...अन्यथा पंचायत समितीत शाळा

...अन्यथा पंचायत समितीत शाळा

Published on

09785
सावंतवाडी : गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांना निवेदन देताना ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते. बाजूला रुपेश राऊळ, मायकल डिसोजा, बाळा गावडे व अन्य.

...अन्यथा पंचायत समितीत शाळा

ठाकरे शिवसेनेचा इशारा; शिक्षकप्रश्नी सावंतवाडीत आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ ः जिल्ह्यातील शून्य शिक्षकी शाळांत शिक्षक मिळालेच पाहिजेत. त्यासाठी शिक्षक भरती करा किंवा जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून स्थानिक बेरोजगार डी.एड. धारकांना शिक्षक सेवक म्हणून रुजू करा; अन्यथा विद्यार्थ्यांची शाळा पंचायत समिती कार्यालयात भरवू, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आज येथे दिला.
जिल्ह्यातील शून्य शिक्षकी शाळांमुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळा, या मागणीसाठी आज ठाकरे शिवसेनेच्यावतीने सावंतवाडीत आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षणमंत्री जिल्ह्यातील असून सुद्धा शिक्षक भरतीचा प्रश्न मार्गी लागत नाही, ही लांच्छनास्पद बाब आहे, अशी टीका केली. यावेळी जिल्हा महिला प्रमुख जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, चंद्रकांत कासार, बाळा गावडे, जिल्हा परिषद माजी सदस्य मायकल डिसोजा, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, योगेश नाईक, महिला तालुकाप्रमुख भारती कासार, उल्हास परब, श्रुतिका दळवी, उदय पारिपत्ये, रमेश गावकर, अशोक धुरी, संदीप प्रभू, योगेश गोवेकर आदींसह मोठ्या संख्येने ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पडते म्हणाले, "जिल्ह्यातील ४० शिक्षक परजिल्ह्यांत काम करत आहेत. तर जिल्हाअंतर्गत बदलीतून ४५३ शिक्षकांच्या नुकत्याच बदल्या झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात १२१ शाळांमध्ये शून्य शिक्षक आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार आहे. वास्तविक जिल्हांतर्गत शिक्षक बदली करताना पहिल्यांदा या ठिकाणची शिक्षक पदे भरली पाहिजे होती; मात्र तसे झाले नाही. दुसरीकडे शिक्षणमंत्री केसरकर हे आपल्या जिल्ह्यातीलच असून जिल्ह्यातील शिक्षण यंत्रणेची अशी केविलवाणी परिस्थिती निर्माण होणे, ही बाब लांच्छनास्पद आहे. जिल्ह्यातील डी.एड. बेरोजगारांनी केलेल्या आंदोलनानंतर महिनाभरात प्रश्न सोडविला जाईल, असे आश्वासन केसरकर यांनी डी.एड. बेरोजगार धारकांना दिले होते; मात्र आज दोन महिने उलटले तरी त्यांनी तो प्रश्न सोडविला नाही. केसरकर हे जिल्ह्यातील असल्यामुळे खास बाब म्हणून जिल्ह्यातील शिक्षक भरतीचा प्रश्न ते सोडवू शकले असते, मात्र त्यांनी ते देखील केले नाही. आता त्यांनी निदान जिल्हा परिषदच्या स्वनिधीतून तरी जिल्ह्यातील डी.एड. धारक बेरोजगारांना शिक्षक सेवक म्हणून रुजू करून घ्यावे आणि जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे." दरम्यान, येत्या दहा दिवसांत शिक्षक भरतीचा प्रश्न न सुटल्यास खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून शिवसेना जिल्ह्यात तीव्र आंदोलन करणार आहे. यावेळी शून्य शिक्षकी शाळातील विद्यार्थ्यांना पंचायत समितीत आणून बसविले जाईल, असा इशाराही ठाकरे शिवसेनेच्यावतीने पडते यांनी दिला.
.................
चौकट
प्रशासनास निवेदन
ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांना निवेदन देत शुन्य शिक्षकी शाळेत शिक्षक नेमा, अशी मागणी करण्यात आली. तालुक्यांत सहा शाळा शून्य शिक्षकी असून तेथे शिक्षक पदे भरण्याची मागणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com