सदर  ः छपाईचे आधुनिक युग

सदर ः छपाईचे आधुनिक युग

Published on

४ जुलै पान ३ टुडे वरुन लोगो व लेखक फोटो घेणे....

टेक्नो-----लोगो

फोटो ओळी
-rat१०p९.jpg ः संतोष गोणबरे
----------

छपाईचे आधुनिक युग

इंट्रो

मुद्रणकलेचा शोध हा मानवी जीवनातील क्रांतिकारी पर्व असून, या शोधामुळे ज्ञानप्रसाराला गती मिळाली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. साहित्य, नियतकालिके, वृत्तपत्रे, संदर्भग्रंथ, सामाजिक-राजकीय भाष्य करणारी पत्रके आदी अनेक लोकशिक्षणाची साधने छपाई स्वरूपात उपलब्ध झाली आणि प्रबोधनाचे एक प्रभावी साधन म्हणून छपाईतंत्र विकसित होत गेले. मुद्रण अर्थात छपाई म्हणजे कागदावर शाई वापरून मजकुराच्या व चित्रांच्या प्रती बनवण्याची प्रक्रिया होय. हा एक प्रकाशन प्रक्रियेतील महत्वाचा टप्पा असून अक्षराला अमरत्व देण्याची क्षमता असलेले हे तंत्रज्ञान काळानुरूप बदलत गेले आणि लाकडाच्या अक्षराचे ठसे, शिळा प्रेस, शिशाच्या अक्षराचे खिळे, स्क्रीन प्रिंटिंग, सायक्लोस्टाईल अशी प्रगती करत मुद्रणकला आज डिजिटल प्रिंटिंगच्या उच्च अवस्थेला पोहोचली आहे.

- संतोष गोणबरे
----

जर्मनीतील जोहान्स गटेनबर्ग या लोहव्यावसायिक, सुवर्णकार, मुद्रक आणि प्रकाशक व्यक्तीने १४४५ ला मुद्रणयंत्राचा शोध लावला. त्याने छापलेले ४२ ओळीचे लॅटिन बायबल पहिले छापिल पुस्तक होय. २४ फेब्रुवारी हा जोहान्स गटेनबर्ग यांचा जन्मदिवस असून, तो जागतिक मुद्रणदिन म्हणून साजरा केला जातो. भारतामध्ये मुद्रणकला १५५६ ला सुरू झाली. भारतीयांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याच्या इराद्याने बायबलच्या प्रति छापण्याकरिता हे छपाईयंत्र पोर्तुगाल येथून जहाजावरून प्रथम गोव्यात आले. पुढे कोचिन पुडीकाईल, अंबेलकडू, त्रांकेबार यासारख्या किनारी प्रदेशांमध्ये छापखाने सुरू झाले. महाराष्ट्रामध्ये १८८२ मध्ये मुद्रणास सुरवात झाली. यावर्षी अमेरिकन मिशनने मुंबई येथे मुद्राणालय सुरू केले. श्रीरामपूर येथून देवनागरी लिपीचे काही खिळे आणून १९१७ ला महाराष्ट्रात छापलेले पहिले पुस्तक उपलब्ध झाले आहे. याच मुद्रणालयात नोकरीस असलेले टॉमस ग्रहन यांनी देवनागरी आणि गुजराती लिप्यांचे साचे बनवून त्यांच्या मातृका तयार केल्या. अशा मातृका तयार करण्याचे कसब गणपत कृष्णाजी पाटील यांनी शिकून घेतले आणि त्यांनी पंचांगाची छपाई केली. छपाईमध्ये जे छापायचे आहे त्याची प्रतिमा प्रथम एका सपाट माध्यमावर घेऊन नंतर त्यावर शाईचा रूळ फिरवला जातो. रूळावरील शाई ही माध्यमापासून काहीशी उंच पातळीवर असल्याने ती प्रतिमेला चिकटते. ही चिकटलेली शाई प्रतिमेनुसार कागदावर दाबली जाते. अशा तऱ्हेने कागद किंवा इतर घटकांवर छपाई होते. छपाईच्या वापरातील माध्यमे म्हणजे ब्लॉक्स, टाईप, ऑफसेट प्लेट्स, दगड, स्क्रीन इत्यादी असतात. माध्यमामुळे छपाईचे तीन प्रकार पडतात. पहिल्या प्रकारात प्रतिमा त्या माध्यमातल्या कोऱ्या भागापेक्षा उंच आलेली असते. या छपाई प्रकाराला रीलिफ छपाई म्हणतात. छपाईच्या दुसऱ्या प्रकारात प्रतिमा ही कोऱ्या भागाच्या पातळीतच असते. याला रिसेस किंवा सरफेस छपाई म्हणतात. यात लिथोग्राफी, ऑफसेट छपाई, स्क्रीनद्वारे छपाई वगैरे प्रकार येतात. ऑफसेट छपाईमध्ये शाई माध्यमावरून जाते म्हणजेच ऑफसेट होते म्हणून त्यास ऑफसेट छपाई असे म्हटले जाते तर तिसऱ्या छपाई प्रकाराला इंटाग्लिओ छपाई म्हणतात. यात ग्रेव्ह्युअर पद्धतीने छपाई होते. यातली प्रतिमा कोऱ्या भागापेक्षा खोलगट भागात असते.
आज अनेक प्रकारची छपाई यंत्रे उपलब्ध आहेत; मात्र मोठ्या प्रमाणात छपाई करण्यासाठी दोन प्रकारची छपाई यंत्रे प्रामुख्याने वापरात आहेत. कागदाचे एकसारखे कापलेले तुकडे एकाच जागेवर बदलत राहून छपाई होते, यास शिफ्ट फेड यंत्र म्हणतात. या प्रकारच्या स्वयंचलित यंत्रांमध्ये एकेक कागद हवेच्या आकर्षणाने उचलला जातो आणि साच्याखाली सारला जातो. साच्यावरील शाईची प्रतिमा कागदावर उमटते व छपाई होते. छपाई झाल्यावर यंत्राच्या दुसऱ्या टोकाला ते कागद एकमेकांवर रचले जातात. शीट फेड यंत्राचा छपाई वेग कमी असतो आणि एका वेळी कागदाच्या एकाच बाजूला छपाई होऊ शकते. शीट फेड यंत्रात ४४.५ x ५७.२ सेमी आकाराचा डेमी पेपर किंवा डबल डेमी कागद वापरतात. त्यावरून यंत्राला डेमी, डबल डेमी किंवा क्राऊन साईझ असे संबोधिले जाते. दुसऱ्या प्रकाराला रोल फेड यंत्र किंवा वेबफीड रोटरी यंत्र असेही म्हणतात. यावर सलग कागदाचे रीळ लावून छपाई होते. रोटरी यंत्रामध्ये कागदाच्या दोन्ही बाजूला एकाचवेळी छपाई होऊ शकते. जर्मनीतील हेडेलबर्ग ही कंपनी अशी यंत्रे तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. रोल फेड यंत्रात छपाई झाल्यावर अनेक पाने एकमेकांत घालून दोन किंवा तीन घड्या घालून, कापून, मोजून देण्याची सोय असते शिवाय कागदाची जाडी त्याच्या वजनावर मोजली जाते. यासाठी ग्रॅम्सपर स्क्वेअर मीटर (जीएसएम) हे मापक वापरले जाते. वर्तमानपत्राचा कागद साधारणपणे पंचेचाळीस ते बावन्न जीएसएम इतका जाड असतो. छोट्या प्रमाणात छपाई करण्यासाठी डिजिटल छपाईचा उपयोग केला जातो. यासाठी २१० x २९७ मिमी आकाराचा ए ४ कागद मोठ्या प्रमाणात वापरला जातो. ब्ल्यू प्रिंट, डेझी व्हील, डॉट मॅट्रिक्स, लाईन प्रिंटिंग, हीट ट्रान्सफर, इंकजेट, इलेक्ट्रोग्राफी, लेझर छपाई, फोटोकॉपी इत्यादी निरनिराळी तंत्रे यासाठी वापरली जातात. छपाईसाठी झाडांच्या खोडापासून बनवलेला कागद वापरला जात असल्याने तो बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. या वृक्षतोडीमुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतात तसेच छपाईची शाई शिसे या धातूपासून बनवलेली असल्याने त्याचेही प्रदूषण होते. तरीही ज्ञानाची सार्वत्रिक उपलब्धता हा खूप मोठा सामाजिक परिणाम मुद्रणातून साधला जात असल्याने अशा प्रदुषणाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. आज कितीही डिजिटल क्रांती झालेली असली तरी छापील मजकूर वाचला आणि समजून घेतला तर तो मेंदूच्या गर्भगृहात अधिक चांगल्या संस्कारित वातावरणात रूजतो. अशी सवय आणि समज झालेली असल्याने पुढील अनेक वर्षे मुद्रणकलेला धोका नाही, हे खरेच!

(लेखक महाविद्यालयाचे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.