नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी
खासदार राऊतांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खासदार राऊतांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

17061
शिडवणे ः शालेय साहित्य वितरण करताना मान्यवर.

शिडवणे नं. १ शाळेत
शालेय साहित्य वाटप
तळेरे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिडवणे नं. १ शाळेत विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शाळेतील मुलांसाठी शैक्षणिक वस्तूंचे वितरण करण्यात आले. शिडवणे-गावठणवाडी उत्कर्ष मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यावेळी नारंगीबेन जैन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नीता जैन, वसंत जैन यांनी शिडवणे नं. १ व कोनेवाडी शाळेत छत्र्यांचे वितरण केले. मयूर शेठ, उज्ज्वला शेठ यांनी पाचवी ते सातवीच्या सर्व मुलांना कंपासपेट्या, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक नीलेश सांबरे व कार्यकर्त्यांनी सर्व मुलांना वह्या, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यातर्फे कार्यकर्त्यांनी वह्या, राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानित सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय टक्के यांनी पहिली ते चौथीच्या मुलांना पाट्यांचे वाटप केले. यावेळी सरपंच रवींद्र शेट्ये, उपसरपंच दीपक पाटणकर, ज्येष्ठ शिक्षणप्रेमी बंडू कोकाटे, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी विजय टक्के, मुंबई पोस्ट अधिकारी विलास चौकेकर, शालेय स्वराज्य मंडळाचे मुख्यमंत्री अथर्व कुडतरकर, माजी सभापती रवींद्र जठार, गावठणवाडी उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत शेटये, वाडीप्रमुख सदाशिव कुडतरकर, मंगेश शेट्ये आदी उपस्थित होते.
---
17057
विनायक राऊत

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे
कुडाळ ः चिंदर (ता. मालवण) गावामध्ये अज्ञात आजाराने ३१ शेतकऱ्यांची ४३ गुरे दगावल्याने ऐन शेती हंगामात झालेल्या या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जास्तीत जास्त आर्थिक साहाय्य मिळावे, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. या गुरांमध्ये काही दुभत्या गायींचाही समावेश आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य मंजूर करावे, अशी मागणी खासदार राऊत यांनी केली.
................
डॉ. महेश खलिपेंची साताऱ्याला बदली
सिंधुदुर्गनगरी ः सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांची सातारा येथे जिल्हा आरोग्य अधिकारीपदी बदली झाली. डॉ. खलिपे यांनी ८ जून २०१८ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला. पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी आरोग्य यंत्रणा सक्षमपणे राबवून शासनाच्या विविध योजना व उपक्रम यशस्वीपणे राबविले. कोरोना संकटात जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेकडून प्रभावी कामकाज करून साथ आटोक्यात आणण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यापूर्वी २०११ ते २०१४ या कालावधीत त्यांनी जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी म्हणून यशस्वी सेवा बजावली होती. त्यामुळे त्यांचे या जिल्ह्याशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. त्यांच्या जागी अद्याप नियुक्ती जाहीर न झाल्याने हे पद रिक्त राहणार आहे.
---
मलनिस्सारण वाहिन्या बदलणार
मुंबई : कुर्ला विभागातील मलनिस्सारण वाहिन्यांचे काम हाती घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या परिसरातील काही जोडण्या अपूर्ण होत्या; तर काही ठिकाणी कमी व्यासाच्या वाहिन्या होत्या. शिवाय जुन्या वाहिन्या जीर्ण झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर पालिका प्रशासन सुमारे सहा कोटी खर्च करत आहे. एल विभागातील, कुर्ला (पू) येथील व्ही. एन. पुरव मार्गालगत व्ही. एन. पुरव मार्ग व वसंतराव नाईक मार्ग जंक्शनपासून ते राहुलनगर नाल्यापर्यंत ४०० मि.मी. व्यासाची एच.डी.पी.ई. नलिका मलनिस्सारण वाहिनी टाकली जाईल. एल या विभागातील मलनिस्सारण वाहिनी एच.डी.डी. पद्धतीने टाकल्यामुळे तेथील सभोवतालच्या परिसरातील मलनिस्सारण समस्येचे निराकरण होऊन मलनस्सारण वाहिनी व्यवस्थेचा लाभ मिळेल व नागरिकांचे दैनंदिन जनजीवन आरोग्यदायी होण्यास मदत होईल, असा दावा पालिका प्रशासन करत आहे.
---
वैद्यकीय डिप्लोमाचे २६ अभ्यासक्रम रद्द
मुंबई : राज्यात मेडिकल डिप्लोमा आणि फेलोशिपसाठी दिल्या जाणाऱ्या सुमारे १ हजार जागा कमी करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शिक्षण आणि औषध विभागाने (एमईडीडी) एका मोठ्या कारवाईत कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जनद्वारे (सीपीएस) वैद्यकीय विद्यार्थ्यांना फेलोशिप आणि डिप्लोमा पदवी देणारे २६ अभ्यासक्रम रद्द केले आहेत. सीपीएसशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये त्रुटी आढळून आल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन (सीपीएस) मार्फत चालवल्या जाणाऱ्या पोस्ट ग्रॅज्युएशन मेडिकल डिप्लोमा कोर्सचे भवितव्य गेल्या काही महिन्यांपासून टांगणीला लागले होते. गेल्या वर्षी एमएमसीने सीपीएसशी संलग्न १२० वैद्यकीय संस्थांची तपासणी केली होती, त्यापैकी ७४ महाविद्यालयांनी तपासणी करण्यासाठी नकार दिला होता; तर तपासणीदरम्यान असे आढळून आले, की अनेक संस्थांमध्ये डिप्लोमा शिकवणाऱ्या प्राध्यापकांची कमतरता आहे आणि अनेक संस्थांमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता आहे. ज्यामुळे नॅशनल मेडिकल कौन्सिल (एनएमसी)च्या नियमांचे उल्लंघन होते.
----
अभिनेते गवस यांना आवाज परत मिळाला
मुंबई : हल्लीच्या जीवनात नावाबरोबरच तुमच्या आवाजालाही महत्त्व आहे. निसर्गाने प्रत्येकाला जसा वेगळा चेहरा, शरीररचना दिली, तशीच आवाजाची अर्थात ध्वनीची देणगी दिली आहे. त्यात जर ती व्यक्ती अभिनेता असेल तर त्यांचा आवाज ही त्यांची एक ओळख बनून जाते; मात्र काही कारणामुळे स्वरयंत्र म्हणजेच वैद्यकीय परिभाषेत सांगायचे तर व्होकल कॉर्डला काही दुखापत झाली तर ती व्यक्ती एका वेगळ्याच तणावाखाली जाते. मराठी रंगभूमी, चित्रपट तसेच वेब सिरीजमध्ये आपल्या अभिनयाची छाप पडणारे ज्‍येष्ठ रंगकर्मी अनिल गवस यांच्या घशावर नुकतीच बोरिवलीतील अॅपेक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयात स्वर व्हॉईस अँड स्वालोविंग क्लिनिकमध्ये यशस्वी शल्यचिकित्सा करण्यात आली.
----
मातंग समाजाचा उद्या मुंबईत महामोर्चा
मुंबादेवी ः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सामाजिक न्यायमंत्री यांनी २५ मार्च रोजी सकल मातंग समाजाची बैठक घेऊन एक महिन्याच्या आत मातंग समाजाच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु आज या घटनेला चार महिने झाले, तरी सरकारने शब्द पाळला नसल्याने सरकारला दवंडी देऊन जागे करण्यासाठी सकल मातंग समाजाच्या वतीने लहू तीर्थ पुणे ते मुंबई अशी दवंडी यात्रा काढण्यात येणार आहे. २० जुलै रोजी या दवंडी यात्रेचे आझाद मैदानावर महामोर्चात रूपांतर होणार आहे, अशी माहिती सकल मातंग समाजाचे नेते मारुती वाडेकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात दिली.
----
हर्नियाग्रस्त वृद्धेवर यशस्‍वी उपचार
मुंबई : जन्मतः नाभीच्या हर्नियाने ग्रस्त ७५ वर्षीय महिलेची असह्य वेदनेतून सुटका झाली आहे. झायनोवा शाल्बी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले. वेदना आणि अपचनाची तक्रार असणाऱ्या या महिलेवर हर्निओप्लास्टीद्वारे उपचार केले गेले. जनरल सर्जन डॉ. हेमंत पटेल यांच्या टीमने हे उपचार केले आहेत. इंदुमती पुजारी यांना जन्मजात नाभीचा हर्निया होता. तसेच मधुमेह आणि उच्चरक्तदाबाचा आजार होता आणि गेली २० वर्षांपासून त्यावर औषधोपचार सुरू होते. त्‍यांनी अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला. पण, प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. जनरल सर्जन डॉ. हेमंत पटेल म्हणाले की, महिलेला जन्मापासूनच पोटात वेदना होत होती. पण, हर्नियाचे निदान झाले नव्हते.
---
एचसीएल टेक-बी प्रोग्रामसाठी नोंदणी
मुंबई : समग्र शिक्षा अभियान आणि आयटी क्षेत्रील नामांकित ‘एचसीएल टेक’ कंपनीच्या माध्यमातून राज्यात सुरू असलेल्या ‘महाराष्ट्र यंग लीडर ॲस्पिरेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम’च्या ‘एचसीएल टेक-बी’ या उपक्रमासाठी आतापर्यंत ३८ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. महाराष्ट्र यंग लीडर ॲस्पिरेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवण्यासाठी मागील वर्षी एचसीएलसोबत राज्य समग्र शिक्षामार्फत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यातील एचसीएल टेक या उपक्रमासाठी २० हजार विद्यार्थ्यांना सशुल्क प्रशिक्षण देण्यात येत असून त्यासाठी या वेळी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात बारावीच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवत त्यासाठी नोंदणी केली आहे.
---
मार्वे चौपाटीवर बंदोबस्ताची मागणी
मालाड ः मार्वे चौपाटीवर रविवारी (ता. १६) घडलेल्या दुर्घटनेचा विचार करता तातडीने मालाड-पश्चिम येथील मार्वे चौपाटीवर सागरी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावेत, अशी मागणी मालाड-पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. मालाड-पश्चिम, मार्वे चौपाटीवर फुटबॉल खेळण्यासाठी गेलेले पाच युवक बुडाल्याची घटना रविवारी (ता. १६) घडली. यापैकी दोन तरुणांना वाचवण्यात स्थानिक मच्छीमारांना यश आले; तर तीन युवकांचे मृतदेह सोमवारी सापडले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी तातडीने मार्वे समुद्र किनारी सागरी सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी आमदार अस्लम शेख यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.यावर पालिका प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे औत्‍सुक्‍याचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com