जिल्ह्यात २७ पर्यंत
मनाई आदेश जारी

जिल्ह्यात २७ पर्यंत मनाई आदेश जारी

जिल्ह्यात २७ पर्यंत
मनाई आदेश जारी
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात ३ ऑक्टोबरपासून ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षाचे प्रतिस्पर्धी गट आपआपल्या कार्यकर्त्यांची जमवाजमव कार्यकर्ते मेळावे, कॉर्नर सभा घेऊन एकमेकांना लक्ष्य करत आहेत. त्यात आंदोलनात्मक घटना घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी. यासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी, त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन आजपासून २७ पर्यंत जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केले आहेत. या आदेशाचे कोणी उल्लंघन केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी सांगितले आहे.
--------------
मालवणात २९ ला
जिल्हा काव्य स्पर्धा
मालवण : येथील नगर वाचनमंदिरतर्फे कवी शरद साटम स्मृती जिल्हास्तरीय काव्य स्पर्धा २९ ला सकाळी दहाला संस्थेच्या सभागृहात आयोजित केली आहे. विजेत्यांना अनुक्रमे ७००, ५००, ३०० रुपये व प्रशस्तीपत्रक दिले जाणार आहे. सादरीकरणासाठी ३ ते ५ मिनिटे वेळ दिला जाईल. स्पर्धकाने स्वत: कविता सादर करायची आहे. तालुक्याबाहेरील स्पर्धकांना एसटी बस तिकीटाएवढा प्रवास खर्च देण्यात येईल. स्पर्धकांनी आपल्या कविता २६ ऑक्टोबरपर्यंत पोहोचतील, अशा रीतीने पाठवाव्यात अथवा आणून द्याव्यात. अधिक माहितीसाठी ग्रंथपाल संजय शिंदे यांच्याशी संपर्क साधावा. सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष उदयराव मोरे यांनी केले आहे.
.............
सिंधुदुर्गात सोमवारी
महिला लोकशाही दिन
सिंधुदुर्गनगरी ः ऑक्टोबर महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवारी (ता.१६) सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केला आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन प्र. जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी केले आहे.
--
‘आयुष्मान’ योजनेसाठी
२५७२ जणांची निवड
सावंतवाडी ः आयुष्मान भारत-पंतप्रधान लाभ लाभार्थ्यांकडे जनआरोग्य योजनेचा मिळविण्यासाठी आयुष्मान कार्ड असणे आवश्यक आहे. या योजनेच्या पुढच्या टप्प्यात शहरातील २५७२ लाभार्थ्यांची शासनामार्फत निवड करण्यात आली. कार्ड नोंदणीसाठी लाभार्थ्यांनी उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी व संजीवनी बालरुग्णालय, सालईवाडा तसेच मान्यताप्राप्त ''आपले सरकार केंद्र'' या ठिकाणी जाऊन ईकेवायसी पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.
-----------------
आजगावात उद्या
‘कथाकथन’ कार्यक्रम
सावंतवाडी ः आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा ३६ वा मासिक कार्यक्रम रविवारी (ता.१५) सायंकाळी पाचला आजगाव वाचनालयाच्या सभागृहात आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचा विषय ‘कथाकथन’ असून रोहित आसोलकर, स्नेहा नारींगणेकर, रमेश गावडे आणि विनय सौदागर हे कथाकथन करतील. याचा साहित्यप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन साहित्य कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com