वंदे भारतचे तीन जूनला उद्घाटन

वंदे भारतचे तीन जूनला उद्घाटन

वंदे भारतचे
तीन जूनला उद्घाटन
रत्नागिरीः गेल्या काही दिवसांपासून मुंबई कोकणसह गोवावासियांमध्ये उत्सुकता ताणून राहिलेल्या मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारतला अखेर ३ जूनला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. ५ जूनपासून ही सेमी हायस्पीड ट्रेन प्रवाशांच्या नियमित सेवेसाठी दाखल होणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३ जूनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ही गाडी ५ जूनपासून प्रवाशांच्या नियमित सेवेत दाखल होणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून ही गाडी पहाटे ५ वाजून ३५ मिनिटांनी, ठाणे येथून सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी, पनवेल येथून सकाळी सहा वाजून ४० मिनिटांनी, खेड येथून सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी तर रत्नागिरीला भारत एक्स्प्रेस सकाळी दहा वाजता येईल. दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी ही गाडी गोव्यात मडगावला पोहोचेल. मडगाव येथून वंदे भारत एक्स्प्रेस दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी मुंबईसाठी सुटेल. परतीच्या प्रवासात असताना ही गाडी रत्नागिरी येथून पाच वाजून ३५ मिनिटांनी तर खेड इथून ६ वाजून ४८ मिनिटांनी मुंबईच्या दिशेने रवाना होईल. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसला ही गाडी रात्री १० वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल.
--------------
पाठ्यपुस्तकांच्या
किमतीत वाढ
रत्नागिरीः शाळांचा वार्षिक निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पुढील वर्षाच्या पाठ्यपुस्तकांची खरेदीची लगबग सुरू झाली आहे. महागाईमुळे शिक्षणासाठीचा खर्च वाढल्याने पालकांवर आर्थिक बोजा पडत आहे. यंदा जीएसटीमुळे पाठ्यपुस्तकांच्या किमतीत वाढ झाल्याने जुन्याच पाठ्यपुस्तकांसाठी पालकांची धावपळ सुरू आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे. सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले असताना आता शैक्षणिक साहित्यावर आकारल्या जाणाऱ्या भरमसाठ जीएसटीमुळे शिक्षणही महागले आहे. कागदाचे वाढलेले दर, नवीन अभ्यासक्रम, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य विषयांच्या पाठ्यपुस्तकांची एकूण भागामध्ये विभागणी, वैकल्पिक विषयांची पाठ्यपुस्तके आदींमुळे पहिली ते दहावीच्या पुस्तकांच्या किमतीत ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकीकडे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे; पण दुसरीकडे पालकांच्या खिशाला फटका बसत आहे. कारण, खासगी प्रकाशनांकडून सराव तसेच मार्गदर्शक पुस्तके छापली जात आहेत. त्यांच्या दरामध्ये प्रचंड वाढ झाली आहे, तर इंधन दरवाढीमुळे स्कूलबसच्या शुल्कातही १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.
-----------
चिपळुणात आज,
उद्या व्याख्यानमाला
चिपळूणः धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्धापनदिनानिमित्त श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने व्याख्यानमाला व मानवंदना कार्यक्रम १ आणि २ जूनला सायं. ६ वा. शहरातील भोगाळे येथील माधव सभागृह येथे आयोजित केला आहे. या वेळी प्रा. डॉ. अरूण बाराव घोडके यांचे व्याख्यान होणार आहे. प्रा. डॉ. अरूण घोडके इस्मालमपूर (सांगली) येथील असून, ३१ वर्षात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावर देश- विदेशात पाच हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. २ जूनला सकाळी ८.३० वा. गोविंदगड येथे श्री देवी करंजेश्‍वरी व श्री देव सोमेश्‍वर देवस्थान सहयोगाने छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना समारंभ आयोजित केला आहे. या कार्यकमांना चिपळूणवासियांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मोहनशेठ मिरगल, रमण डांगे, प्रभंजन पिंपुटकर, सीमा रानडे, विलास चौघुले, सुनील कुलकर्णी, शेखर सावले यांनी मंडळाच्या वतीने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com