल्याचे पत्रात म्हटले आहे; मात्र ही कारवाई राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे झाली आहे, अन्यथा सावंतवाडी पोलिस ठाण्याला ९ डिसेंबर २०२० मध्ये कारवाई करण्याबाबतचे पत्र मिळूनही २०२३ पर्यंत अशी कारवाई का केली नाही, असा प्रश्न बरेगार यांनी केला आहे. त्यांच्या मागणीची दखल घेऊन आंबोली मार्गाने अवजड वाहनांना माल वाहतुकीच्या परवान्यांना मनाई करण्याबाबत वन विभाग तसेच महसूल विभागाला पत्र दिल्याचे त्यांना कळविण्यात आले. दरम्यान, डिसेंबर २०२० पासून आतापर्यंत मनाई आदेश झुगारून वाहतूक करणाऱ्या वाहनचालक आणि मालकांवर कोणतीही कारवाई पोलिस खात्याने केलेली नाही. आरटीओ व महसूल विभागाला कारवाई करायला लावली आहे. त्यामुळे कामात कसूर करणाऱ्यांवर कारवाईसाठी प्रयत्न करणार असल्याचे बरेगार यांनी म्हटले आहे.