-मुरूड जंजिऱ्याचा स्वातंत्र्य संघर्ष
१७ (टुडे पान ३ साठी, सदर)
(५ ऑगस्ट टुडे ३)
इये साहित्याचिये नगरी ..........लोगो
-rat१८p४.jpg ः
OP२३M२४११५
नाना पुरोहित
-rat१८p८.jpg ः
P२३M२४११९
प्रकाश देशपांडे
------
मुरूड जंजिऱ्याचा स्वातंत्र्य संघर्ष
मुरूड जंजिरा ४०० वर्षे स्वराज्याला सलणारा काटा होता. शिवप्रभूंपासून पेशव्यांपर्यंत अनेकांनी प्रयत्न करूनही सिद्दीची राजवट संपवू शकले नाहीत. जंजिरा या जलदुर्गाच्या आश्रयाने अनेक सागरीदुर्ग जिंकणारा सिद्दी, त्याला देश स्वतंत्र झाल्यावरही पाकिस्तानात संस्थान विलीन करण्याची महत्वाकांक्षा होती; मात्र स्वातंत्र्यवीर नाना पुरोहित आणि मोहन धारिया आदींनी केवळ चार दिवसात सिद्दीला दांतीतृण धरून शरण आणले. या रोमहर्षक लढ्याची ही कथा.
१५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला; मात्र इंग्रजांच्या कुटनीतीने दुष्परिणामही मोठे होते. अखंड देशाचे विभाजन करून पाकिस्तान निर्माण केलेच. त्यात आणखी भर घातली. देशातल्या संस्थानिकांना स्वयंनिर्णयाचे हक्क दिले. देश स्वतंत्र झाला त्या वेळी संपूर्ण भारतात सहाशेच्या आसपास संस्थाने होती. भारतातील संस्थानिकांच्या चित्तचक्षुचमत्कारिक कथांवर आजवर अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सुखोपभोग, सत्तेचा उन्माद दाखवणारे संस्थानिक जसे होते. तसेच रयतेच्या उद्धारासाठी अविरत झटणारे राजर्षी शाहू महाराज, बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड, औंधचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी असे राजेही होते. देश स्वतंत्र झाल्याबरोबर अनेक संस्थानिकांना स्वतंत्र सत्तेची स्वप्ने पडू लागली. काश्मिरचा राजा हरिसिंग, हैद्राबादचा निजाम, जुनागढचा नबाब महाबतखान आणि महाराष्ट्रातल्या मुरूड जंजिरा संस्थानचा नबाब सिद्दी अहमद खान हे प्रामुख्याने होते. विशेष म्हणजे हैद्राबाद, जुनागढ आणि जंजिरा या संस्थानांचे राजे जरी अन्यधर्मीय असले तरी ८० टक्क्यांपेक्षा अधिक संस्था हिंदूंची होती. जुनागढच्या नबाबाने कसलाही विचार न करता जुनागढ पाकिस्तानात सामील होत असल्याचे जाहीर करून टाकले आणि जंजिरा संस्थानच्या नबाबानेही आपण पाकिस्तानात सामील होण्याचा मनोदय प्रकट केला.
सरदार वल्लभभार्इ पटेल संस्थानिकांशी बोलून संस्थाने भारतात विलीन होण्यातच जनतेचे हित आहे, हे सांगत होते; मात्र जंजिऱ्याचा सिद्दी दाद देत नव्हता. जनता पेटून उठली आणि जंजिरा मुक्तिलढा प्रारंभ झाला. जंजिरा संस्थांनचे म्हसळा, श्रीवर्धन, मुरूड ही तीन तालुके. म्हसळा तालुक्याच्या सीमेवर भारतीय हद्दीत खामगाव इथे संस्थानच्या स्वातंत्र्यासाठी अस्थायी सरकार स्थापन केले. या सरकारचे पंतप्रधान होते क्रांतिवीर नाना पुरोहित. गृहमंत्री सदाशिव बागार्इतकर या तीन तालुक्याएवढ्या राज्याचे परराष्ट्रमंत्री होते मोहन धारिया आणि संरक्षणमंत्री जनार्दन भोकरे. हे सारेच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अग्रभागी होते. १९३८ ला महाडच्या मामलेदार कचेरीवर हल्ला करणाऱ्या शेतकऱ्यांचे नेतृत्व नाना पुरोहितांनी केले होते. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटले. इंग्रज अधिकाऱ्यांनी नानांना दिसताक्षणी गोळी घालण्याचा आदेश दिला होता. मोहन धारिया १९४२ ला सत्याग्रहात सहभागी होऊन त्यांनीही कारावास भोगला होता. जंजिरा संस्थान भारतात विलीन झालेच पाहिजे, या निर्धाराने संस्थानातले शेतकरी आणि लष्करातून निवृत्त झालेले सैनिक अशी दीड हजाराच्या जवळपास सेना उभी राहिली. काही पिस्तुले, बंदुका मिळवल्या. ही वार्ता नबाबाला कळताच त्याने एका पोलिस अधिकाऱ्याबरोबर फौजफाटा देऊन म्हसळ्याला पाठवले. म्हसळा मुक्त करायचेच हा स्वातंत्र्यसैनिकांचा निश्चय होता. ठरलं, वाघाच्या गुहेतच प्रवेश करायचा. जरा चूक झाली तर प्राणाशी गाठ होती. मोहन धारिया सेवादलाचा गणवेश घालून कमरेला पिस्तुल अडकवून काही सैनिकांसह सरळ म्हसळा पोलिस ठाण्यात आले. पोलिस अधिकाऱ्याने दरडावून विचारले, ‘कोण तुम्ही? काय काम आहे?’ मोहन धारियांनी तितक्याच ठामपणे सांगितले, ‘मी जंजिरा संस्थानच्या हंगामी सरकारचा परराष्ट्रमंत्री आहे.’ अधिकारी हे उत्तर ऐकून भडकला. मुख्य म्हणजे संस्थान विलीन होणार नाही आणि सिद्दी अहमद खानाची राजवटच राहणार आहे, यावर त्याचा विश्वास होता.
पोलिस अधिकाऱ्याने पिस्तुलासाठी टेबलाच्या ड्रॉवरकडे हात नेताच मोहन धारिया यांनी तुमच्या पिस्तुलात किती गोळ्या आहेत यापासून ठाण्यात किती हत्यारे आहेत, याचा पाढा वाचला आणि आम्हाला रक्तपात नको आहे. हिंदू, मुसलमान संघर्ष न करता सर्वांसाठी स्वराज्य हवे असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर आमच्याकडे असंख्य बंदुका आणि शस्त्रास्त्रे आहेत, हेही सांगितले. नरमलेल्या पोलिस अधिकाऱ्याने ‘दुपारी चर्चा करूया’, असे सांगितले. धारिया आपल्या सहकाऱ्यांसह तळावर आले; मात्र म्हसळ्यात एका अल्पसंख्यांकाचे घर जाळल्याची वार्ता आली. पोलिस अधिकारी इसहाक पठाण खवळला़. धारिया आणि सहकारी येताच त्याने संतापून ‘इथे अल्पसंख्यांकाचे घर तुमच्या लोकांनी जाळले आता तुम्ही परत जाणार नाही म्हणून त्या जळत्या घरात तुम्हाला घालून मारणार,’ असे संगितले. मोहन धारिया निश्चयाने म्हणाले, ’चला कुठे घर जाळले ते बघूया.’ पोलिसांच्या पहाऱ्यात स्वातंत्र्यसैनिक त्या घराकडे निघाले. इकडे हंगामी सरकारच्या शिबिरात ही वार्ता गेली. आता मोहन धारिया आणि सहकारी यांचे परत येणे अशक्य. शिबिरातच नव्हे तर धरियांच्या घरीही ही बातमी गेली. त्यांचे नुकतेच लग्न झाले होते. सर्वजण घाबरले.
त्या जळलेल्या घराकडे जाताना धारिया आणि सहकाऱ्यांनाही आपली अखेर आली आणि जंजिरा संस्थान स्वतंत्र न होता पकिस्तानात विलीन होणार की काय, असे वाटू लागले. त्या जळलेल्या घराजवळ एक लहान मुलगा उभा होता. धारियांनी त्या मुलाला ’घर कुणी जाळलं‘, हे विचारताच तो म्हणाला. ’चाचानंच स्वतःच घर जाळलं. मी त्याला जाळू नको म्हटलं तर त्यानं ऐकलं नाही,‘ हे ऐकताच अधिकारी इसहाक पठाणाने घरमालकाला विचारले तर तो म्हणाला, ‘मला घराचे पैसे मिळाले.’ नबाबाच्या हस्तकांनी रचलेले कारस्थान उघडकीला आले. पोलिस अधिकाऱ्याला जनतेचा उद्रेक ध्यानात आला. आता इथे थांबण्यात अर्थ नाही, हे ध्यानात घेऊन पोलिस आपला फौजफाटा घेऊन मुरूडला गेले आणि म्हसळा मामलेदार कचेरीवर तिरंगा फडकला. म्हसळा तालुका २८ जानेवारी १९४८ ला स्वतंत्र होताच स्वातंत्र्यसैनिक सरळ श्रीवर्धन तालुक्याच्या कचेरीवर गेले. कसलाही प्रतिकार न होता ३० जानेवारीला श्रीवर्धन तालुका नबाबाच्या जोखडातून मुक्त झाला. आता मुक्त होणार जंजिरा जो चारशे वर्षापेक्षा अधिक काळ सिद्दीच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजी महाराजांपासून पेशव्यांपर्यंत अनेकांनी पराक्रमाची पराकाष्ठा करूनही जंजिरा जिंकता आला नव्हता, तो जंजिरा हंगामी सरकारचे सैनिक मुक्त करून किल्ल्यावर तिरंगा फडकवणार होते. तोच देशावर वज्राघात झाला. महात्माजींची हत्या झाली. तोपर्यंत सरदार पटेलांपासून ते नबाबापर्यंत ‘म्हसळा, श्रीवर्धन मुक्त आता फौज जंजिऱ्याचा ताबा घेणार’, अशा तारा गेल्या होत्या. नबाबाचा धीर सुटला. पाकिस्तानात सामील होण्याचे स्वप्नच राहिले. घाबरलेला नबाब मुंबर्इचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्यासमोर ३१ जानेवारी १९४८ ला गेला आणि निमूटपणे सामिलनाम्यावर सही केली. जंजिरा स्वराज्यात सामील झाले. चार दिवसाच्या लढ्यात जंजिरा संस्थान भारतात सामील करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना मानाचा मुजरा.
(लेखक इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि साहित्यिक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

