
दशावतार कलावंत माळगावकरांना ''जबरदस्त''कडून आर्थिक साहाय्य
05549
माळगाव ः दशावतार कलावंत विराज माळगावकर यांना घरासाठी आर्थिक मदत करताना जबरदस्त सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे पदाधिकारी.
कलावंताच्या मदतीसाठी सरसावले हात
माळगावकरांना सहाय्य; ‘जबरदस्त’चा पुढाकार; बिकट स्थितीची दखल
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २८ ः माळगाव मधलीवाडी (ता. मालवण) येथील दशावतार कलावंत विराज भिवा माळगावकर यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांचे राहते मातीचे घर पडण्याच्या स्थितीत आहे. शासनाच्या घरकुल योजनेपासून वंचित असल्याने नवीन घर बांधणे कठीण झाले आहे. याबाबत सोशल मीडियाद्वारे माहिती मिळताच येथील जबरदस्त सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, राऊळवाडा यांच्यामार्फत माळगावकर यांना घरासाठी लागणारी वाळू व १५ पोती सिमेंटसाठी आर्थिक मदत करण्यात आली.
विराज माळगावकर हा तरुण दशावतार कलेवर नितांत प्रेम करणारा असून हलाखीच्या परिस्थितीशी सामना करत आहे. वयोवृद्ध वडील घरीच असतात, तर आई अर्धांगवायूचा झटका आल्याने अंथरुणाला खिळून आहे. विराज हा दशावतारासह गणेशमूर्तीही बनवितो. या दोन गोष्टींवर त्याचा उदरनिर्वाह अवलंबून आहे; मात्र एकट्याच्या कमाईत आईचे आजारपण, घरगुती खर्च पूर्ण होत नाही. यामुळे आर्थिक झळ सोसावी लागते आहे. अशातच कोसळत्या घराचे संकट ओढवले आहे. मातीचे जुने घर असल्याने भिंती कोसळू लागल्या आहेत. घरासाठी ग्रामपंचायतीकडे मागणी केली; मात्र तीन वर्षे होऊनही अजून घर मिळाले नाही. याबाबत सोशल मीडियाद्वारे माहिती मिळताच जबरदस्त मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन माळगावकर यांची भेट घेत वाळू व सिमेंटसाठी आर्थिक मदत केली. यावेळी मंडळाचे अजित राऊळ, हर्षद रेडकर, ज्ञानेश्वर रेडकर, अमित भोगले, माळगाव उपसरपंच शशिकांत सरनाईक, बापू वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.