

09857
सावंतवाडी ः खैर तोड प्रकरणातील संशयितासह वन विभागाचे पथक.
खैर तोड प्रकरणातील संशयिताला अटक
डेगवेतील प्रकरण; वाहतुकीसाठी वापरलेली पिकअप जप्त
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १६ ः डेगवे येथील शासकीय जंगलात आपल्या साथीदारांसह खैराची तोड करून १८ मेपासून पसार असलेल्या संशयित सुदीन श्रीराम आगरवडेकर (रा. तळवडे) याला काल (ता. १५) वन विभागाने अटक केली. संशयिताने खैर वाहतुकीसाठी वापरलेली बोलेरो पिक-अप जप्त करत त्याला आज येथील न्यायालयात त्याला हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची वन कोठडी सुनावली.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, गुप्त माहितीनुसार फरार आरोपी सुदिन आगरवडेकर व त्याचे इतर दोन साथीदार यांना डेगवे येथील शासकीय जंगलात कटरच्या सहाय्याने तोड करून खैर वाहतूक करताना पकडण्यासाठी वन विभागाकडून सापळा लावण्यात आला. १८ मे रोजी या तिघांपैकी एक साथीदार महेश कुडव (वय १८, रा. इन्सुली) याला रंगेहाथ पकडण्यात आले. तर सुदीन आगरवडेकर व त्याचा दुसरा साथीदार मंथन आईर (वय १६, रा. वाफोली) हे दोघे फरार होण्यात यशस्वी झाले. या दोन पसार झालेल्या संशयितांपैकी मंथन आईर हा २४ मे रोजी स्वतःहून वन अधिकारी यांच्या समक्ष तपासात सहकार्य करण्यासाठी हजर झाला; मात्र दुसरा संशयित सुदिन आगरवडेकर हा आजतागायत पसार होता.
संशयित आगरवडेकर याने ओरोस सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्याची सुनावणी होऊन जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी संशयितावर ताशेरे ओढत त्याचा जामीनअर्ज फेटाळून लावला. आज सावंतवाडी न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये अद्याप संशयिताने गुन्ह्यात वापरलेली इतर वाहने व खैर झाडे तोडण्यासाठी वापरलेली हत्यारे मिळून आली नसल्याने तसेच संशयित यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दारू तस्करीच्या गुन्ह्यात देखील असल्याचे वन विभागाकडून न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याने त्याला एक दिवसाची वन कोठडी सुनावण्यात आली. या सुनावणी दरम्यान वन विभागाची बाजू तपास अधिकारी तथा सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर व सरकारी वकील यांनी प्रभावीपणे मांडली. संशयिताच्या वतीने सावंतवाडीचे अॅड. राहुल पै यांनी कामकाज पाहिले.
..................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.