रत्नागिरी- टिळक पंचाग

रत्नागिरी- टिळक पंचाग

संग्रहित--KOP23M16990

निर्णयसागरचा अधिक श्रावण; टिळक पंचागाचा श्रावण
रत्नागिरी, ता. १८ ः निर्णयसागर पंचागाप्रमाणे आजपासून अधिक श्रावण महिना सुरू झाला आहे, तर टिळक पंचाग वापरकर्त्यांचा आजपासून श्रावण मास सुरू झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ठराविक गावांमध्ये टिळक पंचाग वापरकर्ते कुटुंब आहेत. त्यांच्या घरी व्रतवैकल्यांना प्रारंभ झाला आहे.
दर तीन वर्षांनी अधिक महिना येतो. टिळक पंचागानुसार पुढील वर्षी चैत्र महिना अधिक आहे. त्यामुळे श्रावणातील सर्व सण, गणेशोत्सव, दीपावलीसह सर्व सण एक महिना आधी साजरे होणार आहेत. त्यानंतर निर्णयसागर पंचागानुसारचे सण साजरे होतील. चैत्र महिन्यानंतर दोन्ही पंचांगांचे सणवार एकत्र साजरे होऊ लागतील. गेल्या १९ वर्षांनंतर श्रावण महिना अधिक आला आहे. त्यामुळे दोन्ही पंचांगांचे सणवार वेगवेगळे साजरे होतील. टिळक पंचागानुसार सध्या श्रावणातील सर्व सण साजरे होणार आहेत. यानुसार व्रतवैकल्ये, मंगळागौर, नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा सण साजरे केले जातील.
चांद्रमास व ऋतू यांची सांगड कायम राहण्यासाठी पंचागकर्त्यांनी अधिक मास दिला आहे. ज्या चांद्रमासात सूर्याचे राशीसंक्रमण होत नाही तो अधिकमास असतो. जुन्या आणि टिळक पंचागांमध्ये फरक येण्याचे कारण यांच्या सूर्यसंक्रांतीच्या वेळेत सुमारे चार दिवसांचे अंतर हे आहे. हे अंतर दोन्ही पंचागकर्त्यांनी राशिचक्रारंभास्थान वेगवेगळे मानल्याने येते. दोघांच्या राशिचक्रारंभ स्थानामध्ये चार अंशाचा फरक आहे. जुन्या पंचांगानी पूर्वीच्या गणिताच्या स्थूलतेमुळे झालेली चूक तशीच ठेवली आहे व टिळक पंचांगाने ही चूक दुरुस्त केली आहे.
---------
चौकट १
टिळक पंचागकर्ते
प्रो. केरो लक्ष्मण छत्रे यांनी १८६५ पासून हे भारतातील पहिले दृकप्रत्ययी शुद्ध निरयन पंचाग उदयास आणले. रत्नागिरीतील जगन्मित्र छापखान्याचे मालक जनार्दन आठल्ये हे १८६९ ते १८८९ या काळात पंचांग स्वखर्चाने छापत होते. १८९० पासून पुण्यातील वासुदेव जोशी छापू लागले. लोकमान्य टिळकांनी पंचागाचा पुरस्कार केल्यावर १९२६ पासून हे पंचाग केसरी मराठा संस्थेतर्फे छापले जात आहे. रत्नागिरीमध्ये हे पंचाग मिळते. अनेक कुटुंब हे पंचांग वापरत असून शाळा, ऑफिसला सुट्टी मिळत नसल्याने काही कुटुंबांनी निर्णयसागर पंचांग स्वीकारले आहे.
----------
चौकट २
टिळक पंचागानुसार साजरे होणारे सण
२३ जुलै- नागपंचमी, १ ऑगस्ट- नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन-८ ऑगस्ट, श्रीकृष्ण जन्माष्टमी, ९-गोपाळकाला. भाद्रपद महिन्यातील सण- १९ ऑगस्ट-हरितालिका, २०-श्री गणेश चतुर्थी, २१- ऋषिपंचमी, २४- गौरी आवाहन, २५- गौरीपूजन, २६- गौरीविसर्जन, २८- वामन द्वादशी, ३०- अनंत चतुर्दशी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com