वासुदेव गणेश जोशी उर्फ सार्वजनिक काका

वासुदेव गणेश जोशी उर्फ सार्वजनिक काका

Published on

३१ (सदर ः टुडे ३ साठी)

(९ सप्टेंबर टुडे ३)

इये साहित्याचिये नगरी ..........लोगो


- rat१५p२८.jpg-
२३M३०८१६
वासुदेव गणेश जोशी
- rat१५p२९.JPG-
२३M३०८१७
प्रकाश देशपांडे

वासुदेव गणेश जोशी उर्फ सार्वजनिक काका

२२ ऑक्टोबर १८७९ पुण्यातील न्यायालयात आल्फ्रेड केसर या न्यायाधीशासमोर अभियोगाला सुरवात झाली. क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्यावरील राजद्रोहाच्या आरोपावरून हा अभियोग होता. पुण्यातील असंख्य नागरीक हे पहायला गर्दीकरून आले होते. हातापायात साखळदंड बांधलेले वासुदेव बळवंत यांना घेऊन पोलीस न्यायालयात आले. आरोपीच्या पिंज-यात इंग्रज शासनाच्या विरोधात मनात फुललेला अंगार आपल्या दृष्टीतून फेकत वासुदेवराव ताठ कण्याने बसले. न्यायाधीशाने सरकारी वकिलाला विचारले आरोपीच्यावतीने बचाव कोण करणार आहे? सरकारी वकीलाने शांतपणे सांगितले ''कोणी नाही’. होय! सरकार विरूध्द बंड केलेल्या वासुदेव बळवंतांचा बचाव कोण करणार? हे करणे म्हणजे एक प्रकारे सरकार विरोधात वकीलपत्र घेण्यासारखेच होते. न्यायालयात निःशब्द शांतता पसरली आणि तेवढयात आपल्या मस्तकावरील लाल पगडी मिरवित आणि अंगावरचे उपरणे सारखे करत त्या गर्दीतून वाट काढत पुढे आले वासुदेव गणेश जोशी तथा सार्वजनिक काका. न्यायालयात जाण्यापूर्वी त्यांचे स्नेही म्हणाले होते. कशासाठी हे साहस ? अहो वासुदेव बळवंत याने राजद्रोह केला आहे. त्याक्षणी काका त्यांना म्हणाले. काय होर्इल? वासुदेव बळवंतांबरोबर मलाही फाशी देतील इतकेच ना? मला चालेल. हेच ते पुण्यातील तत्कालीन सर्वपरिचित सार्वजनिक काका!

- प्रकाश देशपांडे, चिपळूण

--------

काकांचे मूळगाव रत्नागिरी जिल्हयातील संगमेश्‍वर जवळच असलेले कसबा. त्यांचे पूर्वज कसब्यातून सातारा येथे गेले. ९ एप्रिल १८२८ रोजी काकांचा सातारा इथे जन्म झाला. वडील न्यायालयात नोकरीला होते. साता-यातच काकांचे सातवीपर्यंत शिक्षण झाले. पुण्याच्या न्यायालयात १८४८ साली कारकून म्हणून नोकरीला लागले. ७ -८ वर्षे नोकरी झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि वकिलीची परिक्षा देऊन वकिली सुरू केली. त्यांना सार्वजनिक कार्याची आवड होती. इंग्रज सरकारकडून सनदशीर मार्गाने काही सुधारणा घडवून आणाव्या यासाठी चैत्र शुध्द प्रतिपदा २ एप्रिल १८७० रोजी त्यांनी पुण्यात सार्वजनिक सभेच्या कामाला प्रारंभ केला. तत्कालीन कारण होते, ते पुण्याच्या पर्वती देवस्थानातील गैरव्यवहार दूर व्हावेत म्हणून. या सार्वजनिक सभेचे अध्यक्ष होते औंध संस्थानचे राजे श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी आणि कार्यवाह काका होते. १८७१ साली न्यायमूर्ती रानडे पुणे येथे न्यायाधीश म्हणून आले. न्यायमूर्ती सार्वजनिक सभेला सहकार्य करू लागले. मुंबर्इला बाँबे असोसिएशन आणि कलकत्त्याला ब्रिटीश इंडियन असोसिएशन या संस्था काम करत त्याच धर्तीवर पुण्यातील सार्वजनिक सभा काम करत होती. एतद्देशियांना समजावेत म्हणून कायद्याचे भाषांतर त्या त्या भाषेत व्हावे, तसेच न्यायालयात हिंदी व्यक्तींची नायाधीश म्हणून नियुक्ती व्हावी, नगरपालिंकामध्ये लोकनियुक्त सभासद घेण्यात यावेत. अशा अनेक सुधारणा व्हाव्यात म्हणून सार्वजनिक सभा काम करत होती. काकांची वकिली उत्तम चालत होती. आर्थिक समृध्दी आली तेव्हा त्यांनी मातोश्रींच्या इच्छेसाठी पुण्यात विष्णुमंदिर आणि हौद बांधला. स्वदेशी चळवळ म्हटले की महात्माजींची सर्वाना आठवण येते. १९०६ साली बंगालची फाळणी झाली आणि देशभर स्वदेशीचा जागर सुरू झाला. परदेशी कापडांची होळी करायला सुरवात झाली. मात्र पुणे शहरात स्वदेशीची मुहूर्तमेढ रोवली ती सार्वजनिक काकांनी. इथल्या हाताना काम मिळायला हवे. स्थानिक कारागिरांना उपजीविकेचे साधन हवे तर स्वदेशी शिवाय पर्याय नाही. काकांनी निश्‍चय केला. १२ जानेवारी १८७२ रोजी परकीय तलम वस्त्रांचा त्याग करून काका जाडीभरडी स्वदेशी वस्त्रे वापरू लागले. एवढेच करून ते थांबले नाहीत. घरी टकळीवर सूत काढून घरीच मागावर वस्त्रे विणू लागले. विशेष म्हणजे १८७७ साली व्हिक्टोरिया राणीला भारताची साम्राज्ञी घोषित करण्यासाठी दिल्ली दरबार भरला. भारतातले सगळे संस्थानिक आपले सारे जडजवाहीर घालून आणि राजेशाही दरबारी वस्त्रे परिधान करून राणीला मुजरा करायला आले होते. या दरबारात आपल्या घरी मागावर विणलेली स्वदेशी जाडीभरडी वस्त्रे घालून आले होते. वासूदेव गणेश जोशी तथा काकांनी राणी समोर मागणी केली ती भारतीय लोकांना ब्रिटनमधील नागरिकांप्रमाणे राजकीय आणि सामाजिक दर्जा द्यावा. भारतीय शिक्षणात स्वावलंबनाच्या शिक्षणाचा समावेश करावा. ब्रिटनच्या पार्लमेंटमधे भारतीय प्रतिनिधी घेण्यात यावेत. काका नुसते वाचीवीर नव्हते. त्यांनी स्वतः शार्इ, साबण, मेणबत्त्या छत्र्या बनवायला सुरू केल्या. त्या विक्रीसाठी पुणे ,सातारा, नागपूर, मुंबर्इ, सुरत, इथे दुकाने सुरू केली. इतकेच नाहीतर उत्तरप्रांतात आग्रा इथे कापडाची गिरणी सुरू केली. त्यात नुकसानही सोसले. सार्वजनिक सभेच्या माध्यमातून त्यांनी शेतक-यांच्या आर्थिक स्थितीची पाहणी केली.
१८७६- ७७ यावर्षी देशभरात प्रचंड दुष्काळ पडला. विशेषतः दक्षिण भारताला मोठया प्रमाणत संकटाला सामोरे जावे लागले. दक्षिण भारतात ५२ लाख तर नुसत्या महाराष्ट्रातच ८ लाख लोक अन्नावाचून मेले. पुणे भागात यावेळी सावकारशाहीला त्रासलेल्या शेतक-यांनी मोठा उठाव केला. सावकारांची कागदपत्रे जाळणे त्यांना इजा करणे असे प्रकार सुरू झाले. सार्वजनिक सभेच्यावतीने इंग्रज सरकारला कांही उपाय सुचविण्यासाठी काकांनी चौकशी सुरू करून शेतक-यांसाठी कायदा करायला भाग पाडले. त्याचबरोबर दुष्काळ निवारण फंड उभा करून त्यांनी स्वस्त धान्य दुकाने सुरू केली. दिल्ली दरबारच्या प्रसंगी भारतातील वृत्तपत्रांनी इंग्रजांच्या जुलमी कारभारावर टीकेची झोड उठवली. लॉर्ड लिटन हा त्यावेळी भारताचा व्हार्इसरॉय होता. कट्टर साम्राज्यवादी असलेल्या लिटनला वृत्तपत्रांनी केलेली टीका सहन झाली नाही. त्याने भारतीय वृत्तपत्रांवर निर्बंध आणणारा कायदा केला. काकांनी या कायद्याला विरोध केला. मुंबर्इमधे ९ मार्च १८७८ रोजी त्यांनी वृत्तपत्रकारांचे संमेलन आयोजित केले. इतकेच नव्हे कलकत्ता इथे झालेल्या अशा संमेलनाला आवर्जून उपस्थित राहिले. काकांप्रमाणेच त्यांच्या पत्नीचा सरस्वतीबार्इचाही सामाजिक कार्यात सहभाग होता. काकांना जातीभेद अमान्य होता. १८७१ साली त्यांनी स्त्री विचारवंती संस्था स्थापन केली. या संस्थेच्यावतीने सरस्वतीबार्इ सार्वजनिक हळदीकुंकू हा कार्यक्रम करत. या समारंभाला सर्वजातीच्या महिला उपस्थित असत. आयुष्यभर सतत सामाजिक कार्यासाठी वणवण करणारे गणेश वासुदेव जोशी तथा सार्वजनिक काका हृदयविकाराच्या आजाराने २५ जुलै १८८० साली वारले. काकांच्या कार्याचा सन्मान म्हणून जमविलेल्या निधीतून जागा खरेदी करून सार्वजनिक सभा सभागृहात उभारून त्याला काकांचे नाव देण्यात आले. आज बुधवार पेठेतील विजय मारूती चौकात हे स्मारक उभे आहे. काकांच्या पश्‍चात संस्थेत रानडे गोखले विरूध्द लोकमान्य असा संघर्ष झाला आणि इंग्रजांनी सार्वजनिक सभेची मान्यता रद्द केली. गेल्याच वर्षी सार्वजनिक सभेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव झाला. नव्या पिढीला चौकात असलेल्या सभागृहाचे नाव दिसते. मात्र काकांच्या सामाजिक कार्याचा फारसा किंबहुना अल्पसाही परिचय नसतो. जर पुण्यात ही स्थिती तर आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या कसबा संगमेश्‍वरच्या या सुपुत्राची माहिती कुठून असणार? या अपरांताने अशी अनेक नररत्ने देशाला दिली.

(लेखक इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि साहित्यिक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com