अधिकाऱ्यांमुळे खेळाडूंवर अन्याय

अधिकाऱ्यांमुळे खेळाडूंवर अन्याय

20249
सावंतवाडी : येथे आयोजित पत्रकार परिषदेसाठी एकत्र आलेले कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी.

अधिकाऱ्यांमुळे खेळाडूंवर अन्याय

अर्चना घारे-परब; पालकांसह आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३१ ः कबड्डीसह जिल्ह्यातील सर्व खेळांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंवर अन्याय होत आहे. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे ही स्थिती ओढवली असून, शासनाने त्यांच्यावर कारवाई करावी; अन्यथा पालकांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागीय अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी दिला.
असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज येथे पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अर्चना घारे-परब, पदाधिकारी नंदन वेंगुर्लेकर, जितेंद्र म्हापसेकर, वसंत उर्फ अण्णा केसरकर, जावेद शेख, विकास केरकर, दीनानाथ बांदेकर, महेश कांडरकर आदी उपस्थित होते.
यावेळी घारे-परब म्हणाल्या, ‘‘सिंधुदुर्गातील कबड्डीची जिल्हा कबड्डी फेडरेशनने वाताहात लावली आहे. खेळाडू व पंचांवर अन्याय केला आहे. यामुळे कबड्डीचे मोठे नुकसान झाले आहे. विविध शासकीय योजनांपासून खेळाडू वंचित राहत असून, याला फेडरेशन कारणीभूत आहे. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची त्यांना साथ आहे. कबड्डीसह सर्वच खेळांची जिल्ह्यात दयनीय अवस्था आहे. अधिकारी बेजबाबदारपणे वागत आहेत. क्रीडा अधिकाऱ्यांनी विविध संघटनांची अलीकडेच बैठक घेतली; परंतु याचे कोणालाही निमंत्रण दिले नाही. केवळ दोन खेळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यासंदर्भात विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. ही स्थिती पाहता आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. लवकरच पालकांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करू.’’
अण्णा केसरकर म्हणाले, ‘‘मी फेडरेशनचा संस्थापक सदस्य असताना फेडरेशनतर्फे मला मृत दाखविण्यात आले. यासंदर्भात मी पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. संबंधितांविरुद्ध न्यायालयात चार्जशिट दाखल केले आहे. धर्मादाय आयुक्त, कोल्हापूर यांच्याकडेही दाद मागून जिल्हा कबड्डी फेडरेशनची कार्यकारिणी बरखास्त करण्याची सूचना केली होती; परंतु अद्यापही त्याबाबत कार्यवाही झाली नाही. राज्य फेडरेशन अध्यक्ष अजित पवार यांच्याही निदर्शनास ही बाब आणून दिली आहे.’’ म्हापसेकर यांनी १५ ऑगस्टपर्यंत चौकशी झाल्यास क्रीडा संचालक कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असे सांगितले. वेंगुर्लेकर यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी जिल्ह्यातील संघटनांना विश्वासात घेत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. विकास केरकर यांनी जिल्हा कबड्डी फेडरेशनची निवडणूक लावण्याची गरज व्यक्त केली.
---
गोळा केलेल्या निधीच्या हिशोबाचे काय?
दरम्यान, जिल्ह्यात जिल्हा कबड्डी फेडरेशनने राज्यस्तरीय कुमार-कुमारी गटातील खेळाडूंची निवड चाचणी आयोजित केली होती. त्यात मोठ्या प्रमाणात निधी गोळा करण्यात आला. आमदार, खासदारांकडूनही निधी देण्यात आला. जिल्हा कबड्डी फेडरेशनने याचा हिशोब अद्यापही दिला नाही. त्यामुळे यात मोठ्या प्रमाणात अपहर झाल्याचा संशय आहे. या संदर्भात तत्काळ चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी; अन्यथा १५ ऑगस्टला क्रीडा संचालक, कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर उपोषण छेडू, असाही इशारा सिंधुदुर्ग कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com