कोल्हापूर राडा

कोल्हापूर राडा

आक्षेपार्ह स्टेटसवरून
कोल्हापुरात राडा
---
चार ते पाच ठिकाणी दगडफेक
---
आज ‘कोल्हापूर बंद’चे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः सोशल मीडियावरील आक्षेपार्ह स्टेटसचे तीव्र पडसाद आज कोल्हापूर शहरात उमटले. त्यातून संतप्त जमावाने लक्ष्मीपुरी बाजार, सीपीआर चौकासह परिसर, दसरा चौकात दगडफेक केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. परिस्थिती आणखी चिघळत असल्याचे लक्षात आल्यावर जलद कृती दल रस्त्यावर उतरविले. आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, उद्या (ता. ७) ‘कोल्हापूर बंद’चे आवाहन करण्यात आले.
सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या संबंधितांना अटक करावी, या मागणीसाठी जमावाने लक्ष्मीपुरी पोलिसांना धारेवर धरले. नंतर पोलिस ठाण्यासमोर ‘रास्ता रोको’ झाला. त्यानंतर जमावाने दगडफेक केली. जमाव दसरा चौकाकडे सरकला होता. तेथे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचा अंदाज घेऊन पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यानंतर जमाव पांगल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली. थोड्या वेळाने मात्र पुन्हा जमाव एकत्रित आला. तेथे त्यांनी उद्या ‘कोल्हापूर बंद’ची हाक देण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, जमाव आक्रमक होण्यापूर्वीच पोलिसांनी शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी परिसरातील स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती दिली. संबंधित पोलिसांच्या सोबत असलेल्याचे छायाचित्रही दाखविले आणि जमावाला शांत राहण्याचे आवाहन करण्याची विनंती पोलिसांनी प्रमुख कार्यकर्त्यांना केली. ही सर्व चर्चा लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात सुरू असतानाच बाहेर थांबलेला कार्यकर्त्यांचा जमाव पांगला. त्यामुळे परिस्थिती पोलिसांच्या हाताबाहेर गेली.
या प्रकाराबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः शहरातील काही भागांतील एकाच महाविद्यालयीन तरुणांनी त्यांच्या सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह स्टेटस लावले. संबंधितांवर कारवाई करावी म्‍हणून काही कार्यकर्ते थेट शाहूपुरी पोलिस ठाण्यात गेले. तेथे शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी ठाण्याच्या हद्दीतील संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. पोलिसांनी तातडीने संबंधिताला ताब्यात घेतल्याची माहिती दिली. त्यानंतर कार्यकर्ते थेट लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात आले. तेथे त्यांनी पोलिसांना संबंधिताला ताब्यात घेण्याची मागणी केली. दरम्यान, पोलिस अधिकारी लक्ष्‍मीपुरी पोलिस ठाण्यात मोजक्या कार्यकर्त्यांसह चर्चा करताना बाहेर संतप्त झालेला जमाव थेट लक्ष्मीपुरी बाजारात घुसला. तेथे फळे विक्रेत्यांच्या गाड्या उलट्या केल्या. काही ठिकाणी दगडफेक केली. या वेळी लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी वेळीच हस्तक्षेप करून नुकसान न करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे संतप्त जमाव काही प्रमाणात शांत झाला. तेथून पुढे हा जमाव पुन्हा लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात आला. दुपारी दोनपासून सुरू झालेला घटनाक्रम रात्री आठपर्यंत सुरूच होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com