घराची पायरी, उंबरठा अन तुळस

घराची पायरी, उंबरठा अन तुळस

Published on

आख्यायिकांचे आख्यान .........लोगो

rat8p7.jpg
M14755
जे. डी. पराडकर


इंट्रो
महाराष्ट्राची संस्कृती ही देशात अनुकरणीय समजली जाते. सण-उत्सव आणि यामधील प्रथा-परंपरा पिढ्यानपिढ्या जोपासत येणे, हा महाराष्ट्र धर्म समजला जातो. महाराष्ट्रातील कोकण हे अशा प्रथा परंपरा सांभाळण्यात नेहमीच आघाडीवर असते. या प्रथा परंपरांमधून मानसिक समाधानासह मनात भक्तीमय वातावरण निर्माण होऊन शांतता आणि स्थैर्य मिळते. ईश्वरी नामस्मरणामुळे अंतर्मनातील शक्ती वाढण्यास मोठी मदत होऊन हाती घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही कार्याबाबत आत्मविश्वास निर्माण होतो. घरातील वातावरण नेहमी आनंदी ठेवण्यासाठी घरातील स्त्री अक्षरशः तारेवरची कसरत करून सर्वांना समजून घेत समतोल साधण्याचा प्रयत्न करते. सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्या घरातील सकाळ आणि सायंकाळचे वातावरण प्रसन्न असते. घरातील सौभाग्यवती स्त्री स्नानानंतर पूजेची तयारी घेऊन प्रथम तुळशीची मनोभावे पूजा करते आणि घरात प्रवेश करतांना प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याची पूजा करून हळदकुंकू, फुले वाहून नतमस्तक होत घरात येते. तुळशीमातेबरोबरच घराचा उंबरठा किती महत्वाचा असतो, हे अधोरेखित होते. ‘उंबरठा ओलांडणे’ या शब्दप्रयोगाला कमालीचे महत्व दिले गेलेय. उंबरठ्यामध्ये घराची खूप मोठी शक्ती सामावलेली असते. घरात प्रवेश करत असतांना शक्यतो त्या घरातील माणसे तरी उंबरठ्यावर पाय देत नाहीत.
- जे. डी. पराडकर, संगमेश्वर
------

घराची पायरी, उंबरठा अन् तुळस

घराची पायरी उंबरठा, आणि तुळशी वृंदावन या घरातील सर्वाधिक महत्वाच्या बाबी असतात. शहराच्या तुलनेत गावाकडे मुबलक जागेमुळे घरात प्रवेश करताना प्रथम दोन ते तीन पायऱ्या चढाव्या लागतात आणि त्यानंतर घराचा पवित्र उंबरठा नजरेसमोर येतो. उंबरठ्याची चौकट किती जाड आणि रूंद असावी त्यासाठी फणस, सागवान, शिसम यापैकी कोणते लाकूड वापरावे याबाबत घर उभारणीपूर्वी मोठा खल होतो. सद्यःस्थितीत सागवानाच्या लाकडामध्ये थोडा अधिक रूंदीचा उंबरठा तयार करण्यावर भर दिला जातोय, असे दिसून येते. आधुनिकतेची आस कोकणलाही लागली असल्याने प्रवेशद्वाराची चौकट आणि घराच्या मागच्या बाजूला असणाऱ्या दरवाजाची चौकट लाकडी असते. मुख्य प्रवेशद्वाराच्या लाकडी बाजूंना चौकट म्हणण्याचे मुख्य कारण म्हणजे याला छोट्या दोन आणि मोठ्या दोन अशा चार बाजू असतात. एखाद्या ठेकेदाराने चौकट अर्थात् उंबरठ्याला एवढे महत्व द्यावे यावरूनच उंबरठ्याचे घराघरात असणारे महत्व लक्षात येते. उत्तम दर्जाच्या सागवानी लाकडात चारही बाजूस अत्यंत सुबक कोरीवकाम करून अर्धा इंच जाडीची शिसमची पट्टी अत्यंत सुबकपणे भरलेली मी पाहिली. खासकरून उंबरठ्याच्या दरवाजाची ही आगळीवेगळी कलाकुसर पाहून काही नवीन पाहायला मिळाल्याचा आनंद झाला. घरातील वयोवृद्ध मालक चौकट बसवण्यापूर्वीच हा उंबरठा पाहून नतमस्तक झाले. नवीन घराच्या उंबरठ्याची चौकट बसवताना विधीवत पूजा करून त्यावर शुभसंकेताचे प्रतीक म्हणून आंब्याचा टाळा लावला.

घराचा उंबरठा विविध प्रकारे सुशोभित केला जातो. कोणी उंबरठ्यावर कायमस्वरूपी स्वस्तिक अथवा ओम काढतात, कोणी लक्ष्मीची पावले तयार करून चिकटवतात, कोणी कलाकुसर असणारी रेखीव पट्टी लावतात तर कोणी जुनी नाणी अथवा घोड्याची नाल मारून ठेवतात. उंबरठ्याबाबत प्रत्येकाच्या समजुती निरनिराळ्या असल्याने त्याची सजावट करण्याचे प्रकारही भिन्न असल्याचे पाहायला मिळते. घरातील स्त्रिया मात्र दररोज तुळशीची पूजा करून आल्यानंतर उंबरठ्याची पूजा केल्याशिवाय घरात प्रवेश करत नाहीत. उंबरठ्याच्या चौकटीला सुंदर तोरण लावायचीदेखील पद्धत आहे. उंबरठा ओलांडून लक्ष्मी घरात प्रवेश करते, असा समज असल्याने उंबरठा हा लक्ष्मीच्या स्वागतायोग्य सजवला आणि पूजला जातो. खरंतर घरामध्ये उत्तम लहरी याव्यात आणि त्याचा कुटुंबातील सर्व सदस्यांना लाभ व्हावा, हा उंबरठा पूजताना मागील पूर्वजांचा मूख्य उद्देश असावा. याला भावनिक आध्यात्मिक रूप दिले की, परंपरा योग्य प्रकारे आणि पद्धतीने पाळल्या जातात म्हणून पुर्वजांनी अशा आदर्श प्रथा रूढ केलेल्या असाव्यात. उंबरठ्याला मस्तक टेकवून घरामध्ये प्रवेश करणारी भावनिक मंडळी आजही आहेत.

घराची पहिली पायरीदेखील उंबरठ्याएवढीच महत्वाची मानली गेलीय. पायरीचीदेखील विधीवत पूजा केली जाते. मंदिरात प्रवेश करतांना प्रथम पायरीवर डोकं टेकवून परमेश्वरापुढे नतमस्तक होण्याची पद्धत आहे. पायरी! ही देखील जांभ्या अथवा काळ्या दगडांची उत्तम रचना करून बांधतात. कोकणातील जुन्या घरांच्या पायऱ्या पाहिल्यानंतर हे भलेमोठे दगड कारागिरांनी घडवून कसे बसवले असतील, असा प्रश्न पडतो. पायऱ्यांचा या उत्तम रचनेवर सायंकाळच्या वेळी बसून गप्पागोष्टींचा आनंद घेण्याची मजा काही औरच असते. पायरी, प्रत्येकालाच पायरी ओळखून वागायला शिकवत असते.

तुळशीवृंदावन हा पूर्णत: महिलावर्गाच्या अखत्यारीतील विषय. तुळस कोणत्या बाजूला आणि दिशेला असावी? तुळशी वृंदावन तयार करायचे की, तयार मिळते ते घ्यायचे? हे सारे प्रश्न घरातील महिलांना विचारूनच अंतिम निर्णय केला जातो. तुळशीवृंदावन अत्यंत सुशोभित आणि दुसऱ्यांपेक्षा वेगळे असावे, अशी प्रत्येक स्त्रीची अपेक्षा असते. घरातील महिलावर्ग दिवसातून दोनवेळा तुळशीची पूजा करायला तेथे जातातच. याशिवाय सायंकाळी तुळशीवृंदावनाजवळ बसून महिला आणि मुले यांच्या रंगणाऱ्या गप्पा घरातील वयोवृद्धांची चाहूल लागल्यानंतर क्षणात थांबायच्या. तुळशीच्या अंगणातील गप्पा हा कोकणातील मंडळींचा खूप जिव्हाळ्याचा विषय. आजही अशा मनमोकळ्या गप्पा मारण्याचे स्त्रियांचे हक्काचे ठिकाण म्हणजे तुळशीवृंदावन मानले जाते. अधूनमधून तुळशीवृंदावन स्वच्छ करण्यासाठी मुले तयारच असतात. तुळशीच्या सान्निध्यात अधिकवेळ बसणे आरोग्याच्यादृष्टीनेही हितकारक आहे. उंबरठा, पायरी आणि तुळशीवृंदावन या शिवाय घर अपूर्ण असते. यांचे पूजन मनात सकारात्मकता वाढवते म्हणून याना आख्यायिकांचे रूप दिलेले असावे.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.