फडणवीसांहस्ते पोलिस वसाहतीची पायाभरणी 10 रोजी

फडणवीसांहस्ते पोलिस वसाहतीची पायाभरणी 10 रोजी

उपमुख्यमंत्री फडणवीसां हस्ते होणार
पोलिस वसाहतीची पायाभरणी
उदय सामंत ; अद्ययावत १४ मजली इमारती उभ्या राहणार
रत्नागिरी, ता. १ : पोलिस कर्मचारी वसाहत, जिल्हा पोलिस मुख्यालय व अन्य इमारतींच्या पायाभरणी समारंभासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस १० किंवा ११ जूनला रत्नागिरीत येणार आहेत. इंग्रजांच्या कालावधीतील या इमारती असून मागील ८० वर्षे त्यांची फक्त डागडूजी केली जात होती. मात्र आता अद्ययावत १४ मजली इमारती उभ्या राहणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
या उपक्रमानिमित्त राज्यातील सर्व पोलिस बॅण्डची राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सामंत म्हणाले, जिल्हा पोलिस मुख्यालयातील वसाहती या इंग्रजांच्या कालावधीतील आहेत. आतापर्यंत त्यांची डागडूजी केली जात होती. मात्र या ठिकाणी आता अद्ययावत १४ मजली इमारती उभ्या राहणार आहेत. पोलिस मुख्यालय, हॉल व अन्य इमारतींची बांधकामेही या ठिकाणी केली जाणार आहेत. यासाठी तब्बल १२९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. गृह व कार्यालयीन प्रकल्पांची निविदा प्रक्रियाही करण्यात आली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ केला जाणार आहे.
या निमित्ताने राज्यातील सर्व जिल्ह्यातील पोलिस बॅण्ड पथकांची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यातील विजेत्याला ५ लाख, उपविजेत्याला ३ लाख तर तृतिय क्रमांकाला २ लाखाचे पारितोषिक दिले जाणार आहे. हे पारितोषिक पोलिस कल्याण निधीमध्ये जमा केले जाणार आहे. पारितोषिकातील २५ टक्के रक्कम ही पोलिस बॅण्डच्या अपग्रेडेशनसाठी खर्च करता येणार आहे. या स्पर्धेनिमित्त राष्ट्रगीत, राज्यगीत व सारे जहाँ से अच्छा ही गाणी सादर करावी लागणार आहेत. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून प्रसिध्द गायक सुदेश भोसले, संगीतकार मयुरेश पै, संगीत संयोजक नितीन शंकर हे काम पाहणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. भूमिपूजन समारंभाची तयारी सुरु असल्याचेही मंत्री सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com