
निसर्गाच्या पर्जन्यसंकेतावर अरण्यऋषींचे चिंतन
rat5p20.jpg -
07202
अरण्यऋषी मारूती चितमपल्ली यांना पुष्प देताना धीरज वाटेकर आणि विलास महाडिक.
--------
इंट्रो
पर्यटन-पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते, लेखक धीरज वाटेकर आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष, चिपळूण तालुक्यात पहिले कृषी पर्यटन केंद्र उभारणारे विलास महाडिक यांनी अरण्यऋषी मारूती चितमपल्ली यांच्याशी ‘कोकण निसर्ग आणि पर्यावरण’बाबत नुकताच संवाद साधला. या संवादातील काही महत्वाच्या मुद्यांची वाटेकर यांनी घेतलेली नोंद .........!
-----------------------------
निसर्गाच्या पर्जन्यसंकेतावर अरण्यऋषींचे चिंतन
सेवानिवृत्तीनंतर चितमपल्लींनी कोकणात समुद्रकिनाऱ्यावर काळ घालवला. समुद्राचे अथांग विश्व आणि त्यात राहणारे लाखो जीव म्हणजे मानवाला न उलगडणारे निसर्गचक्र आहे. अगदी बारीकसारीक घटनांवर नजर ठेवली तर काही पूर्वसंकेतांची चाहूल मिळते. पाऊस येण्याअगोदर वादळी पक्षी किनाऱ्याच्या दिशेने येऊ लागतात. त्यामुळे पाऊस पडणार याचे संकेत ओळखून समुद्रावर उपजीविका करणारे मच्छिमार आपल्या बोटी, जहाजे, पडाव समुद्रात नेत नाहीत. अशावेळी केव्हाही पाऊस कोसळण्याची शक्यता असते. समुद्रातील माशांमध्ये एकदम खळबळ माजते. त्यांच्या हालचाली अत्यंत गतिमान होऊन ते समुद्रात उंच उड्या मारू लागतात. हे चित्र नवीन पिढीने समुद्रकिनाऱ्याशेजारी मुक्काम ठोकून अवश्य निरखावे, असे ते म्हणाले. समुद्रातील प्राण्यांनी अस्वस्थ हालचाली सुरू केल्यानंतर समुद्रातून प्रचंड असे आवाज येऊ लागतात. वादळी पाखरू किनाऱ्याच्या दिशेने आले की, वादळवारा त्याच्या पाठोपाठ येत आहे याचे संकेत कोळ्यांना मिळतात. एकप्रकारे ती धोक्याची पूर्वसूचनाच असते. पहिल्या पावसानंतर नदीनाले, ओढे, तलावांचे पाणी समुद्राला येऊन मिळू लागते तसे मासे त्या पाण्यात उड्या मारून प्रवेश करतात आणि प्रवाहाच्या उलट दिशेने जाऊ लागतात. डोंगर, पहाडी भागातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्यात ते अंडी घालतात आणि पुन्हा सरळ दिशेने समुद्रात परततात. हे नैसर्गिक जीवनचक्र आहे. या बाबतीत अत्यंत बारकाईने निरीक्षण केले असता पहाडी, डोंगरी भागातील माशांच्या अंड्यांतील पिल्ले मोठी होऊन जेव्हा समुद्राच्या दिशेने पोहू लागतात तेव्हा तो काळ पाऊस संपण्याचा.. उत्तरा नक्षत्राचा असतो. त्यामुळे पाऊस केव्हा पडणार आणि केव्हा संपणार, याची सुस्पष्ट चाहूल माशांच्या या जीवनचक्रातून मिळते.
पावसाळ्याच्या सुरवातीला तांबूस रंगाचे खेकडे हजारोंच्या संख्येने समुद्राच्या दिशेने जाताना दिसतात. त्यांच्या मार्गाचे निरीक्षण केले असता अशा अनेक अभूतपूर्व घटना पाहावयास मिळतात. समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या खेकड्यांवरून शेतकऱ्याला पावसाचे संकेत मिळतात. हा खेकड्यांच्या स्थलांतरणाचा कालखंड आहे. भरधाव वाहनांखाली असे हजारो खेकडे दरवर्षी समुद्राकडील प्रवासादरम्यान चिरडले जातात. त्यांची समुद्री धाव कशासाठी असते याचा विचार करायला हवा. आज पाऊस केव्हा आणि किती पडणार, हे सांगणारी पशुपक्ष्यांच्या प्रजाती आज धोक्यात आल्या आहेत. समुद्रात कित्येक किलोमीटर आत होडी घालून मासेमारी करताना, कोळी बांधवांनीही गरम पाण्यात तांदूळ शिजवून भर समुद्रात चितमपल्ली शाकाहारी असल्याने त्यांची काळजी घेतली होती. कोकणातील खेकड्यांचे प्रकार, केळशीतील वाळूतलं होरं, मुरूडचे डॉल्फिन, त्यांच्या सवयी आदींसह कोकणाविषयी ते भरभरून बोलले.
कोकण प्रदेशात वनाधिकारी म्हणून 5 वर्षे चितमपल्ली यांनी कर्नाळा अभयारण्यात काम केले. तेव्हा ते अभयारण्य नव्हते. कर्नाळा पक्षी अभयारण्य डॉ. सलिम अली यांच्या पाठपुराव्यातून स्थापन झालं. 20 वर्षे डॉ. अली यांच्या संपर्कात राहायची संधी मिळाली. त्यांचे हस्ताक्षर उत्तम होते. त्यांनीच डायऱ्या लिहायला सांगितल्या. अलिबागच्याजवळ असलेल्या किहीम गावात समुद्रकिनाऱ्यावर त्यांचा बंगला होता. मुंबईहून जाता-येता ते कर्नाळ्याला थांबायचे. त्यांनी निसर्ग जगायला शिकवला. ‘माझं जीवन मी तुम्हाला देतो, तुमचं जीवन मला द्या’, असं ते म्हणायचे, असं चितमपल्ली म्हणाले.
-------------------------
चौकट
कर्नाळा अभयारण्य हे डॉ. सलीम अली यांचे संशोधन
चार चौरस किमीचे क्षेत्रफळ असलेले कर्नाळा अभयारण्य हे डॉ. अली यांचे संशोधन होते. कर्नाळ्यात निसर्ग आणि पर्यावरणाची, पक्ष्यांची योग्य जाणीव असलेल्या वनाधिकाऱ्याची नेमणूक व्हावी अशी त्यांची इच्छा होती. कर्नाळ्यात काही दुर्मिळ पक्ष्यांचे वास्तव्य होते. त्यांच्या इच्छेला माझ्या नेमणुकीची जोड मिळाली असावी. अली दर आठवड्याला मुंबईहून कर्नाळ्याला भेट द्यायचे. अलिबागला जाता-येता थांबायचे. संवाद करायचे. त्यांच्याकडून पक्षी हा विषय शिकायला मिळाला. अनेक नामवंतांच्या ओळखी झाल्या.