नुकसान भरपाई देण्याची बागायतदारांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नुकसान भरपाई देण्याची 
बागायतदारांची मागणी
नुकसान भरपाई देण्याची बागायतदारांची मागणी

नुकसान भरपाई देण्याची बागायतदारांची मागणी

sakal_logo
By

नुकसान भरपाई देण्याची
बागायतदारांची मागणी
वेंगुर्ले ः यावर्षी नैसर्गिक आपत्तीने केवळ १० टक्केच आंबा उत्पन्न मिळाल्याने बागायतदार आर्थिकदृष्ट्या पूर्ण हतबल झाला आहे. जिल्ह्यातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळावी. विम्याची रक्कम ३० जूनपर्यंत मिळावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा आंबा-काजू बागायतदार संघाच्या बैठकीत करण्यात आली. येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात संघाचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. संघटनेच्या उपाध्यक्षा दिव्या वायंगणकर, सचिव अ‍ॅड. शिवराम बोवलकर, शिवराम आरोलकर, विलास ठाकूर, शास्त्रज्ञ अजय मुंज, किशोर नरसुले यांच्यासह आंबा बागायतदार व शास्त्रज्ञ उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे ३० मे रोजी सावंतवाडी येथे येत असून त्यांना मागणीचे निवेदन द्यावे. जून अखेरपर्यंत ही नुकसान भरपाई देण्याबाबतची मागणी करण्याचे ठरविण्यात आले.
-------------------
‘गाळमुक्त’ योजनेसाठी आवाहन
मालवण ः ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’, या योजनेंतर्गत ज्या यंत्रणांचे जलसाठे असतील, त्यांनी तांत्रिक मान्यतेचे अंदाजपत्रक तयार करावे. त्याला प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करताना अशासकीय संस्थेच्या प्रस्तावासोबत शासनाला सादर करावा, असे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे ही योजना राबविताना अशासकीय संस्थेला सोबत घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. ज्या जुन्या जलसाठ्यांची ओळख करणे अडचण होत असेल, अशा तलावातील जलसाठा, गाळ काढण्याचे खर्चाचे अंदाजपत्रक संबंधित विभागाने करावे. ज्या जलसाठ्यातून अशासकीय संस्थांमार्फत गाळ काढण्यात येणार आहे, तो गाळ शेतकरी घेऊन जाणार नसतील, तर त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने करण्याची काळजी संबंधित अशासकीय संस्थेने करावी. शेतकरी स्वत: गाळ काढण्यास इच्छुक असल्यास त्यांनाच अशासकीय संस्था म्हणून ग्राह्य धरावे. यासंदर्भात संपूर्ण तपशील अवनी अ‍ॅपवर सादर करावा, असे म्हटले आहे.
-----------------
तेंडोली परिसरात गव्यांची दहशत
कुडाळ ः तेंडोली परिसरात गव्यांचा वावर वाढला असून शनिवारी (ता. २७) रात्री साडेआठच्या सुमारास तेंडोली-भोमवाडी येथील भोम पुलानजीक रस्त्यावर दुचाकीसमोर अचानक चार गव्यांचा कळप आडवा आला. यावेळी मागून मोटारीने घरी जात असलेले तेंडोली पोलिसपाटील संजय नाईक यांना हा कळप दिसला. त्यांनी मोटार थांबवून गव्यांच्या कळपाचे चित्रीकरण केले. या भागात भुईमूग, नाचणी, भाजीपाला, भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. गेले पंधरा दिवस या भागात गव्यांचा वावर असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती आहे. आता शेती हंगाम सुरू होणार आहे. ऐन शेतीच्या हंगामात या भागात गव्यांनी ठाण मांडल्यास नुकसान होण्याची भीती असून वनविभागाने दखल घेण्याची मागणी होत आहे.