आंबा, काजुवर अवकाळीचा घाला

आंबा, काजुवर अवकाळीचा घाला

Published on

आंबा, काजुवर अवकाळीचा घाला

लाखो बागायतदार संकटात ः सिंधुदुर्गच्या अर्थकारणावर होणार परिणाम

एकनाथ पवार ः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ९ ः प्रचंड मेहनत आणि लाखो रूपये खर्च करून फुलविलेल्या आंबा, काजू बागांवर महत्वाच्या क्षणी अवकाळीने घाला घातला आहे. सलग पाच ते सहा दिवस ढगाळ वातावरण आणि तीन दिवस पाऊस यामुळे लाखो बागायतदार अवलंबून असलेल्या या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान होणार हे स्पष्ट झाले आहे. आंबा, काजूवर विविध किडरोगांचा प्रादुर्भाव वाढून पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील हंगाम हातातून निसटण्याची शक्यता निर्माण झाली असून बागायतदारांचे अर्थचक्रच थांबणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्याच्या अर्थकारणावरही त्याचा परिणाम जाणवण्याची भीती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील बागायतदारांचे संपूर्ण अर्थकारण आंबा आणि काजू या दोन पिकांवर अवलंबून आहे. किनारपट्टीचे देवगड, मालवण, वेंगुर्ले या तीन्ही तालुक्याचे अर्थकारण आंबा आणि काजूवर तर पूर्वपट्ट्यातील तालुक्याचे अर्थकारण काजू आणि काही अंशी आंब्यावर आहे. यावर्षी थंडीअभावी आंबा, काजू हंगामाची वाटचाल रडतखडत सुरू होती. त्यातही काही ठिकाणी पालवी, मोहोर आला. परंतु, त्यावर देखील विविध किडरोगांचा प्रादुर्भाव जाणवला; मात्र, बागायतदारांचे अथक प्रयत्न आणि महागड्या किटकनाशकांचा वापर यामुळे सध्या आंब्याला दुसऱ्या टप्प्यातील मोहोर आणि फळधारणा सुरू होती. काजूलाही चांगली पालवी आणि मोहोर, बी तयार व्हायला सुरूवात झाली होती. अपेक्षित उत्पादन मिळणार नसले तर बागायतदार सावरतील, अशी स्थिती होती. बागायतदारांना देखील उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा होती. आंबा, काजू उत्पादनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा टप्पा सध्या सुरू होता. ६० टक्के आंब्याला मोहोर आलेला आहे. त्यामुळे पुढील पंधरा ते वीस दिवस अतिशय महत्वाचे होते. मात्र, ऐन महत्वाच्या क्षणी अवकाळीने घाला घातला. तीन-चार दिवस ढगाळ वातावरण होते. त्याला बागायतदार डगमगले नाहीत. विविध फवारण्या घेवून त्यावर मात करता येईल, असा आशावाद त्यांच्यामध्ये होता. परंतु, दुपारनंतर झालेल्या अवकाळीने आंबा, काजू बागायतदारांचे अक्षरक्षः कंबरडेच मोडले आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. पडेल, शिरगाव, वैभववाडी यासारख्या भागात तर तुफान पाऊस झाला. रात्रभर पाऊस झाला. त्यानंतर सकाळपासून पावसाळी वातावरणामुळे मोठे नुकसान होणार, हे निश्चित झाले आहे. आज दिवसभर किमान सुर्यदर्शन झाले असते किंवा वारा सुटला असता तर नुकसान टाळता आले असते. मात्र, तसे कोणतेही वातावरण आज नाही.
--
स्थिती अत्यंत बिकट
अवकाळी पावसाचा मोठा परिणाम बागायतदारांना सोसावा लागणार आहे. ज्या आंब्याच्या झाडांना मोहोर आहे, त्यावर करपा, तुडतुडे, थ्रीप्स वाढणार आहे. याशिवाय ज्या झाडांना मोहोर आलेलाच नाही, त्यांना आता पालवी येण्याची भीती आहे. याचा एकूणच परिणाम आंबा उत्पादनावर होणार आहे. काजू पिकांची स्थिती त्यापेक्षा बिकट आहे. मोहोर काळवंडण्याची शक्यता अधिक आहे.
--
उत्पन्नात घट होण्याची शक्यता
आंबा आणि काजूच्या उत्पादनात मोठी घट होऊन त्याचा शेतकऱ्यांच्या अर्थचक्र थांबणार आहे. पर्यायाने जिल्ह्याच्या अर्थकारणावर मोठा विपरित परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. जानेवारी महिना सुरू असल्यामुळे भविष्यात आणखी काजुला पालवी किंवा मोहोर येण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी वेळही शेतकऱ्यांकडे नाही. त्यामुळे शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे.
------------
कोट
पावसाचे पाणी मोहोरात साचल्यामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव आंबा पिकांवर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांनी नुकसान टाळण्यासाठी कार्बनडिझम-मेन्कोझिमची फवारणी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे करावी. याशिवाय झाडांच्या मुळात पाणी साचले असल्यास त्याच निचरा करावा किंवा बुंध्यानजीक पाच-सहा इंच खोदुन मुळ कोरडे होईल, अशी स्थिती निर्माण करावी. अन्यथा आंब्याला पालवी येण्याची भीती आहे.
- डॉ. विजय दामोदर, शास्त्रज्ञ, आंबा संशोधन उपकेंद्र, रामेश्वर देवगड
-----------
कोट
आंब्याला मोहोर येत असतानाच देवगड तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे. याशिवाय दिवसभर ढगाळ वातावरण असून अधुनमधून पावसाच्या सरी देखील पडत आहेत. त्यामुळे आंबा पिकांचे नुकसान अटळ आहे.
- माधव साटम, आंबा बागायतदार, शिरगाव, देवगड
-----------
कोट
पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे मोहोरलेल्या काजुवर बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. याशिवाय टी मॉस्कीटो, थ्रीप्सचा प्रादुर्भाव वाढेल. ढगाळ वातावरण निवळताच काजू बागायतदारांनी सद्यस्थितीला अनुसरून किटकनाशक, बुरशीनाशकांच्या फवारण्या कराव्यात
- प्रा. विवेक कदम, काजु अभ्यासक, वैभववाडी
-----------
कोट
अवकाळीमुळे आंबा, काजुचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व कृषी सहाय्यकांना आंबा, काजू बागेची पाहणी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. याशिवाय शेतकऱ्यांनी अशा स्थितीत कोणत्या फवारण्या कराव्यात याचेही वेळापत्रक दिले आहे.
- युवराज पाटील, कृषी अधिकारी, वैभववाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com