तळेरेत उलगडले ‘जी. ए.’ यांचे साहित्य पैलू

तळेरेत उलगडले ‘जी. ए.’ यांचे साहित्य पैलू

17022
तळेरे ः ‘शताब्दी संस्मरण’ कार्यक्रमाचे उद्‍घाटन करताना वामन पंडित, सीमा मराठे, वर्षा वैद्य, डॉ. गुरुराज कुलकर्णी, डॉ. मिलिंद कुलकर्णी, दादा महाडिक, सचिन पावसकर, प्रवीण पोकळे, चंद्रकांत तळेकर. (छायाचित्र : एन. पावसकर)

तळेरेत उलगडले ‘जी. ए.’ यांचे साहित्य पैलू

अभिवाचनातून मानवंदना; ‘शताब्दी संस्मरण’ कार्यक्रमास प्रतिसाद

तळेरे, ता. १८ ः ‘संवाद परिवारा’तर्फे आणि ज्येष्ठ रंगकर्मी पंडित यांच्या ‘निलामय’ संस्थेमार्फत व त्यांच्या संकल्पनेतून प्रसिद्ध कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या ‘शताब्दी संस्मरण’ कार्यक्रम येथील वामनराव महाडिक विद्यालयाच्या डॉ. एम. डी. देसाई सांस्कृतिक भवनात झाला. यावेळी तीन कथा वाचकांनी कुलकर्णी यांच्या वेगवेगळ्या कथांचे अभिवाचन करत त्यांच्या लेखणीतील विविध पैलू उलगडले.
कार्यक्रमाचे उद्‍घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी वामन पंडित, डॉ. मिलिंद कुलकर्णी, कथा अभिवाचक सीमा मराठे, वर्षा वैद्य, डॉ. गुरुराज कुलकर्णी, सचिन पावसकर, प्रवीण पोकळे, चंद्रकांत तळेकर, दादा महाडिक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी वामन पंडित यांनी या कार्यक्रमामागची संकल्पना स्पष्ट केली. स्वातंत्र्योत्तर काळातील नामवंत कथा, कादंबरीकार म्हणून जी. ए. कुलकर्णी यांचा साहित्यिक क्षेत्रात मोठा प्रभाव होता. त्यांच्या लेखनशैलीने स्वत:चे असे वेगळे वैशिष्ट्य सिद्ध केले आहे. त्यांच्या अनेक शैलीदार कथा-कादंबऱ्यांमधून त्यांचे विविध पैलू अनुभवायला मिळतात, असे ते म्हणाले.
वेंगुर्ले येथील ‘किरात’च्या सीमा मराठे यांनी जी. ए. कुलकर्णी यांच्या ‘हिरवे रावे’ या कथा संग्रहातील ‘माणसाचे काय, माकडाचे काय’, ही सुरस कथा सादर केली. या कथेतील ‘सुभ्राव राव’ ही व्यक्तिरेखा म्हणजे वयोवृद्ध असलेले गणित विषयाचे निवृत्त शिक्षक आजारी आणि एकाकी बाहेरच्या जगाशी संपत चाललेला संवाद यामुळे आलेली उदासीनता, मुले दूर गेल्यामुळे होणारी चिडचिड, एकाकीपणाची भावना आणि व्यतीत झालेले जीवन, असह्य वेदना याचे भावविश्व मराठे यांनी सादर केले. कुडाळ येथील लेखिका, कवयित्री, अभिनेत्री वर्षा वैद्य यांनी ‘पिंगळावेळ’ या कथासंग्रहातील ‘लक्ष्मी’ ही कथा सादर केली. या कथेतील नवरा आणि सावत्र मुलगा यांच्या जाचक त्रासाला कंटाळून आणि सततच्या संघर्षमय जीवनाशी झुंज देताना एक अबला ब्राह्मण स्त्री कशाप्रकारे गावकुसाबाहेर मंदिरात अखेरचा श्वास घेते, याचे वास्तव चित्र रसिकांसमोर साभिनय सादर केले.
डॉ. गुरुराज कुलकर्णी यांनी ‘काजळमाया’ कथा संग्रहातील ‘पुनरपी’ ही कथा सादर करताना माणसाच्या जीवनातील जन्म आणि मृत्यू यातील सुंदर अंतर दाखविणारे दादा आणि माई हे वृद्ध दाम्पत्य आणि त्यांचे ‘लाडली’ नावाचे मांजर यांच्या भोवती फिरणाऱ्या कथानकाचे त्यांनी उत्तम सादरीकरण केले. डॉ. कुलकर्णी यांनी आभार मानले.
...............
चौकट
चित्रकृतीमधूनही ‘जी.ए.’ना मानवंदना
तळेरे येथील ज्येष्ठ पत्रकार व प्रसिद्ध चित्रकार उदय दुधवडकर यांनी अत्यंत कमी कालावधीत जी. ए. कुलकर्णी यांची हुबेहूब चित्रकृती रेखाटून ते चित्र कार्यक्रमस्थळी सादर केली. या चित्रकृतीतून कुलकर्णी यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करून मानवंदना दिली. दुधवडकर यांच्या या कलेबद्दल अनेकांनी कौतुक करून पाठीवर कौतुकाची थाप दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com