चिंदरमध्ये 36 जनावरे दगावली

चिंदरमध्ये 36 जनावरे दगावली

पान एक

१५३१८
चिंदरमध्ये ३६ जनावरे दगावली
अज्ञात साथ रोग; तासागणिक मृतांच्या संख्येत होतेय वाढ
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. २८ ः चिंदर (ता. मालवण) गावात तीन दिवसात तब्बल ३६ गुरे दगावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार नेमका कोणत्या आजाराने घडला हे स्पष्ट झालेले नाही. आज दुपारपर्यंत हा आकडा ३६ वर पोहचला असून गुरे दगावण्याची संख्या तासागणीक वाढू लागली आहे.
चिंदर येथे या प्रकाराला शनिवार (ता.८) पासून सुरुवात झाली. काल (ता.९) पर्यत दगावलेल्या गुरांची संख्या ११ झाली होती. आज ती ३६ वर पोहचली. अज्ञात साथ रोगामुळे ही गुरे दगावली असून निश्चित आजाराचे निदान झालेले नाही. गुरे दगावत असल्याचे समजल्यानंतर रविवारी सकाळी जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ. स्वप्नील अंबी यांच्या समवेत जिल्हा पशुधन विकास चिकित्सालय जानवलीचे डॉ. सतीश राऊत, आचरा येथील पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद कांबळी, डॉ. वसंत सवादे, डॉ. महेश परुळेकर, परिचर दत्तगुरु गांवकर, सागर तांबे आदींचे पशू वैद्यकीय पथक चिंदर येथे दाखल झाले होते. या पथकाने सुरुवातीला दगावलेल्या काही गुरांचे विच्छेदन केले आहे. तपासणीसाठी काही नमुने गोळा केले आहेत. ज्या ठिकाणी गुरे चरण्यासाठी जात होती, अशा भागाची पाहणी केली असून उगवलेल्या वनस्पतीही तपासून त्यातील बदल नोंद करून घेतले आहेत. सतत पडणाऱ्या पावसाचे काही रानावर बुरशीजन्य पदार्थ दिसून आला आहे. तो पदार्थ पोटात गेल्याने ही गुरे दगावली जात असल्याचा प्राथमिक अंदाज या पथकाने दर्शविला.
तीन दिवसांपासून सकाळी चरावयास गेलेली गुरे सायंकाळी घरी परतल्यानंतर गोठ्यात बांधल्यानंतर रात्रीच्या सुमारास या गुरांच्या घशाकडील भागाला सूज येऊन त्यांचे पोट फुगले. अंगात ताप येऊन गुरे रवंथ करण्याची थांबली. चारा खाण्याचे सोडुन देत काही वेळातच ती दगावत होती, अशी माहिती स्थानिक शेतकऱ्यानी पशूवैद्यकीय पथकास दिली. दोन दिवसांत ११ गुरे दगावली होती. मात्र, पुढच्या काही तासात ही संख्या वेगाने वाढली. आज दुपारपर्यंत हा आकडा ३६ वर पोहचला. गुरे दगावण्याची संख्या तासागणीक वाढू लागली आहे. दगावलेल्या गुरांमध्ये गाभण गाई, नांगरणीच्या कामाचे बैल मोठ्या प्रमाणत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आतापर्यंत चिंदर येथील शेतकरी रत्नकांत चिंदरकर, गणेश तावडे, अशोक पाताडे, सुरेखा पाडावे, गोपाळ चिंदरकर, विजय रेवडेकर, श्रीकांत कांविनदे, सुरेंद्र परब, शिवाजी कानविंदे, प्रकाश कांविनदे, गणेश घाडीगांवकर, विल्यम फर्नांडिस, शोभा भरतू, सुभाष पालकर, बाबू पालकर, चंद्रकांत नार्वेकर, महेश गोलतकर, योगेश चव्हाण, प्रमोद तोरस्कर, नारायण पाटणकर, संतोष पाटणकर, अजित सावंत, दत्ताराम पारकर, रुपेश पडवळ, पास्कू फर्नांडिस, संतोष चिंदरकर आदींची मिळून आज दुपारपर्यंत ३६ जनावरे दगावली आहेत.
पशुवैद्यकीय विभागाच्या टीम चिंदर गावात कार्यरत असून गुरांवर उपचार करत आहे. दगावलेल्या गुरांचे विच्छेदन करून पुणे येथील प्रयोगाळेत पाठवलेल्या नमुन्याचा अहवाल येणे अजून बाकी असून तो आल्यानंतरच या रोगाचे कारण स्पष्ट होणार आहे. आज आमदार वैभव नाईक, मालवण गटविकास अधिकारी आपासहेब गुजर, संजय गोसावी यांनी पशूवैद्यकीय पथक व शेतकरी यांची भेट घेत बाधित जनावरांची पाहणी केली. पशु वैद्यकीय पथकातील पशुधन विकास अधिकारी डॉ. तुषार वेर्लेकर, आचरा येथील पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद कांबळी, डॉ. परुळेकर यांनी गावातली प्रत्येक गोठ्यात पोहचत गुरांची तपासणी करुन उपचार करण्याचे काम हाती घेतले होते.

सध्या कोवळा चारा विपुल प्रमाणात उपलब्ध होत असल्याने खाद्य म्हणून तोच खाल्ला जात आहे. यातून विषबाधा होण्याची शक्यता जास्त आहे. यासाठी पशुपालकांनी जनावरांच्या आहारात सुका, ओला चाऱ्याबरोबरच सरकी पेंडचा वापर करावा. तोपर्यंत पशुपालकांनी जनावरे बाहेर सोडू नयेत.
- डॉ. तुषार वेर्लेकर, पशुधन विकास अधिकारी


गुरे दगावण्याची माहिती मिळताच भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यापर्यंत माहिती पोहोचवली. त्यांनी जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे पथक चिंदरमध्ये पाठवले आहे. गुरे दगावल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याबाबत केंद्रीय मंत्री राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- दीपक सुर्वे, प्रभारी सरपंच, चिंदर


साथ रोखण्यासाठी ज्या आवश्यक उपाययोजना आहेत, त्या करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. जिल्हा पशुधन विभागाशी मी संपर्कात आहे. आवश्यक ती सर्व मदत केली जाणार आहे. शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असून मदतीसाठी प्रयत्नशील आहे.
- वैभव नाईक, आमदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com