तळकोकणात कौलारु घरे होताहेत दुर्मिळ

तळकोकणात कौलारु घरे होताहेत दुर्मिळ

07504
07505
सावंतवाडी ः शहरातील काही भागात अशी कौलारु तसेच मेंगलोर कौलांची घरे दृष्टीस पडत आहेत. (छायाचित्र ः निखिल माळकर)

तळकोकणात कौलारु घरे होताहेत दुर्मिळ

स्लॅबचे जंगल; कोकणच्या संस्कृतीची ओळखच हरवतेय

निखिल माळकर ः सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ ः मानवाच्या मूलभूत गरजांपैकी निवारा ही महत्त्वाची गरज आहे. पूर्वी कोकणात बरीच कौलारू छत असलेली घरे दिसत होती; मात्र अलिकडे लाकूडफाटा, कुशल कामगार सहजासहजी मिळत नाही. तसेच वारंवार घर दुरुस्तीसाठी येणारा खर्च आदी कारणांमुळे कौलारू छताची घरे कुणीही बांधताना दिसून येत नाही. त्यामुळे तळकोकणची ओळख असलेली कौलारु घरे आता येथे दुर्मिळ होऊ लागली आहेत.
कोकणी माणसाची समूहाने काम करणे ही खासियत आहे. मग ती समूह शेती असेल, भात लावणी, कापणी असेल, बंधारा उभारणी असेल अथवा विविध प्रथा परंपरा असतील.
पावसाळ्याआधी ‘कौले परतणे’ किंवा ‘नळे परतणे’ हा त्यातलाच एक प्रकार. तो आता नजरेस पडणेही मुश्कील होऊन बसले आहे. मोठी कुटुंब आता छोटी बनली आहेत. त्याचबरोबरीने नळ्यांची जागा कौलांनी, कौलांची जागा पत्र्यांनी व पुढे जाऊन पत्र्यांची जागा स्लॅबने घेतली. पुर्वीच्या काळातील नळे आणि कौलारू घरात जो गारवा होता तो पंखे आणि एसीपेक्षाही अधिक आनंद देणारा होता. आज हा आनंद काँक्रिटच्या जंगलात आपण हरवुन बसलो आहोत. तळकोकणातील घराच्या, गावच्या ओढीने मुंबईकर चाकरमानी गावात येतात. गावच्या बंगल्यात राहतात; परंतु अनेकांना त्यांची-त्यांची जुनी घर आठवली की अस्वस्थ करतात. मग गावात गप्पांमध्ये रंगणारे सर्वजण जुन्या गप्पांमध्ये रंगून जातात. पूर्वी कोकणात बरीच कौलारू छत असलेली घरे दिसत होती; पण आता ती दुर्मिळ झाली आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. लाकूडफाटा, कुशल कामगार सहजासहजी मिळत नसल्याने तसेच वारंवार घर दुरुस्तीसाठी येणारा खर्च आदी कारणांमुळे कौलारू छताची घरे बांधताना आता दिसून येत नाहीत. त्यामुळे तळकोकणची ओळख असलेली कौलारु घरे आता येथे दुर्मिळ होऊ लागली आहेत. बदलती जीवनशैलीही याला कारणीभूत ठरत आहे. यावर्षीच्या अति उष्म्याने अवघ कोकण हैराण झाला आहे. अर्थात उष्णतेचे प्रमाण एवढे वाढले आहे की पुढील काहीवर्षात हा उष्णतेचा पारा कसा वाढत जाईल, याची कल्पना आपण करु शकतो.
........
चौकट
कौल कारखाने संकटात
कोकणचा कौल कारखाना हा पूर्वी मोठा व्यवसाय होता. सुरुवातीला या व्यवसायावर कुंभार समाजाची मक्तेदारी होती; पण कालांतराने म्हणजे १८५० मध्ये जर्मन उद्योगपतीने मेंगलोर येथे पहिली कौलाची फॅक्‍टरी सुरू केली आणि घराच्या छपरावर गावठी नळ्याची जागा टप्याटप्याने मेंगलोर कौलांनी घेतली. त्याकाळी मेंगलोर येथे तयार होणारी कौले कोकणात आणणे आणि ती आपल्या घरांच्या छपरावर घालणे सर्वांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातील कारखाने या भागात स्थापन झाले. या कौलांना स्थानिकांनी पसंती दिली. त्यामुळे जिल्ह्यात सुरू झालेल्या कारखान्यांमधून तयार होणारी कौले स्थानिकांना आर्थिकदृष्ट्या परवडू लागली. हळूहळू घरांच्या छपरावरील नळे गेले व मंगलोरी कौले आली. कौलाचे कारखाने आर्थिकदृष्ट्या चांगले चालू लागले. हजारो लोकांना रोजगार मिळू लागला. त्यामुळे त्याकाळी शासनाचे याकडे लक्ष गेले व शासनाच्या जाचक अटीचा सामना या व्यवसायावर होऊ लागला. शासनाने मातीवर रॉयल्टी भरमसाठ सुरू केली. पक्‍क्‍या मालावर व्हॅट व आता जीएसटी लावला. या व्यवसायाला लागणारे इंधन म्हणजे लाकूड व लाकूडतोड्याला बंदी आणली. पर्यावरणाची परवानगी मिळणे कठीण झाले. लोक स्लॅब, पत्र्याची घरे बांधू लागले आणि त्यामुले कौल कारखाने संकटात आले आहेत.
.........
चौकट
‘घर शिवणे’ प्रथा बंद
पूर्वी पावसळय़ा आधी घरावरील कौलांची डागडुजी केली जाते. वर्षभरात फुटलेली ,सरकलेली कौले दरवषी नीट लावली जातात. या कामाला ग्रामीण भागात ‘घर शिवणे’ म्हणत असत. मे महिन्याच्या दुसऱया किंवा तिसऱया आठवडयाल्या ही कामे केली जात असत. यासाठी वाडय़ावरील प्रत्येक घरातील जुनीजाणती माणसे एकमेकाकडे जावून ही कामे करत असतात. सध्या मात्र अनेक ठिकाणी कौले काढून पत्रे वापरले जात असल्याने हे काम करणारे मजूर सुद्धा उरले नाहीत. त्यामुळे ‘घर शिवणे’ ही प्रथा बंद पडली आहे.
..........
चौकट
ग्रामीण घरांना नवा लूक
शहरासह आता ग्रामीण भागातही मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर तसेच आजुबाजूला पपई, अशोका व इतर झाडे लावण्यावर भर दिला जात आहे. घरालगत मोकळ्या जागेत विविध प्रजातीची फुलझाडे, फळझाडे, अन्य प्रकारची झाडे लावली जात आहेत. गावखेड्यातही कधी न दिसणारे मुख्य प्रवेशद्वार आता तयार केले जात आहे. शिवाय ग्रामीण भागात पोर्च, बेडरूम, किचन, बाथरूम, शौचालय व इतर सोयी-सुविधांनीयुक्त घरांची निर्मिती केली जात आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही आता घरांना नवा लूक येत असल्याचे दिसून येते.
........
कोट
पंधरा वर्षांपूर्वी एका वाडीतले काहीजण जमून नळे परतणीच काम करत होतो. तो आनंद वेगळाच होता; मात्र आता काळानुसार घरे बदलली आणि कौल परतणे किंवा नळे परतणे दुर्मिळ झाले. युवा पिढी सुद्धा या अशा कामांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळेच जुन्या संस्कृती लोप पावत आहे.
- अनंत माळकर, जुने कुशल कामगार
...........
कोट
पूर्वी आम्ही ही कामे एप्रिल, मे महिन्यात करत होतो. सुमारे २० ते २५ घरांची कौल परतण्याची कामे आम्ही त्यावेळी करत होतो; मात्र कालांतराने ती संख्या कमी झाली. आता एकही कौल किंवा नळे परतण्याचे कामे येत नाहीत.
- अभय गावडे, जुने कुशल कामगार
..........
कोट
नेमळे सहकारी कौल उत्पादन संस्था अडचणीत आली आहे. आज उत्पादीत माल पडून आहे. शासनाच्या मदतीची खरी गरज आहे. नवीन घरे बांधताना शक्यतो कौलारू नळ्यांचा वापर होत नाही. हळूहळू तळकोकणातून कौलारु घरे नामशेष होतील. याचा परिणाम कारखान्यांवर होईल.
- आत्माराम राऊळ, अध्यक्ष, नेमळे सहकारी कौल उत्पादन संस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com