आगामी निवडणुकांसाठी सज्ज व्हा

आगामी निवडणुकांसाठी सज्ज व्हा

Published on

15449
सावंतवाडी : छत्र्या वाटप करताना शैलेश परब. शेजारी जिल्हाप्रमुख संजय पडते, गीतेश राऊत, बाळा गावडे, रुपेश राऊळ, गुणाजी गावडे आदी.


आगामी निवडणुकांसाठी सज्ज व्हा

शैलेश परब; पुढील खासदार पुन्हा विनायक राऊतच असतील

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ ः कोणी कितीही फुशारक्या मारू दे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा पुढील खासदार हे विनायक राऊतच असतील; मात्र यासाठी प्रत्येक शिवसैनिकाला मेहनत घ्यावी लागणार. त्यासाठी आतापासूनच तयारीला लागा, असे आवाहन ठाकरे गट शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदार संघ संपर्कप्रमुख शैलेश परब यांनी आज येथे केले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस ‘भगवा सप्ताह’ म्हणून आपापल्या गावागावांत साजरा करा. या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा. यासाठी शाखा व विभाग प्रमुखांनी गाव पातळीवर नियोजन करा, असे आवाहनही परब यांनी यावेळी केले.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये परब यांच्या माध्यमातून छत्र्या वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. सावंतवाडी तालुक्यातील छत्र्या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख संजय पडते, गितेश राऊत, चंद्रकांत कासार, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, बाळा गावडे, गुणाजी गावडे, सागर नाणोसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. परब म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षांमध्ये उद्धव ठाकरे यांनी विविध विकासात्मक कामे केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ, शासकीय मेडिकल कॉलेज व अन्य महत्त्वाचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले. कोरोना काळात त्यांनी केलेले काम गावागावांत पोहोचवा. आज मंत्रिपदासाठी लाचार होऊन ‘मिंधे’ गटात गेलेले दीपक केसरकर हे उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत; परंतु हेच कोरोना काळात पायदुखीचे कारण पुढे करून मुंबईतील घरात लपून बसले होते. त्यांचा खरा चेहरा खऱ्या अर्थाने जनतेसमोर येण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस ‘भगवा सप्ताह’ म्हणून साजरा झाला पाहिजे. यासाठी शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांनी गावागावांत मेहनत घ्या.’’
---
‘कोणी कितीही फुशारक्या मारू दे’
ते पुढे म्हणाले, ‘‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीबाबत आज काहीजण फुशारक्या मारत आहेत; मात्र कोणी कितीही फुशारक्या मारू दे, या मतदारसंघाचा खासदार विनायक राऊतच असणार. त्यासाठी शिवसैनिकांना थोडी मेहनत घ्यावी लागणार असून प्रत्येकाने आतापासूनच कामाला लागा. महागाई, जीएसटीबाबत जनतेमध्ये जाऊन आवाज उठवा. महागाईने जनता होरपळून निघाली आहे. सिलेंडरचे गॅस दुपटीने वाढले आहेत, हे जनतेला पटवून दिले पाहिजे."
यावेळी जिल्हाप्रमुख संजय राऊत, बाळा गावडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. येणारा काळ हा पुन्हा एकदा ठाकरे शिवसेनेचाच असणार, त्यामुळे कोणीही डगमगून न जाता संघर्षाने पेटून उठा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शैलेश परब यांच्या वतीने उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गावागावांतील पदाधिकाऱ्यांकडे छत्र्या वाटपासाठी सुपूर्द करण्यात आल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.