कोट्यावधी खर्चूनही कणकवलीत रस्त्यांची दैना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोट्यावधी खर्चूनही कणकवलीत रस्त्यांची दैना
कोट्यावधी खर्चूनही कणकवलीत रस्त्यांची दैना

कोट्यावधी खर्चूनही कणकवलीत रस्त्यांची दैना

sakal_logo
By

swt२२४.jpg
३२७५८
नाटळः गावातील मुख्य रस्त्यावर खड्डे पडले असून ग्रामस्थांनी या रस्त्यावरील खड्यात वृक्षारोपण करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

कोट्यावधी खर्चूनही कणकवलीत रस्त्यांची दैना
२६ योजनांतून निधीः ग्रामीणसह शहरी भागातही अवस्था बिकट
तुषार सावंतः सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २२ः तालुक्यात केंद्र आणि राज्याच्या तब्बल २६ विविध योजनांच्या माध्यमातून गेल्या आर्थिक वर्षात २ कोटी ९ लाख ९२ हजार रुपये खर्चून ग्रामीण रस्त्यांचा विकास करण्यात आला. कोट्यावधी रुपये रस्ते विकासासाठी खर्च करूनही तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. यामुळे ग्रामीण भागात आणि शहरी भागात नाराजीचा सूर मात्र कायम आहे.
राजकीयदृष्टा संवेदनशील असलेल्या आणि विविध राजकीय पक्षाचे प्रमुख नेते या तालुक्यामध्ये असल्याने येथे रस्ते विकासासाठी मोठा निधी खर्च केला जातो. तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गेल्या आर्थिक वर्षात २ कोटी ९ लाख ९२ हजार रुपये खर्चून ग्रामीण रस्त्यांचा विकास करण्यात आला. यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून ४४७ ठिकाणी रस्त्यांची कामे करण्यात आली. परंतु, सध्या नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची ही दुरावस्था आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर असून ठिकठिकाणी आंदोलनेही होत आहेत. रस्ते विकासासाठी केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून खासदार स्थानिक विकास, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम, सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून, ग्राममार्ग वार्षिक योजनेतून इतर जिल्हा मार्ग, वार्षिक योजनेतून शाळा बांधकामे, शाळा दुरुस्तीबरोबरच डोंगरी विकासा अंतर्गत रस्त्यांची कामे केली जातात. तीर्थक्षेत्र विकास (क) वर्गातून रस्ते विकसित केले जातात. नागरिकांच्या योजनांमधून जन सुविधा आणि नागरी सुविधामधून ग्रामीण आणि शहरी भागांमध्येही अंतर्गत रस्त्याची दुरुस्ती केली जाते. जिल्हा परिषद अनुदानातूनही रस्ते विकास केले जातात. रस्ते विकास व पुल देखभाल दुरुस्ती कार्यक्रमा अंतर्गत तीन हेडखाली ग्रामीण भागासाठी निधी उपलब्ध होत असतो. पंचायत समिती स्तरावरही सेस फंडातून रस्ते विकास कार्यक्रम होतो. अशा विविध योजनांखाली रस्त्यांचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण केले जाते. परंतु, हे रस्ते ठराविक कालावधीनंतर नादुरुस्त होतात. ही मोठी नाराजी आजही तालुक्यात जैसे थे आहे. इतर घटकातील समाजासाठीही वेगवेगळ्या योजनांमधून रस्ते विकास आणि विविध कामे हाती घेतली जातात. यासाठी अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क्षेत्रातून रस्ते विकास कार्यक्रम केला जातो. ग्रामविकास अंतर्गत २५-१५ या हेडखालीही विकास प्रक्रिया राबवली जाते. अनुसूचित जाती जमाती वस्ती विकास कार्यक्रम, अतिवृष्टी, पुरस्थिती उपाययोजने अंतर्गत दुरुस्तीची कामे केली जातात. पंधराव्या वित्त आयोगातून जिल्हास्तर आणि पंचायत समिती स्तरावर ही विविध रस्त्यांची विकास कामे होतात. अपारंपारिक ऊर्जा विकास कार्यक्रमा अंतर्गतही रस्ते विकास केले जातात. अनुसूचित जाती जमाती अंतर्गत साकव बांधकाम आणि रस्ते विकास केला जातो. अनुसूचित जाती उपायोजना कार्यक्रमा अंतर्गतही रस्ते विकास आणि विविध उपक्रम राबविले जातात. अशा पद्धतीने तालुक्यात जवळपास ४४७ रस्त्यांची कामे मार्च अखेर पूर्ण करण्यात आली आहेत. नव्याने या वर्षात १६६ रस्ते विकास कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. आत्तापर्यंत ६१३ रस्त्यांची आणि विविध विभागाची कामे पूर्ण झाली असून यासाठी २ कोटी इतका निधी खर्च करण्यात आला आहे. तरीही रस्त्याची दुरावस्था अजूनही कायम आहे. याबाबत नागरिकांमध्ये नाराजी असून प्रशासकीय पातळीवर गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
--------------
चौकट
केवळ २२ मैलकुली कामगार
तालुक्याच्या ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. परंतु, हे रस्ते वर्षानुवर्षी नादुरुस्त होतात. रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडतात. हे खड्डे बुजवण्यासाठी तालुकास्तरावर मैलकुलींची नियोजन असते. परंतु, गेल्या काही वर्षापासून मैलकुलींची भरती झालेली नाही. त्यामुळे आता केवळ २२ मौलकुली हे ६५ ग्रामपंचायती अंतर्गत पसरलेल्या रस्त्यांच्या डागडुजीचे काम करत आहेत. काहीवेळा ठेकेदारी पद्धतीने ही दुरुस्ती केली जाते. परंतु, दर्जेदार कामे येथे होत नसल्याने नाराजी आहे.
-----------------
कोट
ग्रामीण भागामध्ये रस्ता हा एकमेव पर्यायी मार्ग असतो. प्रत्येक गावात रस्त्यांचे जाळे पसरले असली तरी रस्त्यांची कामे गुणवत्ता पूर्ण होत नाहीत. अशी कामे दर्जेदार व्हावीत. प्रशासकीय पातळीवर अनेक निवेदन देऊनही रस्त्यांची दर्जेदार कामे होत नाहीत.
- अनिल पेडणेकर, माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते, चिंचवली
--------------