वेंगुर्ले तालुक्यात ''एनिमी प्रॉपर्टी''

वेंगुर्ले तालुक्यात ''एनिमी प्रॉपर्टी''

पान एक

वेंगुर्ले तालुक्यात ‘एनिमी प्रॉपर्टी’
१० कोटी किंमत; पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारलेल्याची जमीन
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३१ ः भारताचे नागरिकत्व नाकारत पाकिस्तान किंवा चीनचे नागरिकत्व पत्करलेल्या लोकांच्या भारतामधील मालमत्तांच्या विक्रीची प्रक्रिया केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरू केली आहे. अशा मालमत्तांना ‘शत्रू मालमत्ता’ (एनिमी प्रॉपर्टी) असे म्हटले जाते. अशी मालमत्ता सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यात आढळली आहे. ८५ गुंठे जागा असलेल्या या मालमत्तेची अंदाजे किंमत १० कोटी असून, ती सध्या कस्टोडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टी फॉर इंडिया (सीइपीआय) यांच्या ताब्यात आहे.
मूळ भारतीय रहिवासी असलेल्या भारतातील काही नागरिकांनी पाकिस्तान किंवा चीनचे नागरिकत्व स्वीकारले आहे. अशांच्या भारतात मालमत्ता आहेत. या मालमत्तांमधून त्यांना बेदखल करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. शत्रू देशांचे नागरिकत्व स्वीकारलेल्या नागरिकांना त्यांच्या मालमत्तेतून बेदखल करतानाच त्यांची मालमत्ता विकण्याची प्रक्रिया केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरू केली आहे. अशा शत्रू मालमत्ता देशभरात १२ हजार ६११ एवढ्या आहेत. या सर्व मालमत्तांची किंमत सुमारे १ लाख कोटी रुपये आहे. त्यांची विक्री करण्यासाठी असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने सुधारणा केली आहे. अशा १ कोटी किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या मालमत्तांच्या विक्रीत स्थानिक व्यक्तींना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यांनी ही जागा विकत न घेतल्यास नियमानुसार ती इतरांना विकण्यात येणार आहे. १ कोटी रुपये व त्याहून अधिक आणि १०० कोटी रुपयांपेक्षा कमी मूल्य असलेल्या शत्रू मालमत्तांची सीइपीआय ई-लिलाव किंवा अन्य कायदेशीर मार्गाने विक्री करू शकते. शत्रू मालमत्तेपैकी सोने, शेअर अशा जंगम संपत्तीची विक्री करून केंद्राला आतापर्यंत ३४०० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे; मात्र शत्रू मालमत्तांपैकी १२ हजार ६१९ जागांची अद्याप सरकारने विक्री केलेली नव्हती. महाराष्ट्रात अशा २०८ मालमत्ता असून, यात सिंधुदुर्गाचाही समावेश आहे. पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारलेल्या एका व्यक्तीची वेंगुर्ले तालुक्यात मालमत्ता आहे. ही अंदाजे ८५ गुंठे जागा असून, त्याची किंमत सुमारे १० कोटी रुपये एवढी आहे. अशा शत्रू मालमत्ता रत्नागिरी जिल्ह्यातसुद्धा आहेत. त्यांची संख्या ११ एवढी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले तालुक्यातील या शत्रू मालमत्तेची विक्री करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.

कोट
वेंगुर्ले तालुक्यात शत्रू मालमत्ता असल्याचे निश्चित झाल्यानंतर शासकीय यंत्रणेकडून याची मोजणी करून घेण्यात आली आहे. त्याचा दरसुद्धा निश्चित केला आहे.
- मच्छिंद्र सुकटे, निवासी उपजिल्हाधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com