भारताचे चांद्रयान

भारताचे चांद्रयान

३२ (टुडे पान २ साठी, सदर)

८ ऑगस्ट टुडे ३)
टेक्नोवर्ल्ड................लोगो

-rat२१p२३.jpg ः
P२३M२४८२६
संतोष गोणबरे
--------

भारताचे चांद्रयान ३

२३ ऑगस्ट २०२३ ही तारीख इतिहासातील नवा अध्याय लिहिण्यास उत्सुक आहे. या दिवशी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी भारताचे चांद्रयान ३ मोहिमेतील विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर उतरण्यास सज्ज आहे. पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील असलेले ३ लाख ८४ हजार ४०३ किमी अंतर पार करून अगदी निकट पोचलेले हे कृत्रिम उपकरण थोडेसेच किलोमीटर वा मीटर चंद्र-पृष्ठभागापासून दूर घिरट्या घालत अलगद उतरण्यासाठी आतूर आहे. अशावेळी अनेक प्रश्न एकाचवेळी मनात सतावतात आणि वैज्ञानिक शंका उपस्थित होतात. एवढ्या दूर अंतरावर संपर्क कसा होत असेल? यानाला सूचना कोण देत असेल? त्या सूचना मान्य करून त्यानुसार ते यंत्र कार्य करत असेल का? बिघाड होतो की नाही? होत असेल तर दुरुस्ती कोण करतो? एवढी माणसे एकाचवेळी एकाच अभियानात राबत असताना कोणत्या मानवी चुका होतात का? असे एक ना अनेक प्रश्न आपणच आपल्या मेंदूला विचारत राहतो आणि ‘हे तर विज्ञान-तंत्रज्ञान आहे’ असे स्वत:शीच उत्तर देऊन गप्पही बसतो; मात्र ही उत्तरे कशी बरे शोधायची?
मुळात एक लक्षात घेऊया की, जगातील सर्वोत्तम वेग हा प्रकाशाचा असून तो इंग्रजी ‘सी’ (c) या अक्षराने दाखवला जातो. त्याची किंमत २९ कोटी ९७ लाख ९२ हजार ४५८ मीटर प्रतिसेकंद म्हणजेच ३x१०८ मी./से. एवढी प्रचंड आहे; मात्र हाच वेग विद्युत-चुंबकीय लहरींचा (em waves) आहे, असे मानले जाते. कारण, हे गणितीय सुत्राने सिद्ध झालेले प्रमेय प्रकाशकिरणांना तरंगलांबी असते, हे दर्शवते. याच em waves कोणताही संदेश कुठेही आणि कोणत्याही स्थितीत इच्छित ठिकाणी पोहोचवण्यासाठी उपयोगी ठरतात; अगदी निर्वात पोकळी असली तरीही. त्यामुळे यान कितीही उंच उडाले तरी त्याची लगाम मॉनिटरिंग सेन्टरकडे सुरक्षित राहते. आताही लँडर आणि रोव्हरला याच प्रणालीद्वारे संदेशांचे आदान-प्रदान होते आहे. इस्रोची मुख्य नियंत्रण सुविधा कर्नाटक राज्यात हासन आणि मध्यप्रदेशातील भोपाळ येथे असून त्याची स्थापना १९८२ ला करण्यात आली. आतापर्यंत भारताने जेवढ्या अवकाश मोहिमा राबवल्या आणि उपग्रह आकाशात सोडले त्यांच्या नियंत्रणाचे कार्य हीच संस्था पाहते. सुरवातीचा वेग, कक्षा ठरवणे, कक्षा प्रसारण, कक्षेतील वेग, वेगातील दिशा, दुरमिती आदेश, कक्षा खंडन आणि पुनर्भरण, आकस्मित संकटकाळात संपर्कात राहण्याचा प्रयत्न इत्यादी अनेक महत्वाची कार्ये एकाचवेळी अनेक तल्लख मेंदू संगणकासमोर बसून एकदम शांतपणे निर्णय घेत em waves द्वारे संदेशवहन करत असतात. यात चुकीला पर्याय नाही की, आळसाला थारा नाही. एक जांभई अनेक वर्षांच्या मेहनतीवर पाणी ओतून सर्व स्वप्ने विझवून टाकेल, याची जाणीव ठेवूनच सर्व तंत्रज्ञ शब्दशः रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून मोहिमेचे मॉनिटरिंग करत असतात.
रशियाचे लुना-२५ मिशन अपयशी ठरून चंद्रावर कोसळले. हीच परिस्थिती भारताच्या चांद्रयान २ मोहिमेवेळी उद्भवली होती. दोघांच्याही अपयशाचे कारण ‘वेग नियंत्रणात नसणे’ हेच असून, शतांश फरकाने चुकलेले गणितीय समीकरण सेकंदाच्या हजारांश फरकात सर्व मिशनची कशी वाट लागते, हे सिद्ध करून निमूट अंतराळात एस्केप होऊन जाते. वेग नियंत्रणात राखण्यासाठी ‘थ्रस्ट’ किंवा ‘थ्रस्टर’ म्हणजेच दाब बदलावा लागतो. त्या दाबाचे विश्लेषण त्या परिस्थितीनुसार करणे अत्यावश्यक असते. इथे संगणकीय मदत मिळत असली तरी ‘सबकूछ कॉम्प्युटर करता है।’ अशी स्थिती नसते तर प्रचंड बुद्ध्यांक वापरून मानवी मेंदूला ते समग्र स्टॅटिस्टिक्स उलटसुलट मांडत राहून योग्य तो निष्कर्ष काढावा लागतो. चांद्रयान ३ मोहिमेचे महत्वाचे लक्ष्य चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडरचे उतरणे हेच आहे. चांद्रयानमधील लँडरचं नाव ‘विक्रम’ (डॉ. विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ) असून रोव्हरचं नाव ‘प्रज्ञान’ आहे. विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंगनंतर म्हणजेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर त्यातून बाहेर येईल आणि चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल. चांद्रयान ३ ची सुरवात १४ जुलैला दुपारी २.३५ वा. बाहुबली रॉकेट एलव्हीएम ३ (LMV ३) यशस्वी प्रक्षेपणातून झाली होती. या मोहिमेतील आतापर्यंतचे सर्व टप्पे ठरल्याप्रमाणे पार पडले असून, यापुढील मुख्य लक्ष लँडरचा वेग १६८० मी./से. वरून २ मी./से. इतका कमी करणे हेच असेल. त्यामुळे फायनल लँडिंगच्यावेळी द्यावा लागणारा थ्रस्ट कमीतकमी असेल आणि क्रेटर्स म्हणजेच अडथळे नसणाऱ्या जागी सॉफ्ट लँडिंग सहज करता येईल. म्हणूनच संध्याकाळची ५.४७ ही ठरलेली वेळ बदलून शास्त्रज्ञांनी १७ मिनिटे वाढवून ६.०४ अशी वेळ निश्चित केली आहे. भारताचे बुद्धिवैभव कधीच अर्धोन्मिलित नव्हते; पण उद्याच्या यशाने ते सोन्याच्या तेजाहून अधिक प्रकर्षाने तेजाळून निघणार आहे. खूप मोठा पल्ला असतो हा. दूर अंतरावरून दुसऱ्या कुणाला संमोहित करून आपल्या ताब्यात ठेवणे... कारण, अनेकविध बले गुरूत्वीय आकर्षणे प्रयुक्त करत असतात. तरीही आपल्या शास्त्रज्ञांच्या इच्छाशक्तीने विक्रम लँडर चंद्राला भूलवण्यात अद्यापपर्यंत तरी यशस्वी झालेला आहे. भारताच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने चंद्राच्या अंधाऱ्या दक्षिण कोपऱ्यात तिरंगा झेंडा अभिमानाने फडकेल आणि सर्व जग अचंबित होऊन पाहत राहील, अशीच आशा करूया आणि तशाच शुभेच्छादेखील व्यक्त करूया. भारत माता की जय!

(लेखक महाविद्यालयाचे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com