सावंतवाडीतील अवैध प्रकार थांबवा

सावंतवाडीतील अवैध प्रकार थांबवा

14762
सावंतवाडी ः व्यापारी संघटनेतर्फे उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

सावंतवाडीतील अवैध प्रकार थांबवा

व्यापारी संघटनेची मागणी; पोलिस निरीक्षकांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ८ ः शहरात घडणाऱ्या चोऱ्या, बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडी, बेकायदा व्यवसाय करणारे परप्रांतीय विक्रेते, शहरातील अवैध दारू अड्डे, आडमार्गावर चरस व गांजा सेवन-विक्री आदींवर येथील पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी सावंतवाडी तालुका व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभारी पोलिस उपविभागीय अधिकारी किशोर सावंत यांच्याकडे केली. या सर्व प्रकारांवर करडी नजर ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणेतर्फे पथके नेमली जातील, अशी ग्वाही सावंत यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिली.
सावंतवाडी तालुका व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. ६) प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी सावंत यांची सावंतवाडी येथे भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. शहर व तालुक्यात घरफोड्या, चोऱ्या घडत आहेत. व्यापाऱ्यांनी सुरक्षिततेसाठी किमान दोन तरी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे. त्यातून चोरट्यांचा माग काढून जेरबंद करण्यास मोलाचे सहकार्य मिळणार आहे, असे सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर, पुंडलिक दळवी, बाळ बोर्डेकर, आनंद नेवगी, अभय पंडित, विहंग देवस्थळी, संदेश परब, राजेश पनवेलकर आदी उपस्थित होते. शहरात घडणाऱ्या चोऱ्या, परप्रांतीय विक्रेते, बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडी, शहरातील अवैध दारू अड्डे, आडमार्गावर चरस व गांजा सेवन, विक्री यावर कारवाई होण्याबाबत सावंत यांचे लक्ष वेधले. पावसाळी हंगामात फिरते परप्रांतीय विक्रेते वस्तू विकण्याच्या बहाण्याने घरोघरी जातात. त्यांची माहिती पोलिसांनी गोळा करून पोलिस दफ्तरी नोंद ठेवावी. उभाबाजार सुवर्णकारांची बाजारपेठ आहे. यापूर्वी या मार्गावर पोलिसांची नेमणूक केली होती; परंतु दोन वर्षांपासून बंदोबस्त नाही. त्यामुळे या भागात पोलिसांनी दिवसातून दोनवेळा तरी गस्ती ठेवावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
पोलिस अधिकारी सावंत यांनी या भागात दिवसातून तीन वेळा गस्त घालून तशी व्यापाऱ्यांकडे संबंधित पोलिसांची नोंद ठेवण्याची व्यवस्था केली जाईल. तशा सूचना पोलिस निरीक्षकांना देत असल्याचे स्पष्ट केले. लॉजिंग चालकांनी लॉजिंगमध्ये राहण्यास येणाऱ्या परदेशी लोकांची नोंद ठेवावी. त्यासाठी लॉजिंग व्यवस्थापकाने त्या संबंधित असलेला ‘सी’ फॉर्म भरून घेणे बंधनकारक आहे. संबंधित परदेशी लोकांचा व्हिसा, पासपोर्ट आदी कागदपत्रांची तपासणी करूनच प्रवेश द्यावा. संशय आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सावंत यांनी केले. दरम्यान, यावेळी चेतन नेवगी, दत्ताराम सावंत, आबा केसरकर, प्रथमेश म्हाडेश्वर, दीपक सावंत, भूषण कुलकर्णी, अजय चिंदरकर उपस्थित होते. व्यापारी संघटनेतर्फे उपविभागीय पोलिस अधिकारी सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, हवालदार नीलेश सावंत उपस्थित होते.
--
वाहतूक कोंडीचा प्रश्न
शहरात खरेदीसाठी अनेक ग्राहक चारचाकी वाहन घेऊन येतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. अशा वाहनचालकांवर कारवाई करावी व अशा वाहनांसाठी वाहनतळ उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. या सर्व मागण्यांबाबत निश्चितच उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही सावंत यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com