इये साहित्याचिये नगरी
११ (टुडे पान ३ साठी, सदर)
(१० जून टुडे तीन)
इये साहित्याचिये नगरी ..........लोगो
-rat१६p४.jpg- ः
२३M०९७२९
प्रकाश देशपांडे
-rat१६p१.jpg-
२३M०९६९९
वसंत देसार्इ
-------
स्वरक्षेत्रातील लखलखते झुंबर
संगीतकार वसंत देसार्इ
कोकण ही जशी संशोधकांची, दानशूरांची भूमी आहे. तशीच कलाक्षेत्राचीही भूमी आहे. नटवर्य गणपतराव जोशींपासून डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यासारख्या श्रेष्ठांनी रंगभूमी गाजवली तर स्नेहल भाटकर, मारूती कीर, गोविंदराव पटवर्धन, राम मराठे अशा दिग्गजांनी संगीतक्षेत्रात अमीट ठसा उमटवला. ज्यांच्या संगीतरचनेमुळे महाराष्ट्राची सकाळ भक्तीमय होते आणि ज्यांच्या संगीतामुळे दूरवर पाकिस्तानात प्रार्थनेचे सूर निनादतात ते संगीतकार वसंत देसार्इ हेही आपल्या अपरान्तभूमीचे स्वरक्षेत्रातील लखलखते झुंबर.
प्रकाश देशपांडे, चिपळूण
----------
आजच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळजवळ असलेल्या सोनवडे गावातील संगीताची ही सुवर्णमुद्रा. ९ जून १९१२ ला देसार्इ घराण्यातील कृष्णाजींच्या घरी वसंत देसार्इ यांचा जन्म झाला. देसार्इ घराणे वतनदार. घरी संगीताचा वारसा चालत आलेला. आर्इला गोड गळ्याचे वरदान होते. आर्इचे वडील आबा परूळेकर त्या परिसरातील नामवंत कीर्तनकार होते. त्या साऱ्या परिसरातच भजन, कीर्तन, दशावतार यांचे स्वर ओथंबलेले. वसंतरावांच्यावर बालपणापासून सुरांचीच छाया होती. घरची परिस्थिती चांगली. खाणे-पिणे उत्तम त्यामुळे शरीर बलदंड. व्यायामाची आवड होती. परिसरात एक सर्कस आली. तिथल्या वातावरणाची ओढ निर्माण झाली आणि आपणही सर्कशीत जावे असे ठरवून स्वारी घर सोडून कोल्हापूरला आली. कोल्हापूरला त्यांचे काका राहात होते. सर्कशीत काही प्रवेश मिळाला नाही. काकांना वसंताला गाण्याची आवड आहे आणि हार्मोनियम चांगले वाजवतो, हे ठाऊक होते. काकांनी त्या वेळी कोल्हापुरात असलेल्या प्रभात फिल्म कंपनीत वसंताला नोकरीला लावले. बिनपगारी आणि पूर्ण अधिकारी म्हणजे पडेल ते काम करायचे आणि इथेच वसंतरावांना जीवनाचा सूर गवसला. प्रभातमध्ये संगीताची जबाबदारी सांभाळत होते गोविंदराव टेंबे, मास्तर कृष्णराव, केशवराव भोळे अशी नामवंत मंडळी. त्या वेळी कोल्हापूर येथे खाँसाहेब अल्लदियाखाँ राहात होते. वसंतरावांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. कोल्हापुरात नामवंत गायकांची वर्दळ होती. हा एकलव्य त्या सगळ्या मैफली ऐकायचा, कानामनात साठवायचा. पुढे प्रभात कंपनी कोल्हापूर सोडून पुण्याला गेली. गाडीबरोबर नळ्यांची यात्रा वसंतरावही पुण्याला आले. मराठीतील पहिला बोलपट १९३२ ला निघालेला चित्रपट होता ‘आयोध्येचा राजा.’ विशेष म्हणजे या बोलपटात गाण्याचा मान मिळाला वसंतराव देसार्इ यांना. चित्रपटाच्या नांदीचे सूर होते वसंतरावांचे.
१९३९ ला वसंतरावांनी प्रभात सोडून मुंबर्इला प्रस्थान केले. लवकरच चित्रमहर्षी व्ही. शांताराम यांनीही प्रभात सोडून मुंबर्इला राजकमल ही चित्रनिर्मिती संस्था सुरू केली. प्रभातमध्ये असताना वसंतराव आणि शांतारामबापूंची चांगली मैत्री झाली होती. शांतारामबापूंनी १९४३ ला ‘शकुंतला ’हा चित्रपट निर्माण केला आणि संगीतकार म्हणून पाचारण केले वसंतराव देसार्इ यांना. त्यानंतर या जोडीचे अनेक चित्रपट आले आणि गाजले. ‘डॉ. कोटणीस को अमर कहानी’, ’दो आँखे बारह हाथ’, ‘अमर भूपाळी’, ‘झनक झनक पायल बाजे’, ‘ शाहीर रामजोशी’, इये मराठीचिये नगरी’, अशी कितीतरी नावे सांगता येतील. वसंतरावांची लय आणि तालाची जबरदस्त तयारी होती. ते स्वतः चांगले गायक आणि वादकही होते. प्रभातच्या संत ज्ञानेश्वर चित्रपटात त्यांनी गाडीवानाची भूमिका केली होती. त्यांनी गायलेले ‘आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे’ हे गाणे गाजले होते. ’कुंकू’ सिनेमात परशुराम या गायकाने गायलेले ‘मनसुद्ध तुझं गोस्त हाये पृथ्वी मोलाची’ या गाण्यात त्यांच्याबरोबर गळ्यात पेटी अडकवून वाजवणारा कलाकार म्हणजे वसंत देसार्इ. चित्रपटातल्या ’घनश्याम सुंदरा’ या भूपाळीने जी अजरामर लोकप्रियता मिळवली त्याला तोड नाही. या भूपाळीच्या चालीबद्दल खुद्द वसंतरावांनीच माजी मंत्री आणि विधानसभेचे सभापती चौधरी यांना जे सांगितलयं ते विलक्षण आहे. घनश्याम सुंदराची चाल सुचत नव्हती अखेरीस मी शाहीर होनाजीच्या समाधीजवळ गेलो. मध्यरात्रीपर्यंत बसलो होतो आणि अचानक माझ्या कानी स्वर आले. मला चाल सुचली. अक्षरशः ही भूपाळी म्हणजे महाराष्ट्राचे संचित आहे. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली त्या वेळी झालेल्या प्रकट कार्यक्रमात ही भूपाळी लावण्यात आली होती. ‘दो आँखे बारह हाथ’ या शांताराम बापूंच्या चित्रपटातील ‘अय मालिक तेरे बंदे हम’ हे गीत तर पाकिस्तानातमधल्या अनेक शाळांमधून प्रार्थनागीत म्हणून म्हटले जात होते.
’अमर भूपाळी’ हा चित्रपट बंगाली भाषेतही निघाला आणि ’घनःश्याम सुंदरा ही भूपाळी कन्नड भाषेतही आली. चाल मात्र वसंतरावांचीच. त्यांनी ४५ हिंदी, २० मराठी चित्रपटांना आणि १५ मराठी नाटकांना संगीत दिले. संगीतातले अनेक बुजुर्ग कलाकार त्यांच्या चित्रपटात गायले. वादकांनी वाद्यवादन केले. आज कुठलाही मंगल सोहळा बिसमिलाखाँ यांच्या सनर्इ वादनाच्या ध्वनिमुद्रिका वाजल्याशिवाय होत नाही. गंगाघाटावर सनर्इ वादनात रमणारा हा कलाकार समाजासमोर आणण्याचे श्रेय आहे वसंतराव देसार्इ यांना. गूँज उठी शहनार्इ हा १९५९ ला चित्रपट आला. यातील सनर्इ वादनासाठी वसंतरावांनी खास निमंत्रण देऊन बिस्मिल्लाखाँ यांना आणले. त्यांचे तोल आणि ताल सांभाळणे कठीण काम; पण वसंतरावानी ते सारे सांभाळून चित्रपट संगीतमय केला. वाडिया ब्रदर्स यांच्या ’स्वयंवर झाले सीतेचे‘ चित्रपटात त्यांनी खुद्द भीमसेन जोशी यांना निमंत्रित केले.
गदिमांची शब्दरचना, वसंतरावांचे संगीत आणि भीमसेनाजींचे स्वर. लंकेतील दशाननाच्या भव्य समृद्धीचा साक्षात्कार केवळ आणि केवळ स्वरामधून वसंतरावच घडवू शकतात. चित्रपटातील ’छडी लागे छम छम’, ’आर्इ म्हणोनी कोणी‘, ''नीज नीज माझ्या बाळा’ हे अंगार्इ गीत ही सगळी गाणी लोकप्रिय ठरली. चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. आचार्य अत्रे यांनी या चित्रपटाच्या यशात ५० टक्के वाटा वसंतरावांचा आहे, अशी दिलखुलास कबुली दिली होती. संगीत रंगभूमीला उतरती कळा आली आणि नाटककार विद्याधर गोखले यांनी १९६० ला पंडितराज जगन्नाथ नाटक रंगभूमीवर आणले. या नाटकाचे संगीतही वसंतरावांचेच. वसंतरावांना सूरसिंगार संसदेने डॉ. बृहस्पती पुरस्काराने भूषवले. १९७५ ला त्यांची महाराष्ट्र विधान परिषद सदस्यपदी राज्यपालांनी नियुक्ती केली होती. वसंतराव रसिकराज होते. सुदृढ आणि प्रसन्न चेहरा. हातात कायम सुगंधी पुष्पांचा गजरा असे विलोभनीय व्यक्तिमत्व. दुर्दैवाने २२ डिसेंबर १९७५ ला लिफ्टच्या अपघातात हे स्वरसंगीत निमाले.
(लेखक इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि साहित्यिक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

