ब्रेक निकामी खासगी बसने सात वाहनांना चिरडले

ब्रेक निकामी खासगी बसने सात वाहनांना चिरडले

पान १ साठी


०५५६२
५५९६

भरधाव बसची सात वाहनांना धडक
हातखंब्यात ब्रेक फेलमुळे घटना; चौघे जखमी, वाहनांचे नुकसान
रत्नागिरी, ता. २८ : मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे तीव्र उतारावर ब्रेक निकामी झाल्यामुळे नियंत्रण सुटल्याने खासगी आराम बसने समोरून येणाऱ्या चार वाहनांसह दोन दुचाकींना धडक दिली. अपघातामधील चार जखमींना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. हा अपघात रविवारी (ता. २८) सकाळी झाला.
दरम्यान, ब्रेक निकामी झालेली बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या बँकेच्या जुन्या इमारतीवर जाऊन धडकली. अपघातामुळे काही काळ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. क्रेनच्या साह्याने बस बाजूला घेण्यात आली आहे. या अपघातात बसचालक जखमी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतेही जीवितहानी झालेली नाही.
रविवारी सकाळी ११.४५ वाजता खासगी बस (एमपी ४५ पी १६२६) कोल्हापूरहून रत्नागिरीला चालली होती. हातखंबा येथे उतारावर गाडीचे ब्रेक निकामी झाली आणि चालकाचे नियंत्रण सुटले. चालक काशिफ खान (वय ४७, रा. उत्तर प्रदेश) यांच्या हे लक्षात आले. त्यांनी बसवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. तरीही बसचा वेग कमी न झाल्यामुळे सुरवातीला मोटारीला (एमएच ४६ एपी ४२४३) जोरदार धडक दिली. ती मोटार थेट रस्त्यालगत असलेल्या रेलिंगवर जाऊन अडकली. तेथेच जवळ असलेल्या दुचाकी (एमएच ०८ एम ९०१०) बसच्या धडकेत चेंदामेंदा झाला. पुढे दर्ग्याजवळ येऊन दुसऱ्या मोटारीला (एमएच २४ एएस ७४८२) बसने जबरदस्त धडक दिली. त्या मोटारीचा मागचा टायर निखळला. पुढे बसने हातखंबा गावात आणखी दोन दुचाकींना धडक दिली. त्या रस्त्याच्या बाजूला पडल्या. त्यानंतर बस रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या जुन्या बँकेच्या इमारतीच्या भिंतीवर आदळली. बसचा चालक आतच अडकला होता. त्याला स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. इमारतीजवळील दोन दुचाकींचाही चक्काचूर झाला होता.
अपघात झाल्यानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच नरेंद्रचार्य महाराज रुग्णवाहिकेचे चालक धनेश केतकर यांच्यासह महामार्ग पोलिस केंद्राचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मुकुंद महाडिक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक घन:श्याम जाधव, हेड कॉन्स्टेबल सचिन भरणकर, पांडुरंग लेंडी, संकेत संसारे यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली. अपघातातील जखमींना नाणीज धाम येथील नरेंद्रचार्य महाराज रुग्णवाहिकेतून तत्काळ रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

जखमींत इचलकरंजीतील दोघे
या विचित्र अपघातात बसने एकूण सात वाहनांना धडक दिली. यामध्ये बस चालक काशिफ खान, दुचाकीस्वार शग्गिर अजमिर अंसारी (कोकण नगर), मोटारीतील महेश घोरपडे (इचलकरंजी) आणि जितेंद्रकुमार चौगुले (इचलकरंजी) जखमी झाले आहेत. सुदैवाने मोठ्या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. धडक दिलेल्या सातही वाहनांचे नुकसान झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com