वेंगुर्लेत ऑगस्टमध्ये विविध कार्यक्रम

वेंगुर्लेत ऑगस्टमध्ये विविध कार्यक्रम

वेंगुर्लेत ऑगस्टमध्ये विविध कार्यक्रम
‘दत्तमाऊली’चे आयोजनः त्रैवर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ३१ः दशावतार कला आणि कलाकार संवर्धन करण्याच्या दृष्टीने स्थापन झालेल्या सिंधुदुर्गातील दत्तमाऊली दशावतार लोककला शिक्षण प्रशिक्षण बहुउद्देशीय मंडळाला २० ऑगस्टला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त ''प्रवास दत्तमाऊलीचा, सोहळा त्रैवर्षपूर्तीचा'' अंतर्गत विविध उपक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती मंडळातर्फे देण्यात आली.
यात १ ऑगस्टला मातोंड हायस्कूल येथे दशावतार अष्टपैलू कलावंत (कै.) राजन गावडे आठवण सहवासाची अंतर्गत वृक्षारोपण, २ ला युनियन बँक, वेंगुर्ले शाखेतील कर्मचाऱ्यांचा सत्कार, ३ ला जिल्हा परिषद शाळा खुडास केळूस व मळई येथील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप होणार आहे.
पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि अकरावी व बारावीतील विद्यार्थ्यांनी ''दशावतार लोककला'', ''दशावतारातील एक आठवण'', ''दशावतार कलेतील तुमचा आवडता कलाकार'' यापैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहायचा आहे. ८ ऑगस्टला सर्व शाळा व महाविद्यालयांमधून संबंधित शिक्षक ही स्पर्धा घेणार आहेत. विद्यार्थ्यांनी लिहिलेले निबंध त्याच दिवशी संबंधित शिक्षक मंडळाकडे व्हॉटसअपच्या माध्यमातून सुपूर्द करतील. स्पर्धेतील तिन्ही गटांतील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे १०००, ७०० व ५०० अशी बक्षिसे देण्यात येतील. १० ला मठ येथील स्वयंभू मंगल कार्यालयात आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर, १३ ला मठ स्वयंभू मंगल कार्यालयात एकदिवशीय दशावतार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रवेश मर्यादा ३० असून, यामध्ये यशवंत तेंडोलकर, प्रशांत मेस्त्री, पपू नांदोसकर, दामोदर जोशी, कांता मेस्त्री, आनंद नार्वेकर, पपू घाडीगांवकर, चंद्रकांत खोत व हरेश नेमळेकर हे प्रशिक्षण देणार आहेत. प्रशिक्षणानंतर सहभागींकडून त्याचे सादरीकरण करून घेऊन त्यातील उत्कृष्ट भूमिका करणाऱ्यांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी ९ ते ५ या वेळेत होणार आहे.
२० ला दत्तमाऊली संस्थेचा त्रयवर्ष पूर्ततेचा सोहळा होणार आहे. यावेळी ऑनलाईन निबंध स्पर्धा व प्रशिक्षणार्थी बक्षीस वितरण, जितेश भगत (निवती) व जयेश कोनकर यांच्या धाडसाचा सन्मान, पाल येथील खाजणादेवी प्राथमिक शाळेतील मनस्वी पेडणेकर हिचा दत्तक योजनेंतर्गत सन्मान, दशावतार पुरस्कार वितरण सोहळा आणि सायंकाळी जिल्ह्यातील नामवंत नवोदित कलाकारांच्या संचात संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन दत्तमाऊली दशावतार लोककला शिक्षण प्रशिक्षण बहुउद्देशीय मंडळातर्फे अध्यक्ष सीताराम उर्फ बाबा मयेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी दत्तप्रसाद शेणई, मोरेश्वर सावंत, रुपेश नेवगी यांच्याशी संपर्क साधावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com