रत्नागिरी ःनवीन सभागृह बांधणी निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार

रत्नागिरी ःनवीन सभागृह बांधणी निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार

Published on

नवीन सभागृह निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार
मिलिंद कीर ; अनेक त्रुटी असतानाही बांधकामची परवानगी
रत्नागिरी, ता. ३ ः जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हा नियोजन समितीचे नवीन सभागृह बांधणी कामाच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष मिलिंद कीर यांनी केला. शहरातील सर्व कामांमध्ये बोकाळलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मिलिंद कीर म्हणाले, सार्वजनिक बांधकाम मंडळ रत्नागिरीचे अधीक्षक अभियंता यांनादेखील तक्रारीचे निवेदन दिले आहे. सार्वजनिक बांधकाम उत्तर रत्नागिरी यांचे कार्यालयातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जिल्हा नियोजन समितीचे नवीन सभागृह बांधण्याच्या कामासाठी निविदा काढण्यात आली होती. या निविदेच्या वरील नमूद केलेल्या कामाच्या पहिल्या तांत्रिक तपासणीची बाब खुली केलेली आहे. त्याचप्रमाणे आर्थिक तपासणीची बाब त्वरित खुली न करता गेले ५ ते ६ महिने प्रलंबित ठेवली होती. त्यानंतर आता त्याच कामाची फेरनिविदा क्र. २६, २०२३-२४ मधील काम क्र. ४ काढण्यात आले आहे.
या कामासाठी दुसऱ्यांदा काढण्यात आलेल्या फेरनिविदेमध्ये कामाची रक्कम बदलण्यात आली आहे. दुसरी निविदा काढण्यापूर्वी पहिली निविदा रद्द केल्याचे पत्रव्यवहार निविदा भरणाऱ्या ठेकेदारांना केलेला नाही. त्याचप्रमाणे कामाची रक्कमही वाढलेली असल्याचे सांगितले आहे; परंतु पहिल्यांदा काढण्यात आलेल्या निविदेमध्ये वाढीव काम करता येते. त्यामुळे वाढीव निविदा रक्कमेची फेरनिविदा काढण्याची आवश्यकता नव्हती. तसेच ती वाढीव फेरनिविदेसाठी वरिष्ठ कार्यालयाची लेखी मंजुरी घेतलेली दिसून येत नसल्याचे कीर यांनी सांगितले. या प्रक्रियेत फर्निचरच्या कामाच्या निविदा काढताना कामाच्या नावात फर्निचर काम करणे या शब्दाचादेखील उल्लेख केलेला नाही. अशा अनेक त्रुटी निविदा प्रक्रियेत असताना बांधकाम विभागाने १, ५७, ९७, ७१८ च्या सदोष निविदा प्रक्रियेला कशी मंजुरी देण्यात येते, असा प्रश्नही कीर यांनी उपस्थित केला. निविदा मंजुरीसाठी कोणाचेतरी लागेबंधे अथवा आर्थिक हित विचारात घेण्यात आले असल्याचा आरोप कीर यांनी या वेळी केला. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नीलेश भोसले हे देखील उपस्थित होते. या निविदा प्रक्रियेची तत्काळ सखोल चौकशी केली जावी. त्यात दोषींवर कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर काढण्यात आलेली गैर निविदा स्थगित करण्यात याव्यात, अशी मागणी केल्याचे मिलिंद कीर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.