समुद्र आणि त्यातील जलचर
२० (टूडे ३ साठी)
(११ ऑगस्ट १०२)
सागरमंथन ...........लोगो
rat२४p६.jpg ः
२३M२५५०२
डॉ. स्वप्नजा मोहिते
समुद्र आणि त्यातील जलचर
समुद्रात नवनवे जीव उत्क्रांत पावत गेले त्या वेळी उपलब्ध असणारे समुद्री पर्यावरण, त्याचे तापमान, क्षारता, इतर भौतिक आणि रासायनिक घटक समुद्रातील जैविक घटकांवरही परिणाम करत होते. त्यातूनच उपलब्ध अधिवासांसाठी होणारी स्पर्धा, योग्य अधिवास यातून या सजीवांमध्ये अनेक शारीरिक बदल होत गेले. शरीरांतर्गत रचनाही बदलत गेल्या. डायनोफ्लेजेलेट, डायटॉम्स अशा वनस्पतींनी समुद्रातील प्राथमिक उत्पादनाचा पाय घातला. हे पुढे महासागरातील सर्वात वैविध्यपूर्ण आणि मुबलक फायटोप्लँक्टन बनले. या फायटोप्लँक्टनमुळे समुद्रातील अन्नसाखळीचा महत्वाचा दुवा निर्माण झाला. एकपेशीय सजीवांपासून अनेकपेशीय वनस्पती आणि प्राणीजीवनाचा उदय होत गेला. सायनोबॅक्टेरियापासून केल्पसारख्या मोठ्या वनस्पती आणि आदिजीवांपासून पोरिफेरा (स्पॉन्जेस), निड्यारिया (समुद्र फूल, जेलीफिश, प्रवाळ इ.), चापट कृमीवर्गीय प्राणी अशा जीवांची उत्क्रांती होत, संधिपाद प्राणी (खेकडे आणि कोळंबीवर्गीय), मृदुकाय प्राणी (शन्ख आणि शिंपलेवर्गीय प्राणी), कंटकचर्मी प्राणी (स्टारफिश, ब्रिटल स्टार) अशा अपृष्ठवंशीय जीवांबरोबरच पृष्ठवंशीय प्राणी वर्गातील मत्स्यवर्ग म्हणजे मासे उत्क्रांत झाले. हा सगळा कालावधी म्हणजे समुद्रातील एक अतिशय खळबळजनक काळ म्हणता येईल. अनेक सजीव निर्माण होत गेले... काही जगले... काही काळाच्या पडद्याआड लुप्त झाले. डार्विनच्या म्हणण्यानुसार, survival of fittest हा नियम सगळ्यांनाच लागू होता. आजही आहेच!
पृथ्वीवरील एकूण जीवसृष्टीपैकी अंदाजे ५०-८० टक्के सजीव महासागरामध्ये आढळतात आणि आपले हे महासागर पृथ्वीवरील ७० टक्के जागा व्यापतात. त्यातील १० टक्केपेक्षा कमी जगाचा मानवाने शोध घेतला आहे. महासागरातील एकूण ८५ टक्के क्षेत्रफळ आणि ९० टक्के आकारमान असलेल्या भागात अंधार आणि थंड वातावरण आहे ज्याला आपण खोल समुद्र म्हणतो. समुद्राची सरासरी खोली ३ हजार ७९५ मी. तर त्या तुलनेत जमिनीची सरासरी उंची ८४० मीटर आहे. या महासागरांमध्ये किती जीव राहत असतील आणि त्यातील कितींची आपल्याला ओळख झाली आहे, हा एक मोठाच प्रश्न आहे. सध्या शास्त्रज्ञांनी सुमारे १.५ दशलक्ष प्रजातींची नावे दिली आहेत आणि त्यांचे यशस्वीरित्या वर्गीकरण केले आहे. असा अंदाज आहे की, या सागरांमध्ये अजूनही २ ते ५० दशलक्ष अधिक प्रजाती अशा आहेत ज्या अद्याप सापडलेल्या नाहीत किंवा चुकीच्या पद्धतीने वर्गीकृत केल्या गेल्या आहेत. वर्ल्ड रजिस्टर ऑफ मरिन स्पिसिज (WoRMS) नुसार सध्या किमान २ लाख ३६ हजार ८७८ सागरी प्रजातींना नावे दिली गेली आहेत; पण त्यांच्या अंदाजानुसार, बहुधा किमान ७ लाख ५० हजार सागरी प्रजाती (१.५ दशलक्ष प्रजातींपैकी ५० टक्के) असाव्यात तर काहींच्या अंदाजानुसार, २५ दशलक्ष समुद्री प्रजाती असाव्यात. माशांच्या बाबतीत बोलायचे झाले तर किती प्रजाती असतील माशांच्या या समुद्रात? माशांची संख्या मोजणे हे एक कठीण आणि जवळजवळ अशक्य काम आहे. शिकार, मासेमारी, पुनरूत्पादन आणि पर्यावरणीय स्थितीसारख्या घटकांमुळे संख्यादेखील सतत बदलत आहे. जगात ३३ हजाराहून अधिक माशांच्या प्रजाती अस्तित्वात आहेत आणि बरेच काही नेहमीच शोधले जात आहे. याचा अर्थ भविष्यात ती संख्या गगनाला भिडू शकते. शेवटी, मानवाने केवळ २० टक्के महासागराचा शोध लावला आहे. शास्त्रज्ञ मासे मोजण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात. सर्वात सोपी पद्धत म्हणजे पाणबुडी, उपग्रह, ड्रोन आणि जलचरांवर लावलेले जीपीएस सेन्सर. मत्स्यगणना करताना स्कुबा डायव्हर्सचाही उपयोग होतो कारण, ते पाण्याखाली जाऊन निरीक्षण करू शकतात आणि ते जे पाहतात त्याचे फोटोही काढू शकतात. शास्त्रज्ञ विशिष्ट प्रजातींच्या संख्येचा अंदाज लावण्यासाठी विशिष्ट प्रदेशात चालणाऱ्या मच्छिमारांकडून डाटादेखील गोळा करतात. शास्त्रज्ञ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासारख्या माशांची गणना करण्यासाठी नवीन कार्यक्षम पद्धती विकसित करण्यासाठी काम करत आहेत. संकलित केलेला डेटा सोप्या विश्लेषणासाठी संगणकीकृत प्रणालीमध्ये टाकला जातो. या डाटावरूनच इतर माहितीसह अंदाज काढले जातात.
नवीन संशोधनानुसार, पृथ्वीच्या संपूर्ण प्राचीन इतिहासात असे अनेक कालखंड होते जेव्हा अनेक माशांनी खोल समुद्रातील थंड, अंधार असलेल्या पाण्यात राहणे पसंद केले होते. खोल समुद्रात आपल्या महासागरातील ९० टक्केपेक्षा जास्त पाणी आहे; परंतु सर्व माशांच्या प्रजातींपैकी फक्त एक तृतीयांश पाणी असलेल्या भागात आढळतात. याचे स्पष्टीकरण देताना संशोधकांनी असा निष्कर्ष काढला होता की, उथळ महासागरातील पाणी उबदार आणि नैसर्गिक स्रोतांनी भरलेले आहे, ज्यामुळे ते नवीन प्रजाती विकसित होण्यासाठी आणि त्यांचा विकास होण्यासाठी प्रमुख स्थान असावेत. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन स्कूलमध्ये पोस्ट डॉक्टरल संशोधक म्हणून अभ्यास पूर्ण करणाऱ्या एलिझाबेथ मिलर म्हणतात, कोरल रीफ्सकडे या दृष्टीने पहिले जाते. कारण, त्या खूप वैविध्यपूर्ण आणि जलचरांच्या वाढीसाठी उपयुक्त आहेत आणि ते नेहमीच असेच असेल, असे गृहित धरले जाते; पण मासे थंड आणि काळोख्या खोल समुद्रात स्थलांतर करत होते, हे निष्कर्ष खरोखरच त्या गृहितकाला आव्हान देतात आणि यावरूनच माशांच्या प्रजाती हवामानातील मोठ्या बदलांशी कसे जुळवून घेतात हे आपल्याला समजून घेता येईल. खोल समुद्राची व्याख्या करताना आपण साधारणतः ६५० फूट खोली असलेला समुद्राचा भाग अशी करतो. या खोलीवर प्रकाश संश्लेषण होण्यासाठी पुरेसा सूर्यप्रकाश नसतो. याचा अर्थ इथे उथळ प्रदेशांपेक्षा खूप कमी अन्न आणि उबदारपणा असतो ज्यामुळे तिथे राहणे कठीण बनते. त्यामुळे मासे विकसित होण्याचे प्रमाण कुठे जास्त होते, याचा अभ्यास करताना डॉ. मिलर यांना काही आश्चर्यकारक निष्कर्ष मिळाले. २०० दशलक्ष वर्षांपूर्वीच्या त्यांच्या अनुवांशिक नोंदींचा वापर करून माशांच्या संबंधांचे विश्लेषण करून डॉ. मिलर यांना असे दिसून आले की, स्पेसिएशन रेट-म्हणजेच नवीन प्रजाती किती लवकर विकसित झाल्या? ते दशलक्ष वर्षांचे असे कालखंड होते जेव्हा नवीन प्रजाती खोल समुद्रात उथळ भागांपेक्षा जास्त वेगाने विकसित होत होत्या. यासाठी काय करणे होती? या शोधाने उत्तरांपेक्षा प्रश्नच अधिक निर्माण झाले आहेत. प्राचीन लांमुळे आज आपल्याकडे असलेल्या प्रजातींची विविधता निर्माण करण्यात कशी मदत झाली? या प्रश्नांची उत्तरे आपण पुढल्या भागात शोधूया.
(लेखिका मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी येथे मत्स्य जीवशास्त्र विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.