पान एक-एसटीच्या निविदा प्रक्रियेवरुन वाद

पान एक-एसटीच्या निविदा प्रक्रियेवरुन वाद

37837
कणकवली ः येथील एसटी विभागीय कार्यालयात निविदा खुली करण्यावरून शुक्रवारी वादंग झाला. त्यावर चर्चा करताना परशुराम उपरकर, संदेश पारकर, संदीप मेस्त्री आदी.

एसटी निविदा प्रक्रियेवरून वादंग

कणकवलीतील प्रकार; तांत्रिक त्रुटी ठरले कारण

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १३ ः सिंधुदुर्ग एसटी विभागातर्फे जिल्ह्यातील विविध एसटी बसस्थानकावरील ६२ बुक स्टॉल, उपहारगृह व अन्य दुकानांसाठी निविदा प्रक्रिया जाहीर झाली होती. या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज निविदा खुली करताना वादंग झाला. निविदा प्रक्रियेतील तांत्रिक आणि आर्थिक असे दोन स्वतंत्र लखोट्यामध्ये निविदा सादर करण्याचा विषय हा वादाचा मुद्दा होता; मात्र या प्रक्रियेमध्ये सर्वच एसटीच्या अधिकाऱ्यांची चूक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तूर्तास यावर पडदा टाकून निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे तब्बल तीन तासानंतर वादावर पडदा पडला. यावेळी पोलिसांनी कडक सुरक्षा ठेवली होती.

सिंधुदुर्ग एसटी विभागाने ‘लिव्ह अँड लायसन’ तत्त्वानुसार पुढील नऊ वर्षांसाठी विविध स्थानकावरील स्टॉल देण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. निविदा अर्ज देवाणघेवाण २३ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर कालावधीमध्ये होती. त्यानुसार गुरुवारपर्यंत (ता.१२) कार्यालयीन वेळेत निविदा जमा करून आज दुपारी तीन वाजता निविदा उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली. येथील एसटी विभागीय कार्यशाळेच्या एका कार्यालयात झालेल्या या प्रक्रियेवेळी सुरक्षा व दक्षता विभागाचे अधिकारी ग. द. मुळे, विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख, विभागीय लेखा अधिकारी सुवर्णा दळवी यांच्या उपस्थित होते. जिल्ह्यातील एकूण ६२ विविध प्रकारच्या स्टॉलसाठी २२० ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या. यावेळी सुरक्षा विभागाचे अधिकारी मुळे यांनी निदर्शनास आणून दिले की, निविदा भरत असताना प्रत्येक निविदाधारकाने तांत्रिक आणि आर्थिक माहिती वेगवेगळ्या लखोट्यामध्ये सादर करणे अनिवार्य आहे. तसा शासन आदेश मागील मेमध्ये आला आहे. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात येईल, असे उपस्थितांना सुचविले. यावरून वादंग झाला.
ही माहिती तेथे उपस्थित असलेल्या विविध निविदाधारकांनी सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींना दिली. यावेळी मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर, उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, भाजपचे युवा जिल्हा अध्यक्ष संदीप मेस्त्री, अण्णा कोदे आदी मंडळी एसटी विभागीय कार्यालयामध्ये आली. त्यांनी या प्रकाराची माहिती घेतली. यावेळी बराच काळ वाद झाला. बदललेल्या नियमाची माहिती कुणालाही नव्हती, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यामुळे एसटीच्या विभाग नियंत्रकापासून निविदा प्रक्रिया सादर करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सह्या करून या निविदा स्वीकारण्यात आल्याचा मुद्दा मांडत यात एसटी यंत्रणेचाच दोष असल्याचा आरोप उपस्थितांनी केला.
निविदा आजच जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली. सर्वानुमते हा विषय मान्य झाल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा व दक्षता विभागाचे अधिकारी मुळे, विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख यांनी अखेर निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सायंकाळी सहा वाजता या वादावर पडदा पडला. या प्रकाराची कुणकुण लागताच कणकवली पोलिस निरीक्षक अमित यादव, सहायक पोलिस निरीक्षक अनिल हाडळ यांच्यासह पथक आणि राखीव पोलिस दलाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले होते; मात्र सायंकाळी या वादावर पडदा पडल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरळीत झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com