दहिसर चेकनाका ते भाईंदर 
पश्चिम मेट्रोच्या कामाची रखडपट्टी

दहिसर चेकनाका ते भाईंदर पश्चिम मेट्रोच्या कामाची रखडपट्टी

दहिसर चेकनाका ते भाईंदर
पश्चिम मेट्रोच्या कामाची रखडपट्टी
भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात दहिसर चेकनाका ते भाईंदर पश्चिम या प्रमुख मार्गावर मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे; परंतु मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांना पडलेले खड्डे, उघडी गटारे, रस्त्यावर पडलेला राडारोडा आदी कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे; मात्र ही कामे अतिशय संथगतीने सुरू असल्यामुळे आमदार प्रताप सरनाईक यांनी संताप व्यक्त केला आहे. पावसाळ्यापूर्वीची कामे चार दिवसांत पूर्ण करा; अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागेल, असा इशारा सरनाईक यांनी दिला आहे.
आमदार प्रताप सरनाईक यांनी दहिसर ते मिरा-भाईंदर या मेट्रो मार्ग क्र ९ च्या कामाची मंगळवारी (ता. ६) पाहणी केली. या वेळी आमदार गीता जैन, मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले, मेट्रोचे संचालक प्रमोद आहुजा, मेट्रो कामाच्या कार्यकारी अभियंता योजना पाटील, महापालिकेचे शहर अभियंता दीपक खांबित आदी उपस्थित होते. मेट्रोचे काम गेली तीन वर्षे सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत. यामुळे अपघात होत आहेत. मेट्रोच्या कामाचे साहित्य, डेब्रिज रस्त्याच्या कडेला पडून आहे. यावर आमदार सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
--
महापालिका शाळेत शिक्षक भरती
भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शाळांमधून कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची भरती केली जात आहे. त्यासाठी मंगळवारू (ता. ६) पासून मुलाखतींना सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या मराठी, हिंदी, गुजराती व ऊर्दू माध्यमांच्या ३६ शाळांमध्ये शिक्षकांच्या एकंदर २६ जागा रिक्त आहेत. त्यात प्राथमिक विभागाच्या ११ व माध्यमिक विभागाच्या १५ जागांचा समावेश आहे. येत्या १५ जूनपासून शाळा सुरू होत असल्यामुळे रिक्त असलेल्या जागा भरण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. हे सर्व शिक्षक कंत्राटी स्वरुपात महापालिकेच्या आस्थापनेवर घेतले जाणार आहेत. गेल्या वर्षीपासून नववीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. त्यावेळीदेखील कंत्राटी शिक्षक घेण्यात आले होते; परंतु त्यातील काही शिक्षक सोडून गेले. त्याचप्रमाणे यावर्षी दहावीचे वर्गही सुरू होणार आहेत. त्यासाठी विषयानुसार शिक्षकांची आवश्यकता भासणार आहे.
--
मुंबई विद्यापीठाला कुलगुरू कधी मिळणार?
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंसाठी कुलपती तथा राज्यपालांमार्फत पाच जणांच्या अंतिम मुलाखती होऊन आता अनेक आठवडे उलटत आले तरी त्यांच्या नावाची घोषणा अद्याप होऊ शकलेली नाही. त्यामुळे विद्यापीठातील अनेक कामकाज आणि निर्णयप्रक्रियाही थांबली असल्याने कुलपती त्यासाठीचा निर्णय कधी घेणार आहेत, अशी विचारणा आज विद्यार्थी संघटनांनी केली. ठाकरे आणि शिंदे गटाच्या युवा सेनेकडून नियुक्तीबाबत विचारणा केली जात आहे. नुकतेच शिंदे गटाच्या युवा सेनेचे पदाधिकारी व मुंबई विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य ॲड. वैभव थोरात, दीपेश म्हात्रे आणि दुसरीकडे ठाकरे गटाच्या युवासेनेचे पदाधिकारी व माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, आदींनीही अशी विचारणा करत त्यासाठीची कार्यवाही लवकर करण्याची मागणी केली. ठाकरे गटाच्या युवासेनेने आज राज्यपालांना निवेदन देत मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड तात्काळ करण्याची मागणी केली आहे.
---
रेल्वे भू संपादनास शेतकऱ्यांचा विरोध
टिटवाळा : प्रस्तावित कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी सातशे कोटीहून अधिक निधीची तरतूद केली आहे; मात्र गेली अनेक वर्षे रखडलेल्या या प्रकल्पातील विरोधाचे संकट अजूनही कायम आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात मामणोली, केळणी, कोलिंब गावातील शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत. बाधित शेतकरी बांधवाना त्यांच्या भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळालाच पाहिजे, ही माझी ठाम भूमिका आहे. त्यासाठी प्रशासनाशी चर्चा करणार असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले.
---
महिला आयोगाची ‘आरोग्य वारी’ १० जूनपासून
मुंबई ः आषाढी एकादशीला विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरकडे पायी निघणाऱ्या लाखो महिला वारकऱ्यांच्या स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य महिला आयोगाकडून १० जूनपासून ‘आरोग्य वारी’ आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी पुणे, सातारा आणि सोलापूर प्रशासन सज्ज झाले असून तीनही जिल्ह्यांत आवश्यक त्या सोयी-सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी स्वत: यंत्रणांच्या तयारीचा आढावा घेतला.‘आरोग्य वारी’चा शुभारंभ शनिवारी (ता. १०) पुण्यातील निवडुंगा विठ्ठल मंदिरातून होणार आहे. २९ जूनला आषाढी एकादशीपर्यंत लाखो वारकरी पायी पंढरपुरात दाखल होणार आहेत.
---
बायकोने आईची बाजू घेतल्याने मारहाण
डोंबिवली: आईने तिच्या माहेरच्यांकडून जमिनीचे मिळालेले पैसे द्यावे, यासाठी मुलगा सतत तगादा लावत होता. त्यावर पत्नीने नवऱ्याला आपल्याला ते पैसे नकोत, असे म्हणत आईची बाजू घेतली. यावर रागवलेल्या नवऱ्याने पत्नीचाच गळा दाबून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडा ऐकल्याने शेजाऱ्यांनी धाव घेत तिचा जीव वाचवला. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात संतोष म्हसकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. डोंबिवली पूर्वेतील भोपर कमानीजवळील मुक्ताई कॉलनीत संतोष म्हसकर आपल्या कुटुंबासह राहतो. संतोषची आई त्याच्यापासून वेगळी राहते. आईला तिच्या माहेरून जमिनीचा हिस्सा मिळाला होता. ही जमीन विकल्याने तिच्याकडे पैसे आले होते.
---
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेत वाढ
मुंबई : महावितरणमध्ये एका वर्षात जीवघेणे अपघात ४२ टक्क्यांनी कमी झाले; तर गंभीर इजा झाली असे अपघात ४३ टक्क्यांनी कमी झाले आहेत. याची नोंद घेऊन महावितरणला ‘ग्रीनटेक सुरक्षा पुरस्कार २०२३’ने गौरवण्यात आले. नवी दिल्ली येथे नुकताच आसामचे माजी राज्यपाल डॉ. जगदीश मुखी यांच्या हस्ते महावितरणचे संचालक अरविंद भादीकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महावितरणच्या नियमित आणि बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांचे अपघात कमी व्हावेत यासाठी कंपनीतर्फे सातत्याने प्रयत्न केले जातात. विशेषतः पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिर घेतले जाते. याखेरीज सुरक्षितता प्रशिक्षण दिले जाते. कर्मचाऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सातत्याने व्हॉटसॲपच्या माध्यमातून संदेशही पाठवले जातात. या पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी महावितरणचे प्रशिक्षण व सुरक्षा विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक देवेंद्र सायनेकर, कॅनरा बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. दुबे आणि ग्रीनटेक फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. शरण उपस्थित होते.
---
माकडे मृत पावल्याची अफवा
माथेरान : सह्याद्री कुशीतील टुमदार पर्यटन स्थळ असलेले माथेरान हिरव्या गर्द वनराईने व्यापलेले आहे. अनेक प्रकारचे वन्यजीव या ठिकाणी वास्तव्यास आहेत. त्यात आपल्या मर्कटलिलांनी मनोरंजन करणारी माकडे पर्यटकांसह बच्चे कंपनी आणि थोरांना भुरळ घालत असतात. मात्र, माथेरान पर्यटनस्थळाची शान समजली जाणारी हीच माकडे शुक्रवारी (ता. २) रेल्वे स्थानक परिसरात मृत पावल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली आणि वनविभागाची तारांबळ उडाली. मात्र, ती उष्माघाताने बेशुद्ध पडल्याचे निष्पन्न झाल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला. माथेरान वन विभागाचे वनपाल राजकुमार आडे, वनरक्षक अंटेश्वर भांगे, वनमजूर काळूराम जामघरे, बबलू शिंगाडे यांनी माकडांची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.
---
फेरीवाला योजना प्रक्रियेला गती
मुंबई ः रखडलेल्या फेरीवाला प्रतिनिधींच्या निवडणूक यादीला टाऊन वेंडिंग कमिटीच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर त्याबाबतच्या धोरणाच्या प्रक्रियेला वेग आला आहे. प्रतिनिधींच्या यादीला पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची मंजुरी मिळाल्यानंतर येत्या शुक्रवार (ता. ९) पर्यंत फेरीवाला प्रतिनिधींची यादी जाहीर करून त्यावर हरकती-सूचना मागवल्या जाणार असल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. आठ वर्षांपासून रखडलेल्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठीच्या प्रक्रियेत फेरीवाला प्रतिनिधींची निवडणूक रखडली होती. महिनाभरापूर्वी टाऊन वेंडिंग कमिटीच्या बैठकीत यादीला मान्यता मिळाल्यानंतर प्रक्रियेला वेग आला आहे. यादीला येत्या दोनतीन दिवसांत मंजुरी मिळाल्यानंतर ती जाहीर केली जाणार असून त्यावर सूचना-हरकती मागवल्या जातील.
---
मुंबई कॅथेलिक सभेचे आंदोलन
गोरेगाव : गोरेगावमधील एम. जी. रोड परिसरात महिला कुस्तीपटूंच्या समर्थनात मुंबई कॅथेलिक सभेने सोमवारी (ता. ५) सायंकाळी आंदोलन केले. या वेळी बृजभुषण सिंह यांच्या फोटोवर फुल्ली मारलेले पोस्टर्स लोकांनी हातात घेतले होते. मुंबई कॅथेलिक सभेचे अध्यक्ष डोल्फि डिसुझा यांनी या वेळी सांगितले की, कुस्तीपटू मुलिंनी देशाला मेडल्स मिळवून दिले. त्यांना अशी वागणूक दिली जात असेल, तर सामान्य मुलींना कसा न्याय मिळणार? असा सवालही त्‍यांनी या वेळी केला. ही परिस्थिती भयावह असून देशात हुकूमशाही सुरू असल्‍याचे मत त्‍यांनी मांडले. पंतप्रधान एकीकडे ‘बेटी बचाओ; बेटी पढाओ’ असा नारा देतात आणि दुसरीकडे देशाचा गौरव असलेल्या महिला कुस्तीपटूंना अशा प्रकारची वागणूक देत आहेत, ज्याचा आम्ही निषेध करतो आणि जो पर्यंत त्यांना न्याय मिळत नाही आम्ही त्यांच्या समर्थनार्थ उभे राहू, असेही त्‍यांनी या वेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com