‘सिंधू रक्तमित्र’चे कार्य प्रेरणादायी

‘सिंधू रक्तमित्र’चे कार्य प्रेरणादायी

Published on

09741
सावंतवाडी ः येथे रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर.

‘सिंधू रक्तमित्र’चे कार्य प्रेरणादायी

लखमराजे भोसले; सावंतवाडीत रक्तदाते, संस्थांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १६ ः सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानने कोरोना काळासह मागील तीन वर्षांत केलेले कार्य स्तुत्य आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कार्यात सहभागी होण्यात नक्कीच आनंद वाटेल. भविष्यात सर्वांनी मिळून एकत्रितपणे काम केल्यास त्यात अधिक यश येईल. काही वर्षांपूर्वी संस्थानच्या राजमातांना दुर्मिळ रक्ताची गरज पडली होती. त्यावेळी आमच्या कॉलेज परिवारातील विद्यार्थ्यांनी रक्तदान करून मदत केली होती. रक्तदानाचे हे महान कार्य असेच पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत-भोसले यांनी दिली.
सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, शाखा सावंतवाडी व विशाल सेवा फाउंडेशन, सिंधुदुर्गच्या विद्यमाने जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदात्यांचा भव्य सत्कार येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलमध्ये करण्यात आला. विविध सामाजिक संस्था, मित्रमंडळ यांसह रक्तदान चळवळीत कार्यरत रक्तमित्रांचा सन्मान मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून बुधवारी (ता. १४) सकाळी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत प्रतिष्ठानच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.
यावेळी युवराज लखमराजे भोसले, माजी नगराध्यक्ष संजू परब, युवा उद्योजक विशाल परब, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, तालुकाध्यक्ष सुनील राऊळ, किशोर नाचणोलकर, निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस, सुधीर पराडकर, आनंद वेंगुर्लेकर, डॉ. आव्हाळे, डॉ. अमित आवळे, डॉ. येडके, संदीप चांदेकर, सावंतवाडी-दोडामार्ग तालुका विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर, कार्याध्यक्ष दीपक तारी, तालुका सचिव बाबली गवंडे, खजिनदार सिद्धार्थ पराडकर, एकनाथ चव्हाण, सागर नाणोसकर, महेश रेमुळकर, नारायण नाईक, योगेश सावंत, साक्षी कारीवडेकर, नीलेश मोरजकर, शिवम बोंद्रे आदी उपस्थित होते.
माजी नगराध्यक्ष परब यांनी रक्तदानासारखे पवित्र कार्य करणाऱ्यांचा सत्कार हा चांगला उपक्रम असल्याचे सांगितले. रक्तदानासारख्या कोणत्याही कार्यक्रमांना कधीही हाक दया, आम्ही सदैव मदतीसाठी पुढे येऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. संस्थापक अध्यक्ष तेंडोलकर यांनी गावागावांत, घराघरांत रक्तदानाची जागृती होण्यासाठी प्रतिष्ठान प्रयत्नशील असल्याचे सांगितले. सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असलेले मिशन भविष्यातही कायम राहो, अशा शुभेच्छा निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी गवस यांनी दिल्या. युवा उद्योजक विनायक कोडयाळ तसेच सर्व शिबिरांमध्ये सक्रिय सहभाग घेणारे प्रतिष्ठानचे खजिनदार सिद्धार्थ पराडकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. गोवा-बांबोळी रुग्णालयाच्या रक्तपेढीने रक्तदातादिनी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानला सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन आभार मानले. प्रास्ताविकात तालुकाध्यक्ष राऊळ यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेतला. युवराज लखमराजे भोसले, माजी नगराध्यक्ष परब, युवा उद्योजक परब यांच्या हस्ते विविध सामाजिक संस्था, मित्रमंडळ, रक्तमित्रांचा सन्मान करण्यात आला. संदीप चांदेकर यांनी सूत्रसंचालन केले. बाबली गवंडे यांनी आभार मानले.
---
भविष्यात सर्वतोपरी सहकार्य ः परब
विशाल परब म्हणाले, ‘‘सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे कार्य अनमोल आहे. रक्तदान हे खूप मोठे कार्य आहे. रक्ताची गरज असताना रुग्णांचे नातेवाईक अस्वस्थ असतात. अशा संस्थांमुळे त्यांना दिलासा मिळतो. या संस्थांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. पुढील वर्षी हाच विश्वदाता कार्यक्रम १ हजार रक्तदात्यांचा कार्यक्रम होईल. त्यासाठी लागेल तेवढी मदत मी व माझे सर्व सहकारी करतील.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com