जलसंवर्धन हे देशहिताचे कार्य

जलसंवर्धन हे देशहिताचे कार्य

14773
सावंतवाडी ः ‘जलसंवर्धन सप्ताह’चा प्रारंभ करताना मान्यवर.


जलसंवर्धन हे देशहिताचे कार्य

गिरीधर परांजपे; सावंतवाडीत ‘जलसंवर्धन सप्ताह’चा प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ८ ः पृथ्वी हे अनमोल रत्न आहे. त्याची जपणूक करा. पृथ्वीचा मूळ स्रोत पाणी आहे. पाण्याला कोणताही पर्याय नाही. ते तयार करू शकत नाही. पाणी वाचविणे म्हणजे पाणी निर्माण करण्यासारखेच आहे. ते देशहिताचे कार्य आहे, असे प्रतिपादन माजी प्राचार्य गिरीधर परांजपे यांनी सावंतवाडी येथे ‘जलसंवर्धन सप्ताह’ उपक्रमाच्या उद्‍घाटन प्रसंगी केले. सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
गिरीधर परांजपे यांच्या संकल्पनेतून जलसंवर्धन तथा ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ संदेश देण्यासाठी जलसंवर्धन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. त्याचा प्रारंभ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत, प्रा. गिरीधर परांजपे, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड, वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्‍चंद्र पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सभागृहात करण्यात आला. सुरुवातीला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
याप्रसंगी वनक्षेत्रपाल क्षीरसागर यांनी, जीवसृष्टीचे अस्तित्व पाण्यातून आहे. निसर्गाशिवाय पाणी तयार होत नाही. बेसुमार पाणी उपसल्याने जलपातळी कमी होत आहे. त्यासाठी पाण्याची बचत, संवर्धन आणि पाण्याचे प्रदूषण रोखणे काळाची गरज आहे, असे सांगितले. तर पाणी म्हणजे जीवन आहे. परिणामकारक घटकांमुळे जलचक्र विस्कळीत झाले आहे. निसर्गासाठी पाणी महत्त्वाचे आहे. त्याचे संवर्धन करा, असा संदेश सहाय्यक वनसंरक्षक डॉ. लाड यांनी दिला. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष तोरसकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. दरम्यान, याप्रसंगी आरपीडी हायस्कूलचे उपमुख्याध्यापक अरविंद साळगावकर, पत्रकार अभिमन्यू लोंढे, माजी अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, शिवप्रसाद देसाई, वनपाल प्रमोद राणे, दत्ता पाटील, राजू तावडे, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दीपक गावकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, सहसचिव विनायक गावस, मोहन जाधव, नरेंद्र देशपांडे, हर्षवर्धन धारणकर, अनंत जाधव, शुभम धुरी, अनुजा कुडतरकर, भुवन नाईक, नीतेश देसाई, पी. एम. सावंत, दशरथ शृंगारे, सौ. तोंडवळकर आदी उपस्थित होते.
--
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा प्रारंभ
विकास सावंत म्हणाले, ‘‘पाणी अनमोल असून पाण्याचे महत्त्व यापूर्वीच्या पिढ्यांनीही जाणले आहे. भूगर्भातील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे जलसंवर्धनासाठी विविध उपक्रम हाती घ्या. गाळ काठताना मोती तलाव आटल्यानंतर निर्माण झालेली पाणी टंचाई, पूर्वजांच्या दूरदृष्टीचे दाखले देत पाण्याची बचत कशी करता येईल, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करा.’’ यावेळी शाळेच्या परिसरात चर खणून पावसाळ्यात पाणी मुरविण्यासाठीच्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ योजनेचा प्रारंभ करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com