नानिवडेकरांची साहित्यात चौफेर कामगिरी

नानिवडेकरांची साहित्यात चौफेर कामगिरी

Published on

नानिवडेकरांची साहित्यात चौफेर कामगिरी

डॉ. संजीव लिंगवत; काव्य पुरस्कारांचे ऑनलाईन वितरण

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १७ : गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांनी गझल, साहित्य, पत्रकार या क्षेत्रांत चौफेर कामगिरी केली. अनेक उत्तमोत्तम गझल त्यांनी रसिकांना दिल्या. त्यांचे काव्य अमर आहे, असे प्रतिपादन जनसेवा प्रतिष्ठान, वेंगुर्लेचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत यांनी मधुसूदन नानिवडेकर काव्य पुरस्कार प्रदान कार्यक्रमात केले.
कणकवली येथील सिंधू वैभव साहित्य समुहाच्यावतीने या पुरस्कारांचे ऑनलाईन वितरण करण्यात आले. या पुरस्कारांचे हे दुसरे वर्ष आहे. घाटकोपर-मुंबई येथील मिताली तांबे यांच्या ‘मित काव्य’, पुसदा (जि. अमरावती) येथील एजाज शेख यांच्या ‘स्वच्छ हृदयाचे झरे’, कुडाळ येथील अंजली मुतालिक यांच्या ‘विवेकांजली’ या काव्य संग्रहाला साहस प्रतिष्ठानच्या रुपाली पाटील व डॉ. लिंगवत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी सिंधुवैभव साहित्य समुहाच्या अध्यक्षा स्नेहलता राणे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मिताली तांबे म्हणाल्या, ‘‘माझा लेखन प्रवास वाचनामुळे सुरू झाला. याची सवय मला वडिलांनी लावली. पती महेंद्र यांनी पुस्तक छापायची सूचना केली. एजाज शेख यांनी मनोगत व्यक्त करताना जात पात, धर्म, वंश, वय या पलीकडे जाऊन सिंधू वैभव साहित्य समुहाने पुरस्कार दिल्याबद्दल आभार मानले. कणकवली येथे २०१७ ला झालेल्या व नानिवडेकर अध्यक्ष असलेल्या ‘ब्रह्मकमळ’ या गझल कार्यक्रमात आपण सहभाग घेतल्याची आठवण त्यांनी सांगितली. अंजली मुतालिक यांनी नानिवडेकर यांच्या सुंदर पंक्ती सादर करून पुरस्कार स्वीकारला. सर्व लिहित्या हातांना प्रोत्साहन देणे, हा नानिवडेकरांचा गुण होता, असे त्या म्हणाल्या. नानिवडेकर यांच्या सोबत सहभाग घेतलेल्या अनेक कार्यक्रमांचा उल्लेखही त्यांनी केला. नानिवडेकर यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हा बहुमान असल्याचे मत तिन्ही कवींनी व्यक्त केले. नानिवडेकरांच्या सुकन्या अपूर्वा यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. कवी डॉ. सतीश पवार यांनी सूत्रसंचालन केले. तांत्रिक सहाय्य शैलेश घाडी यांनी केले. सिंधुवैभव साहित्य समुहाच्या अध्यक्षा स्नेहलता राणे (कणकवली) यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.