‘श्यामची आई’ पुस्तकाचा ९ फेब्रुवारीला वाढदिवस
60144
श्यामची आई
‘श्यामची आई’ पुस्तकाचा
९ फेब्रुवारीला वाढदिवस
मालवण कथामालेतर्फे आयोजन
आचरा, ता. २३ : साने गुरुजींच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीवर्षानिमित्त साने गुरुजी कथामाला मालवणच्यावतीने ‘श्यामची आई’ पुस्तकाचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती कथामाला मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी दिली.
साने गुरुजींना १९३२ मध्ये स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे अटक झाली. त्यांना नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले. तेथेच ते ‘श्यामची आई’च्या कथा राजबंद्यांना सांगत असत. कारागृहात ४२ रात्री त्यांनी ४२ कथा कैद्यांना सांगितल्या. त्यातील एक राजबंदी आनंद पाटील यांनी गुरुजींना या कथा लिहून काढायला सांगितले. साने गुरुजी ९ फेब्रुवारी १९३३ ला लिहायला बसले आणि १३ फेब्रुवारी १९३३ ला ४२ रात्री लिहून ‘श्यामची आई’ पुस्तक हातावेगळे केले. गेल्या आणि चालू शतकांतील सर्वाधिक खपाचे पुस्तक म्हणून ‘श्यामची आई’ला नावलौकिक प्राप्त झाला म्हणून ९ फेब्रुवारीला या पुस्तकाचा ९१ वा वाढदिवस कथामाला मालवण शाखेच्यावतीने साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम वायंगणी ठाणेश्वर (ता. मालवण) या शाळेत होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश पेडणेकर, प्रमुख मान्यवर म्हणून पांडुरंग कोचरेकर (उपाध्यक्ष कथामाला) आणि सुगंधा गुरव (सचिव कथामाला) उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी प्रतिभा मयेकर या ‘श्यामची आई’च्या कथा सांगणार आहेत. यानिमित्त परिसरातील मुलांच्या सर्व आईंना ‘श्यामची आई’ हा ग्रंथ भेट देण्यात येणार आहे. साने गुरुजी कथामाला कार्यकर्त्या आणि माजी पंचायत समितीच्या सदस्या (कै.) प्राजक्ता पेडणेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे ग्रंथदान होणार आहे. या उपक्रमाला अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला अध्यक्ष शामराव कराळे (मुंबई) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. वायंगणी ठाणेश्वरच्या मुख्याध्यापिका सुजाता सावंत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.