इतर मागासवर्गीयांसाठी 
व्याज परतावा योजना

इतर मागासवर्गीयांसाठी व्याज परतावा योजना

Published on

लोगो ः माहितीचा कोपरा

15165
विनोद दळवी

इतर मागासवर्गीयांसाठी
व्याज परतावा योजना

लीड
शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील छोटे व्यावसायिक व स्वयंरोजगार करणाऱ्या लाभार्थींसाठी १ लाखाची थेट कर्ज योजना, २० टक्के बीज भांडवल कर्ज योजना तसेच ऑनलाईन योजनांमध्ये १० लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, १० ते ५० लाखांपर्यंत गट कर्ज व्याज परतावा आदी योजनांद्वारे इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील छोटे व्यावसायिक व स्वयंरोजगार करणाऱ्यांना शासनाने आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. या योजनेच्या माध्यमातून ओबीसी व्यापाऱ्यांना आपला व्यवसाय वाढविण्याबरोबरच तरुणांना स्वयंरोजगार सुरू करण्यास चालना मिळत आहे.
- विनोद दळवी
..............
एक लाखांपर्यंत थेट कर्ज योजना
थेट कर्ज योजनेची कर्ज मर्यादा एक लाख रुपयांपर्यंत असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थीचे वय १८ ते ५५ वर्षे असणे आवश्यक आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील कुटुबांचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयेपर्यंत असणे आवश्यक आहे. ‘सिबील स्कोअर’ किमान ५०० असलेल्या लाभार्थ्यांना हे कर्ज दिले जाते. कर्ज परतफेडीचा कालावधी ४ वर्षांचा असून, परतफेडीचा दरमहा हप्ता २ हजार ८५ रुपये इतका आहे. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज आकारण्यात येत नाही. या योजनेचे अर्ज जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत.
.................
२० टक्के बीज भांडवल योजना
२० टक्के बीज भांडवल योजनेची उच्चतम मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत असून कर्ज परतफेडीचा कालावधी ५ वर्षे इतका आहे. अर्जदाराच्या वयाची मर्यादा १८ ते ५० वर्षे आहे. या योजनेमध्ये लाभार्थ्यांचा सहभाग ५ टक्के, महामंडळाचा सहभाग २० टक्के व बँकेचा सहभाग ७५ टक्के इतका आहे. यातील महामंडळाच्या सहभागावरील रक्कमेवर द.सा.द.शे ६ टक्के व्याजदराने परतफेड करावी लागते.
.................
दोन्ही योजनांसाठी लागणारी कागदपत्रे
थेट कर्ज योजना व २० टक्के बीज भांडवल योजना या दोन्ही योजनांच्या लाभासाठी पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, तहसीलदार, नायब तहसीलदर यांनी दिलेला उत्पनाचा दाखला (ग्रामीण व शहरी भागाकरिता कुटुबांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत) सक्षम अधिकाऱ्याने दिलेले इतर मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र, दरपत्रक (कोटेशन) प्रकल्प अहवाल, आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, रेशनकार्ड झेरॉक्स, स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करण्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र, महाराष्ट्र रहिवासी दाखला (डोमिसाइल) किंवा रहिवासी दाखला, वयाच्या पुराव्याकरिता शाळा सोडल्याचा किंवा जन्म दाखला, थेट कर्ज योजनेकरिता अर्जदाराचा सिबील क्रेडिट रिपोर्ट (सिबील स्कोअर किमान ५०० असावा), आधारकार्ड लिंक पासबुकची झेरॉक्स, भाडेकरार किंवा संबंधित जागामालकाचे संमतीपत्र व व्यवसायाच्या जागेचा असेसमेंट उतारा आदी कागदपत्रे लागतात.
................
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा या योजना संपूर्णपणे संगणीकृत (ONLINE) आहे. या योजनेमध्ये बँकेने १० लाखांपर्यंतच्या मर्यादित कर्ज मंजूर केलेल्या अर्जदाराने कर्जाचे हप्ते नियमित भरल्यानंतर व्याजाची रक्कम (१२ टक्के मर्यादित) अर्जदाराच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येते. योजनेचा कालावधी ५ वर्षे असेल. योजनेसाठी अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षे असावे. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ८ लाखांपर्यंत असावी, तहसीलदारांच्या उत्पन्न दाखल्यानुसार कुटुंबातील एका व्यक्तीलाच या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराचे आधार संलग्न बँक खाते असणे अनिवार्य आहे. महामंडळाच्या www.msobcfdc.org (व्याज परतावा योजना पर्याय) या वेबपोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने कर्ज अर्ज भरणे आवश्यक आहे. महामंडळाच्या अटी व शर्तीनुसार संगणकीकृत सशर्त हेतूपत्र (Lettrer of Intent) दिले जाईल. अर्जदारास याआधारे बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्यावे लागते.
..................
गट कर्ज व्याज परतावा योजना
गट कर्ज व्याज परतावा योजना संपूर्णपणे संगणीकृत (ONLINE) आहे. या योजनेतंर्गत १० लाख ते ५० लाख रुपयांपर्यंत कर्जाची मर्यादा असून, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महामंडळाच्या निकषानुसार विहित केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचतगट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था कंपनी (कंपनी अधिनियम २०१३ अंतर्गत), LL.P,FPO अशा शासनमान्य प्राप्त संस्थांना बँकेमार्फत स्वयंरोजगार उद्योग उभारणीकरिता जे कर्ज दिले जाईल, त्या कर्ज रकमेवरील व्याज परतावा बॅंक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल. तसेच गटातील सर्व सदस्यांचे वय १८ ते ४५ वर्षे असावे. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ८ लाखपर्यंत असलेल्या उमेदवारांच्या गटास बँकेकडून १० लाख ते ५० लाखांपर्यंत मंजूर उद्योग उभारणीकरिता कर्ज उपलब्ध केले जाईल. गटातील सर्व सदस्यांचा सिबील क्रेडिट स्कोअर किमान ५०० इतका असावा. या कर्जाचा परतफेड कालावधी ५ वर्षे किंवा कर्ज कालावधी यापैकी जो कमी असेल, याकरिता राहील. कर्ज मंजूर झालेल्या गटाने कर्जाचे हप्ते नियमित भरल्यास (जास्तीत जास्त १२ टक्के व्याजदराच्या किंवा १५ लाखाच्या मर्यादेत) व्याज परताव्याची रक्कम त्यांच्या आधार लिंक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. महामंडळाच्या www.msobcfdc.org (व्याज परतावा योजना पर्याय) या वेबपोर्टलवर Group Loan ऑनलाईन पध्दतीने कर्ज अर्ज भरणे आवश्यक आहे. महामंडळाच्या अटी व शर्तीनुसार संगणीकृत सशर्त हेतूपत्र (Letter Of Intent) दिले जाईल. या गटास या आधारे बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्यावे लागेल.
...................
व्याज परतावा योजनांसाठी कागदपत्रे
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणि गट कर्ज व्याज परतावा योजना या दोन्ही योजनांसाठी इमाव प्रवर्ग जातीचा दाखला, तहसीलदारांचा आठ लाख रुपये उत्पन्न दाखला, आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ट फोटो, बँक पासबुक, जन्म, शाळा सोडल्याचा दाखला, महाराष्ट्र रहिवासी दाखला किंवा ग्रामविकास अधिकारी यांचा रहिवासी दाखला, रहिवासी पुरावा म्हणून गॅस बुक, पासपोर्ट, लाईट बिल, भाडे करार इत्यादी व्यवसायासंबंधित असणारी कागदपत्रे आवश्यक आहेत.
....................
कोट
इच्छुक गरजू इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील व्यक्तींनी योजनेच्या अधिक माहितीसाठी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ए विंग, सिंधुदुर्गनगरी ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग किंवा dmobcsindhudurg@gmail.com या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- निशिकांत नार्वेकर, जिल्हा व्यवस्थापक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.