संक्षिप्त

संक्षिप्त

Published on

खेडमध्ये ५ लाख ९० हजारांचे नुकसान
खेड ः तालुक्यात गेल्या २४ तासात पावसाचा जोर थोडा ओसरला असला तरी गेल्या ४८ तासांत विविध ठिकाणी कोसळलेल्या मुसळधार पावसाने आलेल्या नैसर्गिक आपत्तीत तब्बल ५ लाख ९० हजारांचे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. खेड तालुक्यात गेल्या २४ तासांत ६८ मिलीमीटर तर एकूण ४१६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने तालुक्यातील मौजे मुंबके येथील सालेकरवाडीतील जिल्हा परिषद सार्वजनिक विहिरीचे बांधकाम २९ जूनला अतिवृष्टीमुळे कोसळली असून, अंदाजे रुपये ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर मौजे सवेणी येथील श्रीपत पवार यांच्या घराचे ३ हजार २०० रुपयांचे अंशतः नुकसान झाले आहे. मौजे सवेणी येथीलच सीताबाई दळवी यांच्या घराचे ६० हजार ८०० रुपयांचे अंशतः नुकसान झाले असून, तेथील हिना शिगवण यांच्या गोठ्याचे २६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

राज ठाकरे ८ जुलैला रत्नागिरी दौऱ्यावर
खेड ः मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा ८ जुलैला चिपळूण येथे होणार आहे. या दौऱ्यामध्ये ठाकरे हे जिल्ह्यातील नवनिर्वाचित पदाधिकारी यांना मार्गदर्शन करणार आहेत. जिल्हा बैठक घेणार आहेत, अशी माहिती मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी दिली. या बैठकीत काही महत्त्वाचे आदेश देणार आहेत. या दौऱ्याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले असून या संदर्भात ठोस आराखडा दिला जाईल. यामुळे मनसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ७ जुलैला संध्याकाळी ठाकरे यांचे चिपळूण नगरीत स्वागत होईल. त्यानंतर ८ ला सकाळी ११ वा. अतिथी सभागृह येथे बैठक होईल. त्यानंतर दुपारचे भोजन घेऊन ठाकरे हे खेडमार्गे दापोलीकडे प्रयाण करतील. खेड नगरीत जल्लोषी वातावरणामध्ये स्वागत होईल. त्यानंतर दापोली येथे नवीन शाखा कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होईल आणि त्यानंतर राज ठाकरे मुंबईकडे प्रयाण करतील.


खेडमध्ये १०६ कुटुंबीयांना
स्थलांतराच्या नोटीस
खेड ः तालुक्यात गेल्या ५ दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या पावसाचे थैमान सुरूच आहे. पावसामुळे तालुक्यातील ४ गावांतील दरडप्रवण क्षेत्र व पूरप्रवण क्षेत्रातील १०६ कुटुंबीयांना येथील प्रशासनाने स्थलांतराच्या नोटिसा बजावल्या आहेत. खेड तालुक्यात पावसाचे धुमशान सुरू असल्याने जगबुडी व नारिंगी नद्या दुथड्या भरून वाहत आहेत. गतवर्षी बिरमणी व पोसरे बुद्रुक येथे दरड कोसळून १९ जणांना प्राण गमवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर पोसरेतील २२, खोपीतील २५, चोरवणेतील १५ तर बिरमणीतील ९ कुटुंबीयांना स्थलांतराच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. पूरप्रवण क्षेत्र असलेल्या अलसुरे येथील ३५ कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत.


गुणवत्ता शोधपरीक्षेत
पोफळी शाळेचे यश
चिपळूण ः गुणवत्ता शोधपरीक्षेत पोफळी प्राथमिक शाळेच्या तब्बल १९ विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर घवघवीत यश मिळवले. या यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच झाला. या विद्यार्थ्यांमध्ये पहिलीची विद्यार्थिनी फलक शेख हिने राज्यस्तरीय विशेष गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. ग्रामीणच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीत कैवल्य देशपांडे १४२ गुण, शौर्य कोलुगडे १३६, अनन्या शिंदे १३४, हर्ष विचारेने १३२ गुण मिळवले. केंद्राच्या गुणवत्ता यादीत लिबा शेख १२६, आराध्या पानगलेने १२६ गुण मिळवले. सर्वसाधारण गुणवत्ता यादीत पृथ्वीराज लोहार १३२, आद्या चव्हाण पाटील १२६, श्रीनिधी पेठे १२४, आर्या गायकवाड १२२, ९ वी रोशन मंडोळे १२२ गुण, ९ वा ऋतुजा जाधव १२० गुण मिळवले. गुणवत्ता यादीत शौर्य नरळकरने ११४ गुण मिळवले. तिसरीच्या ग्रामीण राज्यस्तरावर किमया देशपांडे २४४, साईशा कोरे २२६, निशाद नदाफ २१२, प्रतीक गुळवे २४४, श्रुती पवारने २२६ गुण मिळवले. या विद्यार्थ्यांचा माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक शरद सोळुंके, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक महेंद्र कापडी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

फोटो ओळी
-rat३p१०.jpg ः साखरपा ः खड्डेमय झालेला महामार्ग.

साखरप्यात महामार्गावर खड्डे
साखरपा ः रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाच्या दुर्दशेला प्रारंभ झाला आहे. ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडल्याने प्रारंभीच्याच मान्सूनने रस्त्याची चाळण करण्यास सुरवात केली आहे. रत्नागिरी-कोल्हापूर या रस्त्याची दुर्दशा सुरू झाली आहे. पाली ते साखरपा या सुमारे २५ किमीच्या रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध तर काही ठिकाणी साईडपट्टीनजीक लहान-मोठे खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्याला काहीशी उशिरा सुरवात झाली. पावसाला सुरवात होऊन जेमतेम पंधरवडाच झाला आहे. एवढ्यातच महामार्गाची ही अवस्था झाली असेल तर मान्सून जोर वाढल्यावर काय अवस्था असेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.