टंचाईची तीव्रता यंदा वाढली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टंचाईची तीव्रता यंदा वाढली
टंचाईची तीव्रता यंदा वाढली

टंचाईची तीव्रता यंदा वाढली

sakal_logo
By

टंचाईची तीव्रता यंदा वाढली

प्रशासनाचा अंदाज फसला; कागदोपत्री मात्र देवगडचीच नोंद

ओरोस, ता. ३० ः यावर्षी अवेळी व मॉन्सूनपूर्व पाऊस पडला नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपेक्षा यावर्षी पाण्याची पातळी खालावली आहे. परिणामी नागरिक व प्रशासनाचा अंदाज फसला आहे. पाणीटंचाई जाणवणार नाही, असा अंदाज असताना प्रत्यक्षात जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणीटंचाई जाणवू लागली आहे; मात्र, देवगड तालुका वगळता जिल्ह्यात अन्यत्र कोठेच कागदोपत्री ही टंचाई अद्याप नोंद झालेली नाही. केवळ देवगड तालुक्यातून पाणी टंचाई आराखडा प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यात मागील दोन वर्षांत जवळ जवळ वर्षभर अधून मधून पाऊस पडत होता. त्यामुळे पाण्याची पातळी अजिबात खालावली नव्हती. परिणामी पाणी अडविण्यासाठी बांधण्यात येणारे बंधाऱ्यांची संख्याही कमी झाली होती. दोन वर्षांत असलेले पावसाचे सातत्य यावर्षीही कायम राहील, असा अंदाज व्यक्त होत होता. त्यामुळे यावर्षी पाणी टंचाई आराखडे तयार केले गेले नाहीत. जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे प्रत्येक तालुक्यांना संभाव्य पाणी टंचाई आराखडे तयार करून कळविण्यास सांगितले होते; परंतु, जिल्ह्यातील आठही तालुक्यांनी संभाव्य पाणी टंचाई नसल्याचे म्हणत निरंक म्हणून कळविले होते.
जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे डिसेंबरपासून संभाव्य पाणी टंचाई आराखडे तयार केले जातात. त्यानंतर पुन्हा मार्च, एप्रिलमध्ये दुसरा आराखडा तयार केला जातो. मेमध्ये प्रत्यक्षात टंचाई जाणवणाऱ्या गावांचा टंचाई आराखडा तयार करून तो जिल्हाधिकऱ्यांकडे मंजुरीसाठी दिला जातो. जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यावर प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली जाते; मात्र, यावर्षी जिल्ह्यात अनेक ठिकाणी भीषण पाणी टंचाई जाणवत असताना अद्याप एकाही कामाला जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्यता मिळालेली नाही. वस्तूतः यासाठी आवश्यक मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविलेली नाही.
जिल्ह्याच्या बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत असताना केवळ देवगड तालुक्यातून पाणी टंचाई आराखडा प्राप्त झाला आहे. या शिवाय कणकवली व मालवण तालुक्यातून प्रत्येकी एका ग्रामपंचायतीने पाणी टंचाई अंतर्गत कामाची मागणी केली आहे. अन्य तालुक्यातून मागणी झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात प्रत्यक्ष टंचाई असताना शासनाच्या कागदोपत्री मात्र त्याची नोंद दिसत नाही.
----------
चौकट
...म्हणून पूर्वतयारी नाही
जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी आपल्या गावात टंचाई नसल्याचे कळविल्याने संभाव्य टंचाई निवारणार्थ करण्यात येणारी पूर्वतयारी केलेली नाही. आराखडेच तयार नसल्याने मागणीपत्र मागविण्याचा प्रश्नच आला नाही; मात्र, मार्च ते एप्रिल या तीन महिन्यांत अवेळी अथवा मॉन्सूनपूर्व पाऊस जिल्ह्यातील मोजका भाग वगळता अन्य भागात पडला नसल्याने पाणी पातळी प्रचंड खालावली आहे. त्याचा दृष्परिणाम पिण्याच्या पाण्यावर झाला. पाण्याचे स्त्रोत आटल्याने पाणी मिळेनासे झाले आहे. विहिरी, तलाव कोरडे पडले आहेत.
----------
कोट
संभाव्य पाणीटंचाई आराखडे पाठविण्याचे लेखी कळविले होते. कोणत्याही तालुक्याकडून आराखडे प्राप्त झाले नाहीत. सध्या केवळ देवगड तालुक्याचा आराखडा व मालवण आणि कणकवली तालुक्यातील एका ग्रामपंचायतीने मागणी प्राप्त झाली आहे.
- सचिन कोरगावकर, जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग