
पावस-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा
लांजातील १२८ महिलांचा
उद्या होणार गौरव
पावस ः लांजा तालुक्यातील १२८ महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला पुरस्कार देऊन ३१ मे रोजी ६४ ग्रामपंचायतीमध्ये गौरविण्यात येणार असल्याची माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी राजेश जुगाडकर यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त ग्रामीण भागात महिला, बाल विकास सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना राज्य सरकारच्या वतीने प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात अहिल्यादेवी सम्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, ५०० रुपये, शाल, श्रीफळ असे सन्मान स्वरूप आहे. नारी शक्तीचा सन्मान करण्याची ही योजना प्रेरणादायी असल्याचे सांगून ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणाला बळ देणारी बाब असल्याचे महिला दक्षता समिती अध्यक्ष स्वप्ना सावंत यांनी सांगितले.
उर्दू विस्तार अधिकारीपदी नसरीन खडस
पावस ः रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागात गेले दीड वर्ष रिक्त असलेले उर्दू शिक्षण अधिकारी पद नसरीन मुश्ताक खडस यांच्या नियुक्तीने भरण्यात आले. उर्दू शिक्षण विस्तार अधिकारी रिक्त पदे भरण्यास उर्दू शिक्षक संघटनेने वारंवार पाठपुरावा केला. विस्तार अधिकारी पदे सेवा ज्येष्ठतेनुसार भरण्यात आली. नसरीन खडस यांनी संगमेश्वर, चिपळूण उर्दू शिक्षण विभागाची विस्तार अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारली. नसरीन खडस यांनी उपशिक्षक, पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख, प्रभारी विस्तार अधिकारी पद यशस्वीरित्या सांभाळले आहे.
वत्कृत्व स्पर्धेत पार्थ ब्रीद प्रथम
पावस ः स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त पर्यटन संचालनालय व विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने वीरभूमी परिक्रमा उपक्रमात राज्यात विविध जिल्हात विविध गटात वत्कृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. रत्नागिरी जिल्ह्यात घेण्यात आलेल्या शालेय गटातील जिल्हास्तरीय वत्कृत्व स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील मिनाताई ठाकरे विद्यालयाच्या
पार्थ केतन ब्रीद याने प्रथम क्रमांक प्राप्त करत घवघवीत यश संपादन केले. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र माने, कार्याध्यक्ष सौ. नेहा माने, मुख्याध्यापक बळवंत नलावडे यांनी त्याचे अभिनंदन केले.
चिपळुणातील नालेसफाई अंतिम टप्प्यात
चिपळूण : पावसाळा तोंडावर असल्याने चिपळूण पालिकेने शहरातील नाले व गटारे सफाईकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. मनुष्यबळासह जेसीबीच्या साह्याने तुंबलेली गटारे व नाले यांची स्वच्छता केली जात आहे. आतापर्यंत ९० टक्के काम पूर्णत्वास गेले आहे. येत्या चार दिवसांत सर्व ठिकाणची साफसफाई मार्गी लागेल, अशी माहिती आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते यांनी दिली. मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक महेश जाधव यांनी विविध भागात सफाई कामागारांच्या टीम केल्या आहेत. मोठे नाले जेसीबीच्या सहाय्याने साफ केले जात आहेत तर जेथे जेसीबी जात नाही तेथील नाले व गटारे सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शहर व परिसरात आजतागायत ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. या नाले आणि गटार सफाईदरम्यान शेकडो टन प्लास्टिकच्या रिकाम्या बॉटल्स, प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक आढळून आल्याने प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे.