भरड धान्य उत्पादनात अग्रेसर व्हा

भरड धान्य उत्पादनात अग्रेसर व्हा

05755
सिंधुदुर्गनगरी ः सिंधुदुर्ग भरड धान्य अभियानांतर्गत प्रात्यक्षिक प्रक्षेत्र लागवड व मोफत बियाणे वाटप कार्यक्रमाचा प्रारंभ करताना जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पालकमंत्री रविंद्र चव्हाण आदी.


भरड धान्य उत्पादनात अग्रेसर व्हा

पालकमंत्री रविंद्र चव्हाण; सिंधुदुर्गनगरीत अभियानाचा प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २९ ः भरड धान्याची बियाणे ही खऱ्या अर्थाने संपत्ती आहे. ही संपत्ती शेतकऱ्यांना दिली जात आहे. या संपत्तीमधून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्गला अग्रेसर ठेवा, असे आवाहन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग, सिंधु आत्मनिर्भर अभियान, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सिंधुदुर्ग भरड धान्य अभियानांतर्गत प्रात्यक्षिक प्रक्षेत्र लागवड व मोफत बियाणे वाटपाचा प्रारंभ पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते आज झाला. याप्रसंगी आमदार नीतेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार राजन तेली, प्रभाकर सावंत उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.चव्हाण म्हणाले, ‘‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताने जगाला सुचविले आणि जगाने मान्य करुन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जातेय. ही पिके आपल्या पूर्वजांची ठेव आहे. तिला वृद्धींगत करण्याचे काम करावयाचे आहे. लागवडीनंतर पीक येईपर्यंत त्याची निगा कशी राखावयाची? याचे मार्गदर्शन तज्ज्ञ करणार आहेत. शिवाय अधिकचे ज्ञान देण्याचे कामही या अभियानातून होणार आहे. पूर्वजांची ही संपत्ती आपल्याकडे दिली जात आहे. त्यामध्ये अधिकाधिक क्षेत्र लागवडीखाली आणून भरड धान्याच्या उत्पादनात जिल्ह्याला अग्रेसर ठेवा. शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न मिळायला हवे. त्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे. यासाठी प्रधानमंत्री मोदी सातत्याने शेतकऱ्यांपर्यंत विषय मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहिला पाहिजे. यासाठी किसान सन्मान योजनेतून २-२ हजार असे ६ हजार रुपये देण्याचे काम सुरू केले आहे.’’
श्री. काळसेकर यांनी, १० हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून १८७ प्रात्यक्षिक प्रक्षेत्र करण्यासाठी ५ टन बियाणे गोळा केल्याचे सांगून जिल्ह्याची ओळख भरडधान्यांचा जिल्हा अशी होईल, असे सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राऊत यांनीही, बदलत्या जीवनशैलीसह आहारातही बदल झाला. भरड धान्यांच्या आहारातील महत्व आणि त्याची जनजागृती हाच उद्धेश या अभियानाचा असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात फोंडाघाट येथील भात संशोधन केंद्राचे डॉ. विजयकुमार शेटये यांचे, भरड धान्य आहारातील महत्व, लागवड व प्रक्रीया तंत्रज्ञान विषयावर मार्गदर्शन झाले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने तयार कलेली भरड धान्याचे महत्ववरील चित्राफितही प्रदर्शित केली गेली. नीलेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघाचे संदीप राणे यांनी आभार मानले.
---------
चौकट
योजनांचे भागीदार होण्याचे आवाहन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनानेही येणाऱ्या काळात ६ हजार रुपये देण्याचे काम सुरू केले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना होऊ लागला तर त्याला चाकरमानी होण्याची गरज नाही. पुढच्या पिढीचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सरकारच्या प्रत्येक योजनांचे भागीदार व्हा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.
---
चौकट
सात प्रकारच्या भरड धान्यांचे वाटप
पालकमंत्री चव्हाण आणि उपस्थितांच्या हस्ते अरुण कावले, शिवाजी रासम, दिप्ती सावंत, महेश संसारे, दयाळ अपराज, फटी गवस, सातु जाधव, महादेव सापळे, गोविंद केसरकर, प्रदीप सावंत, गितेश परब, देवकी कदम, नारायण गवस या शेतकऱ्यांना प्रतिनिधिक स्वरुपात सात प्रकारच्या भरड धान्यांच्या बियाण्यांची रवळी देण्यात आली.
----------
चौकट
कृषी सहायक, पर्यवेक्षकांचा सत्कार
यावेळी उल्लेखनीय काम करणाऱ्या कृषी सहायक रश्मी कुडाळकर, नाजुका पावडे, धंनजय कदम, चंद्रशेखर रेडकर, कृषी पर्यवेक्षक धनंजय गावडे, विस्तार अधिकारी (कृषी) एकनाथ सावंत आणि रांगोळीकार संजय गोसावी यांचा सत्कार झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com