निर्यात घटल्याने म्हाकूळचे दर घसरले

निर्यात घटल्याने म्हाकूळचे दर घसरले

rat१३p१४.jpg-
३७६६५
हर्णेः गेल्या शनिवारपासून मासळी खरेदीसाठी पर्यटकांची आवक सुरू.

निर्यातीचा म्हाकूळच्या दरावर परिणाम
हर्णैत मच्छी खरेदी-विक्री सुरू; शनिवार-रविवार पर्यटकांची लगबग
राधेश लिंगायतः सकाळ वृत्तसेवा
हर्णै, ता. १२ः वादळ सरल्यानंतर हर्णेसह आजुबाजूच्या बंदारातील नौका मासेमारीला जाऊ लागल्या आहेत. सर्वात मोठी उलाढाल होणाऱ्या हर्णे बंदरात मासे लिलावाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे पर्यटन हंगाम सुरू झाला असून शनिवार-रविवारी मच्छी खरेदीसाठी पर्यटकांनी चिमणी बाजारात गर्दी केली. हर्णै बंदर हळूहळू गजबजायला लागले असले तरीही अपेक्षित मासळी मिळत नसल्याने मच्छिमारांना कसरत करावी लागत आहे. त्यात निर्यात कमी झाल्यामुळे म्हाकूळला दर कमी मिळत असल्याचे मच्छीमारांकडून सांगण्यात आले.
दापोली तालुक्यातील हर्णै बंदर हे प्रामुख्याने मत्स्य व्यवसायासाठी प्रसिद्ध बंदर आहे. रोजच्या मासळी खरेदी-विक्रीतून आणि या व्यवसायाच्या निमित्ताने असणारे इतर उद्योग मिळून दररोज एक कोटींची उलाढाल या बंदरातून होते. मागील महिन्यात विविध कारणांमुळे थांबलेली मासेमारी पुन्हा सुरू झाली आहे. परतीच्या मुसळधार पावसात वादळसदृश परिस्थितीमध्ये सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी मिनी महाबळेश्वरमध्ये हजेरी लावली होती. मात्र मच्छीच नसल्यामुळे दापोलीमध्ये आलेल्या पर्यटकांची निराशा झाली. सध्या मच्छिमार समुद्रात जाऊ लागल्यामुळे किनाऱ्यावर विक्रेत्यांची लगबग सुरू झाली आहे. सध्या छोट्या नौका कमी खोलीमध्ये जाऊन मासेमारी करत आहेत, तर मोठे ट्रॉलर खोल समुद्रात रवाना झाले आहेत. छोट्या दोन व चार सिलेंडरच्या नौकांची येणाऱ्या ताज्या मासळीसाठी शनिवारी चिमणी बाजारात पर्यटकांनी गर्दी केली होती. सलग सुट्ट्या असल्या की, मासळी खरेदीसाठी ही गर्दी अधिक होते. पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांना मासळी खाण्याचा विलक्षण आनंद असतो. त्यासाठी पर्यटक हर्णै बंदरात आवर्जून येतात. तालुक्यातील बहुतांशी हॉटेल व रिसॉर्टना झिंगा फ्राय, पापलेट थाळी, सुरमई थाळी, कोळंबी बिर्याणी आदी चटकदार मसालेदार डिशेसना पर्यटकांची पसंती असते. ताजी मासळी हे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. पर्यटकांना मासे खरेदी करताना सुरमई, पापलेट, शेवंड, आदी प्रकारची छोटी-मोठी मासळी हातात घेऊन सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही.
हर्णेतील लिलाव सुरू झाल्यामुळे खरेदी-विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे. सध्या बांगडा, म्हाकूळ बऱ्यापैकी मिळत आहे. पण त्याला अपेक्षित दर मिळालेला नाही. बांगडा ३० ते ३५ रूपये किलो, तर म्हाकुळ १९० रूपये किलो दराने विकले जात आहे. गतवर्षी म्हाकुळचा दर २५० रूपये किलो इतका होता. यंदा तो कमी झाल्यामुळे मच्छिमारांमध्ये निराशा व्यक्त केली जात आहे. म्हाकुळला सर्वाधिक मागणी युरोपसह अमेरिकेमध्ये आहे. परदेशातील मागणी कमी झाल्यामुळे सध्या दरावर परिणाम झाले आहेत. तरीही स्थानिक पातळीवर होणाऱ्या खरेदीचा फायदा विक्रेत्यांना होत आहे.

कोट
मासळी कमी प्रमाणात मिळत आहे. मोठ्या उलाढालीसाठी अजून वाट पहावी लागेल. काही नौका खोल समुद्रात मासेमारीला गेल्या आहेत. सुट्टीवेळी खरेदी-विक्री झाली होती. निर्यात कमी झाली की दरावर परिणाम होतो. सध्या म्हाकुळला गतवर्षीच्या तुलनेत कमी दर मिळत आहे. दर कमी झाला की मासेमारी परवडत नाही.
- नंदू चौगुले, मच्छिमार

------
चौकट
- मासळीच दर
मासे किलोचे दर (रूपये)
* सुरमई ६०० ते ८००
* पापलेट १०००
* बांगडा ३० ते ३५
* म्हाकुळ १९०
* मोठा बळा १९०
* छोटा बळा ७० ते ८०
* छोटी वाघटी ३०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com