संक्षिप्त

संक्षिप्त

पान ५

शेतकऱ्यांना मोफत भाजीपाला बियाणे
दाभोळ ः कुणबी सेवा संघ, दापोली नवभारत छात्रालय परिवार आणि विस्तार शिक्षण विभाग, कृषी महाविद्यालय, दापोली यांच्या संयुक्‍त वि़द्यमाने खेड तालुक्यातील उधळे गुलबेवाडी व आपेडे गावातील शेतकऱ्यांना मोफत भाजीपाला बियाणे वाटप केले. नवभारत छात्रालय परिवारातर्फे विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध भाजीपाला पिकांच्या बियाण्यांची ५६ पाकिटे या वेळी शेतकऱ्यांना देण्यासाठी दिली होती. कुणबी सेवा संघाचे सचिव हरिश्चंद्र कोकमकर यांनी नवभारत छात्रालय कृषिक्षेत्रात करत असलेल्या कार्याची माहिती दिली. विस्तार शिक्षण विभागाचे कनिष्ठ संशोधन सहायक डॉ. प्रवीण झगडे यांनी भाजीपाला बियाणे लागवडीविषयी माहिती दिली. विद्यापीठाने विकसित केलेल्या भाजीपाला पिकांच्या विविध जातींचे त्यामध्ये पडवळ-कोकण श्वेता, काकडी-कोकण काकडी, भेंडी-कोकण भेंडी, कारली-कोकण कारली, शिराळी-कोकण हरिता आणि चिबूड-कोकण मधूर या जातींचे बियाणे शेतकऱ्यांना देण्यात आले. या कार्यक्रमाला उधळे गावच्या माजी सरपंच अश्विनी राणीम, ग्रुप ग्रामपंचायत आपेडे, निळवणे व शिरवली गावच्या ग्रामपंचायत सदस्या दीक्षा काणेकर व प्रतिभा लांबाडे आदी उपस्थित होते.

पालगड येथे साने गुरुजींची पुण्यतिथी
दाभोळ ः साने गुरुजी एज्युकेशन सोसायटीतर्फे पूज्य साने गुरुजी विद्यामंदिर पालगड येथे साने गुरुजींची पुण्यतिथी साजरी केली. मुख्याध्यापक प्रसाद पावशे यांनी साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला तर सानेगुरूजी स्मारकातील प्रतिमेला रमा बेलोसे यांच्या हस्ते तर शाळेतील पुतळ्याला माजी मुख्याध्यापक विश्वनाथ तांबडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष शरद केळकर यांनी नूतन मुख्याध्यापक प्रसाद पावशे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्राणिमित्रांकडून माकडाला जीवदान
दाभोळ ः दापोली शहरात विजेचा झटका लागून जखमी झालेल्या माकडाला जीवनदान देण्यात प्राणिमित्रांना यश आले आहे. दापोली शहरातील पंचायत समिती कार्यालयासमोर एक माकड विजेचा धक्का लागून जखमी अवस्थेत पडल्याची माहिती प्राणीमित्र तुषार महाडिक यांना मिळताच त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. किरण करमरकर आणि मिलिंद गोरिवले, वनरक्षक जगताप व प्राणीमित्र संघटनेचे तुषार महाडिक यांनी या माकडाला पकडून पुढील उपचारासाठी वनविभागाच्या कार्यालयात नेले. तेथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उपचार केले.

हर्णै येथे मल्लखांब स्पर्धा
दाभोळ ः जागतिक मल्लखांब दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील हर्णै येथे १५ जूनला सायंकाळी ४ वा. हर्णै येथील बारावाडी सत्कार्य मंडळाच्या मळेकर सभागृहात मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दापोली तालुका मल्लखांब संघटना व सरखेल कान्होजी आंग्रे मल्लखांब संघ हर्णै यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. मुलांच्या तीन गटांमध्ये लाकडी मल्लखांब व मुलींच्या दोन गटांमध्ये दोरीच्या मल्लखांब प्रकारात खेळवल्या जाणार आहेत. स्पर्धेनंतर लगेचच बक्षीस वितरण होणार आहे. या स्पर्धेला नागरिकांनी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन दापोली तालुका मल्लखांब संघटनेने केले आहे.


शिपयार्डला शिवसेना पदाधिकाऱ्यांची भेट
दाभोळ ः दाभोळजवळील उसगाव येथील भारती शिपयार्ड कंपनीला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली. शिवसेनेचे दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रदीप सुर्वे यांनी सांगितले, भारती शिपयार्ड कंपनीला शिवसेनेचे तालुक्याचे पदाधिकारी यांनी भेट दिली. यापुढे ही कंपनी सुरू राहिली पाहिजे. कोणतेही वाद न करता सामंजस्याने प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. कंपनी व्यवस्थापनाला सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल. शिवसेनेचे तालुकाप्रमुख उन्मेश राजे, तालुका संघटक प्रकाश कालेकर, सुधीर वैद्य, विभागप्रमुख संतोष आंबेकर, रमाकांत दाभोळकर, रोहन यादव, रोहन तोडणकर आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत असणारे युवा कार्यकर्ते रोहन तोडणकर आणि रोहन यादव हे पुढील काही दिवसात शिवसेनेत प्रवेश करणार असून, त्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही प्रदीप सुर्वे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com