संगमेश्वर-राजापुरात आढळली दुर्मिळ हंसतुरा
फोटो ओळी
-rat18p35.jpg ःKOP23M24172 राजापूर ः पाण्यावर फुललेल्या ही वनस्पती हंसासारखी दिसत असल्याने तिला हंस तुरा हे नाव पडले.
-rat18p38.jpg ःKOP23M24183 राजापूर येथील चिरेखाणीत ही वनस्पती फुलली आहे.
-rat18p39.jpg ःKOP23M24184 अतिशय सुंदर दिसणारी वनस्पती.
(छाया ः नेत्रा पालकर आपटे, रत्नागिरी)
राजापुरात आढळली दुर्मिळ हंसतुरा वनस्पती
देशातील केवळ तीन राज्यात होतो आढळ; संवर्धनाची गरज
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. 18 ः राजापूर तालुक्यात अतिदुर्मिळ प्रजातीमध्ये मोडणारी हंसतुरा (अपोनोजेटॉन नटेशी) ही वनस्पती तुऱ्यांनी बहरलेली आढळली आहे. निसर्गप्रेमींसह पर्यटकांसाठीही मेजवानी आहे. मात्र ही वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने त्याचे संवर्धन होण्याची गरज निसर्ग अभ्यासक नेत्रा पालकर आपटे यांनी व्यक्त केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात पावसाळ्यात उगवणारी एक अति दुर्मिळ आणि इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या धोक्यात असलेल्या प्रजातींच्या रेड लिस्टमध्ये ''अतिधोकाग्रस्त'' या कॅटेगरीत असलेली ''अपोनोजेटॉन नटेशी'' नावाची एक पाणवनस्पती आढळते. या वनस्पतीचे साताऱ्यात आढळणाऱ्या ''वाय'' तुऱ्याशी जरी साधर्म्य आढळत असले तरी श्रीरंग यादव आणि अरुण चांदोरे यांनी केलेल्या शास्त्रशुद्ध अभ्यासामुळे ही प्रजाती पूर्णपणे वेगळी असल्याचे आपटे यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे माजी सल्लागार डॉ. एस. नटेश यांच्या नावावरून या वनस्पतीला ''अपोनोजेटॉन नटेशी'' हे नाव दिले गेले. महाराष्ट्रात फक्त राजापूर पट्ट्यात ही प्रजाती अतिशय थोड्या जागेपुरती मर्यादित आहे. देशात फक्त तीन ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकात याचा आढळ आहे आणि तेही अत्यंत थोड्या प्रमाणात. अत्यंत प्रदेशनिष्ठ असल्याने जर का या प्रजातीचे संरक्षण आणि संवर्धन झाले नाही तर ही पूर्णपणे नष्ट होऊ शकते.
सध्या हे तुरे वापरून सोडून दिलेल्या खोल चिरेखाणीत साठलेल्या पाण्यात वाढलेले आहेत. पावसाळा संपल्यावर त्यातील पाणी आटल्यावर जर का त्या खाणीच्या मालकांनी पुन्हा ती चिरेखाण वापरात आणायचा निर्णय घेतला तर तिथून ही वनस्पती पूर्णपणे नष्ट होण्याचा धोका आहे. कातळसड्यांवर चाललेल्या भरमसाठ बांधकामांमुळे इतर प्रजातींवर त्या त्या प्रदेशातून नष्ट होण्याचे संकट उद्भवलेले आहे; मात्र या हंसतुऱ्याइतक्या दुर्मिळ प्रजातीवर असे संकट येऊ नये म्हणून विशेष प्रयत्न करावे लागतील, असे आपटे यांनी नमूद केले. आपला रत्नागिरी जिल्हा हा जैवविविधतेच्या बाबतीत अत्यंत समृद्ध असा जिल्हा आहे. हे वैविध्य टिकवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रामाणिक प्रयत्न करणे, ही काळाची गरज बनली आहे.
----------
चौकट
दृष्टीक्षेपात वनस्पती
-दोन ते अडीच मीटर खोल पाण्यात वाढते
-अतिधोकाग्रस्त प्रकारात समावेश
-तुरा हंस पक्षासारखा दिसत असल्याने हंस तुरा नाव प्रसिद्ध
-
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये येतात फुले
ही प्रजाती दोन ते अडीच मीटर खोल पाण्यातच वाढते. पाण्याखाली याचा कांदा वाढतो, पानेही पाण्यातच असतात. देठ दोन एक मीटर वाढून पाण्याच्या वर याचा तुरा येतो. तो हंस पक्ष्याच्या चोचीसारखा दिसतो. त्यामुळे त्याला हंसतुरा म्हटले तरी चालण्यासारखे आहे. या तुऱ्यावर ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात छोटी छोटी फुले येतात आणि मग फळे धरतात; मात्र या वनस्पतीचे परागीभवन कसे होते, या विषयी अजूनही फारशी माहिती उपलब्ध नाही.
चौकट
निसर्गप्रेमींनी घेतला हंसतुरा पाहण्याचा आनंद
रत्नागिरी येथील निसर्ग अभ्यासक नेत्रा पालकर-आपटे यांना राजापूर तालुक्यात अतिदुर्मिळ प्रजातीमध्ये मोडणारी हंसतुरा ही वनस्पती तुऱ्यांनी बहरली असल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी विलंब न लावता थेट राजापूर गाठून हंसतुऱ्याची छायाचित्रे घेतली. निसर्गप्रेमींसाठी छायाचित्रातून का होईना हंसतुरा पाहायला मिळाल्याबद्दल अनेकांनी नेत्रा यांना धन्यवाद दिले आहेत. देवरूख येथील निसर्ग अभ्यासक प्रतीक मोरे यांनी प्रथम राजापूर येथे जाऊन ज्या भागात हंसतुरा डोलत आहे. त्याचा शोध घेतला आणि त्याची छायाचित्रेदेखील घेतली. मोरे यांनी नेत्रा पालकर आपटे यांना या दुर्मिळ वनस्पतीबाबत सांगितल्यानंतर त्यांनीदेखील राजापूर येथे जावून हंसतुऱ्याला छायाबद्ध केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

