
मालवाहतुकीमुळे तीन वर्षांत 5 कोटी उत्पन्न
मालवाहतुकीमुळे तीन वर्षांत ५ कोटी उत्पन्न
एसटीला अच्छे दिन; आंबा वाहतुकीलाही प्रतिसाद
रत्नागिरी, ता. ७ः कोरोना काळात लॉकडाउनमुळे आंबा वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या वेळी राज्य परिवहन महामंडळाने तत्परता दर्शवत आंब्यासाठी एसटीची माल वाहतूक सुरू केली. तेव्हापासून माल वाहतुकीमुळे एसटीला उत्पन्नाचा आधार प्राप्त झाला आहे. गेल्या तीन वर्षांत माल वाहतुकीमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाला ५ कोटी ९८ लाख ५४ हजार ७४३ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
माल वाहतूक करणाऱ्या अन्य वाहनांपेक्षा एसटीचे माल वाहतुकीचे दर कमी आहेत. त्याचबरोबर विश्वासार्हता, सुरक्षितता यामुळे वाहतुकीला चांगला प्रतिसाद लाभत आहे. कंपन्यांकडून एसटीकडे थेट संपर्क साधला जात आहे. कोरोना काळात एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती; मात्र माल वाहतूक सुरू होती. २०२१च्या नोव्हेंबरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे सुरू झालेले कामबंद आंदोलन एप्रिल २०२२ मध्ये संपले. त्यानुसार कर्मचारी हजर झाल्यानंतरच ५ महिन्यानंतर माल वाहतूक सुरू झाली. त्यामुळे एसटीच्या माल वाहतूक उत्पन्नावर परिणाम झाला.
रत्नागिरी विभागाकडे ५० माल वाहतूक ट्रक असून, त्या द्वारे माल वाहतूक सुरू आहे. लॉकडाउनमध्ये माल वाहतुकीमुळे एसटीचे उत्पन्न सुरू होते; मात्र, कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे एसटीसह माल वाहतूक उत्पन्नावर परिणाम झाला. एसटीचे आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असल्याने २०२३ उत्पन्न अवघ्या दोन महिन्यांचे आहे. त्यामुळे वर्षभरात आधीच्या उत्पन्नाची सरासरी भरून काढणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आंबापेटीपासून मालवाहतूक सुरू झाली. त्यानंतर सिमेंट, साखर, कौले, जांभा दगड, विटा, आंबा, काजू, नारळ, सुपारी कलमे, पत्रे, पाईप, तांदूळ, गहू या सारख्या विविध वस्तूंची वाहतूक करण्यात येत आहे. प्रवासी वाहतुकीपासून एसटीने विश्वासार्हता जपली आहे. त्यामुळे माल वाहतुकीसाठीही चांगला प्रतिसाद लाभत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, सिंधुदुर्ग, नाशिक, अमरावती, नांदेड, परभणी, पुणे, जळगाव, जालना या जिल्ह्यांतून एसटीची मालवाहतूक सुरू आहे.
चौकट
चार वर्षांतील उत्पन्न (रुपयांत)
* २०२०- २ कोटी ९१ लाख १३ हजार १९४
* २०२१- २ कोटी २० लाख २० हजार ३९६
* २०२२- ५८ लाख ४९ हजार ५३५
* २०२३- २८ लाख ७१ हजार ६१८