रत्नागिरी ः ओडीएफ प्लसमध्ये भारतात रत्नागिरी जिल्हा व्दितीय
ओडीएफ प्लसमध्ये रत्नागिरी जिल्हा भारतात द्वितीय
स्वच्छ भारत अभियान ; सामुदायिक शौचालयांसह सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ ः स्वच्छ भारत अभियानांतर्गत ओडीएफ प्लस गावांमध्ये एप्रिल, मे या सलग महिन्यात रत्नागिरी जिल्ह्याने भारतात दुसर्या क्रमांकावर भरारी घेतली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १ हजार ४५५ गावे ओडीएफ प्लस करण्यात जिल्हा परिषद प्रशासनाला यश आले आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्त करण्याची मोहीम केंद्र सरकारने राबवली होती. यामध्ये सामूहिक वस्तीच्या ठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी, दैनंदिन साफसफाई, उघड्यावर मलमूत्र विसर्जन करणार्यांना प्रतिबंध करणे, कँटोन्मेंट हद्दीतून वाहणार्या नाल्यांच्या बाजूचे सुशोभीकरण व उद्यानांची उभारणी असे विविध उपक्रम राबवले होते. त्यानंतर केंद्र शासनाने ओडीएफ प्लस गावे करण्याची मोहीम हाती घेतली. यामध्ये सामुदायिक शौचालय, प्राथमिक विद्यालय, सामुदायिक घरे, अंगणवाडी या ठिकाणीही शौचालयांची व्यवस्था, प्लास्टिकच्या वापरावर बंधने, प्लास्टिक कचरा संकलनाचे नियोजन, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन यावर भर दिला आहे. हे उपक्रम प्रत्येक ग्रामपंचायतीत राबवले आहेत का, हे पाहण्यासाठी केंद्राकडून संस्थेची नेमणूक केली आहे.
ओडीएफ प्लसमध्ये रत्नागिरी जिल्ह्याने महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये चांगली कामगिरी केली आहे. जिल्ह्यात १ हजार ५३२ गावे असून त्यातील १ हजार ४५५ गावांना ओडीएफ प्लस दर्जा मिळाला आहे. अजूनही ७७ गावे शिल्लक असून, ३३.२ टक्के गावे मॉडेल व्हिलेज म्हणून गणली गेली आहेत. देशभरात ओडीएफ प्लस गावांची दर महिन्याला चाचपणी होते. ओडीएफ प्लससाठी पात्र ठरलेल्या गावांची माहिती ऑनलाईन भरण्यात येते. त्याची प्रत्यक्ष चाचपणी केल्यानंतर ते गाव ओडीएफ प्लस म्हणून घोषित करतात. जानेवारी २०२३ मध्ये रत्नागिरी जिल्हा भारतात सातव्या स्थानावर होता. त्यानंतर जिल्हा परिषद स्वच्छता मिशन विभाग, ग्रामपंचायत विभागाने गावपातळीवर सातत्याने पाठपुरावा करत ओडीएफ प्लसमधील निकषांच्या पूर्ततेसाठी विशेष नियोजन केले. गावागावात शौचालये, प्लास्टिक कचरा संकलनावर भर दिला. शाळांसह गावात जागृती केली. त्याचे फलित एप्रिल, मे २०२३ या दोन महिन्यात मिळाले. देशपातळीवरील चाचपणीत रत्नागिरी जिल्हा ओडीएफ प्लस गावांमध्ये भारतात दुसर्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर केरळमधील जिल्हा आहे. रत्नागिरी जिल्ह्याला ५७.३१ गुण मिळाले असून, अचिव्हमेंट स्कोअर १६७.९१ इतका आहे. पहिल्या क्रमांकावरील जिल्ह्याचा अचिव्हमेंट स्कोअर १६८.०५ इतका आहे.
चौकट
तालुका*ओडीएफ प्लस गावे
मंडणगड*१०४
दापोली*१७३
खेड*१९४
चिपळूण*१८२
गुहागर*११९
संगमेश्वर*१८७
रत्नागिरी*१८२
लांजा*११६
राजापूर*२१८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

